नर्सरी शाळांच्या मनमानीमुळे पालकांना होणाऱ्या त्रासापेक्षाही एवढय़ा लहान वयात मुलांना शिक्षण द्यावे का? या विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे.  लवकर चालू केलेल्या शिक्षणाचा चिरस्थायी परिणाम होत नाही. उलटपक्षी उशिरा शाळेत जाणाऱ्या मुलांची प्रगती स्थिर आणि विनासायास होत असते.
नर्सरी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त अशा शीर्षकाची बातमी वाचली आणि मला हसूच आले. वास्तविक पालकांच्या मनमानीमुळं बालके त्रस्त होत आहेत. तिकडे कुणीच लक्ष देऊ इच्छित नाहीत. सरकार, शिक्षणमंत्री, शिक्षणाधिकारी इत्यादींपकी कुणालाच पालकांच्या मनमानीमुळे बालकांना किती त्रास होत असेल ते कळत नाही. नव्हे कोणीच पाहू इच्छित नाही, ते का?
या बातमीत म्हटल्याप्रमाणे, दीड वष्रे हे काय मुलांचे शाळेत जाण्याचे वय आहे? पण, या दीडशहाण्या शिक्षित पालकांना कुणी सांगितले तरी त्यांच्या डोक्यात शिरेल तर ना? आणि एकामागून दुसराही, अशा प्रकारे खड्डय़ात उडय़ा घेणाऱ्या मेंढय़ांप्रमाणे शहरातल्या पालकांच्या वेडपटपणाचे अनुकरण खेडय़ातही होऊ लागल्याचे बातमीत वाचले. म्हणजे पालकांच्या मनमानीपणाचा फटका खेडय़ातल्या बालकांनाही बसू लागला आहे. इतक्या लहान वयात सीबीएसई, आयसीएसई, आयबी या बोर्डाच्या परीक्षेकरिता बालकांना दुसऱ्या वर्षांपासूनच ‘तयार’ करून घेण्याच्या आक्रमक जाहिराती या शाळा उघडपणे करीत आहेत, असे बातमीत जे म्हटले आहे त्या पालकांच्याच आग्रहास्तव असणार, यात शंकाच नसावी. पालकांचा आग्रह नसेल तर कोण कशाला असल्या शाळा सुरू करील? शिक्षण हासुद्धा आता व्यवसाय असल्याने आणि अधिकात अधिक लाभ मिळवणे हाच तर कोणत्याही व्यवसायाचा उद्देश असल्यामुळे यात शाळांची काय चूक?
 जगात कित्येकांनी केलेले संशोधन बालकांचे शिक्षण लवकर सुरू करायला अनुकूल अभिप्राय देत नाही. गाडी मूळ ठिकाणापासून लवकर निघाली की गंतव्य स्थानीही लवकर पोचते, तसे बालकांचे शिक्षण लवकर चालू केले तर तीही आयुष्यात लवकर प्रगती करू शकतील, असे पालकांना किंवा कुणाही व्यक्तीला वाटणे स्वाभाविक आहे. शिक्षण संशोधकही ते मान्य करतात. पण म्हणून हा दृष्टान्तही त्यांना मान्य आहे, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. उलटपक्षी बालशिक्षणात संशोधन करणाऱ्या सर्वाचा अगदी एकमुखी निर्णय आहे, लवकर चालू केलेल्या शिक्षणाचा चिरस्थायी परिणाम होत नाही. तसे असल्याचा कोणताही पुरावा नाही. उलटपक्षी उशिरा शाळेत जाणाऱ्या मुलांची प्रगती स्थिर आणि विनासायास होत असते. त्यातले चिरस्थायी हे विशेषण महत्त्वाचे आहे.
एलिझाबेद हार्टली ब्य्रूअर Does early schooling harm our children या पाच वर्षांपूर्वीच प्रसिद्ध केलेल्या आपल्या निबंधात याचे विस्ताराने वर्णन करतात. अमेरिकेत झालेल्या संशोधनाचा आधार देत त्यांनी दिलेली एक माहिती पालकांना आणि सर्वच संबंधितांना विचार प्रवृत्त करणारी ठरावी. ज्या मुलांचे शिक्षण पाचव्या वर्षी चालू केले त्यांची तुलना उशिरा आरंभ झालेल्यांशी केली तेव्हा लवकर आरंभ करणाऱ्यांचे ज्ञान कमी असल्याचे तर आढळलेच, पण त्यांच्यात कित्येक प्रकारच्या मानसिक विकृतीही आढळल्या. ‘आपली मुलं अशी का वागतात?’ अशा प्रकारचे प्रश्न अलीकडे पालकांना सतावीत असतात. त्यांच्या अशा वागण्याला तुम्ही आई-वडीलच कारण आहात, हेच उत्तर आहे. त्यात पुन्हा मुलींपेक्षा मुलगे मानसिक प्रगतीत काही आठवडे मागास असल्याने मुलांना त्याचा अधिक त्रास होतो. नवीन परिस्थितीशी मुली जितक्या लवकर जुळवून घेऊ शकतात, तेवढे मुलांना शक्य होत नाही. त्या आणखी एक सांगतात, मोठय़ा माणसाची ज्ञानग्रहणाची पद्धत आणि बालकांची पद्धत यातही महदंतर असते. हे आपल्याकडील शिक्षणात कुठे कोण लक्षात घेतात? त्या म्हणतात – मुलांना नसíगक वातावरणात अगदी अंथरुणात लोळत, खेळत, बागडत, आपलं कुतूहल नाना प्रकारांनी शमवीत, मायेच्या उबदार वातावरणात वाढू द्यायला हवं याबद्दल माझी आता पुरेपूर खात्री पटली आहे. शक्य तोवर आई-वडिलांच्याच सहवासात वाढू द्यायला हवं. पालकांच्या अवास्तव अपेक्षा, परीक्षा, अपेक्षाभंगातून मग शिक्षा, या तीन क्षांच्याखाली चेचण्यांपासून त्यांना वाचवायला हवं. प्रेमाच्या, मायेच्या घरगुती वातावरणातच वाढवायला हवं. मुलांना शाळेत उशिरा घालून त्यांना खेळण्याकरिता अधिक वेळ मिळू द्यायलाच हवा, असं एका शिक्षक संघटनेनं आपल्या ठरावात म्हटलं आहे.
लवकर शाळेत घातल्यामुळे मुलांच्या खेळण्याच्या कालावधीवर आक्रमण होते. ते तर फारच घातक होय. या बाबतीत अमेरिकेतल्या टफ्ट विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. डेव्हिड एिल्कड Can we play? या निबंधात सांगतात, बालकांच्या मेंदूचा यथायोग्य विकास होण्यात खेळांची भूमिका अमूल्य आहे. क्रीडावैद्यकात विशेष कार्य करणाऱ्या डॉ. राजीव शारंगपाणींना मी जेव्हा विचारले तेव्हा त्यांनीही हे मान्य केले. मुलांचा खेळाच्या कालावधीला कात्री लावण्याचे हे वेड अमेरिकेतूनच आपल्याकडे आले असावे. १९९७ पासून २००३ पर्यंतच्या कालावधीत मुलांचा खेळाचा वेळ निम्म्यावर आल्याचे मेरीलँड विद्यापीठाच्या सँड्रा हेफर्थ यांच्या संशोधनाचा दाखला देऊन डॉ. एिल्कड म्हणतात. अमेरिकेतल्या कित्येक शाळांनी औपचारिक शिक्षणाला अधिक वेळ मिळावा म्हणून मधल्या सुट्टय़ांनाच कात्री लावल्याचे उदाहरणही डॉ. एिल्कड देतात आणि त्यांचा याला जोरदार आक्षेप आहे. माझ्या मनात आले, दीड-दोन वर्षांच्या आपल्याच बाळाला शाळेत अडकवून आपले पालक निराळे काय करीत आहेत? त्यांच्या खेळाच्या कालावधीवरच हा घाला नव्हे का? बालकांचा अधिकार नावाचा अधिनियम संमत करताना केंद्र सरकारने याचा तर विचार केलेलाच दिसत नाही.
जॉन बोल्बी Maternal care and Mental health या निबंधात म्हणतात, आठ वर्षांपर्यंत (किंवा अधिकही काळ) मुलाला आईजवळ न ठेवणं म्हणजे त्याला आईपासून तोडणंच होय. वयाच्या आठव्या किंवा अधिकही वर्षांपर्यंत बाळाला आईच्या सहवासाची पराकोटीची आवश्यकता असते. तत्पूर्वी आईपासून दूर केलं जाण्यामुळं बाळाला धोके संभवतात. पण स्वत:ला मोकळीक मिळावी, पत्ते खेळता यावेत, चार तास दुपारची सुखाची झोप मिळावी, कर्तृत्व गाजवता यावं अशा विविध कारणांमुळे कित्येक आया आपल्या बाळाची ही अत्यावश्यक नसíगक गरज न भागवता त्याला बालसंगोपन केंद्रं, खेळघरं, बालवाडय़ा अशा नाना तऱ्हेच्या संस्थांत डांबतातच ना?
या विषयावर अफाट संशोधन केलेल्या रेमंड मूर यांचे काही अनुभव महत्त्वाचे आहेत. मूर आणि  The school can wait या पुस्तकात आणि The dangers of early schooling या प्रबंधात म्हणतात, शिक्षण लवकर सुरू करणं चांगलं, हे मत आम्हाला शंकास्पद वाटतं. लवकर शाळेत घालण्याचे परिणाम टिकाऊ होत असल्याचा कोणताही सज्जड पुरावा उपलब्ध नाही. किंबहुना, ७ किंवा ८ वर्षांची मुलंच अधिक सक्षमतेनं, कमी श्रमात, वैफल्य न येता शिकतात, जीवनात यशस्वीही होतात, असाच अनुभव आहे. बालकाला जन्मापासूनच प्रशिक्षण किंवा शिक्षण दिलं पाहिजे, हे ठीक. पण ते वाचन, लेखन, गणन (गणित) असं औपचारिक कदापी नसून मायेच्या उबेत, घरगुती वातावरणात, सहजपणे, मुख्यत: मूल्यशिक्षण (संस्कार) देणारे, मानसिक स्थर्य पुरवणारेच हवे. मुलांना ८ वर्षांपर्यंत मूलभूत कौशल्यं आली पाहिजेत, हे आम्हाला पटत नाही. आकलनाच्या ज्या विषयांत सातत्यानं ताíकक विचार करावा लागतो (गणित, भाषेमधील व्याकरण, विज्ञान इ.) त्यांत मुलांना ८ वर्षांपर्यंत गुंतवणं अनिष्ट आहे, हा शास्त्रीय संशोधनाचा निष्कर्ष. त्यामुळे ८ वर्षांपर्यंतच्या बालकाला तसल्या कामांत अडकवण्याच्या कोणत्याही योजनेला आम्ही मान्यता देऊ शकत नाही.
जो पालक आपल्या मुलाला बालसंगोपन केंद्रात पाठवीत नाही, तो मुलाचे नुकसान करतो असा पालकांचा दृढ समज अलीकडे दिसून येतो. अशा संस्थांत न गेलेले मूल योग्य तऱ्हेने विकसित झाले नाही, असेही मानले जाते. पण सतत संशोधनाचा आधार देऊन सांगायचे तर बहुसंख्य बालकांना अशा केंद्रांत जायची आवश्यकता नसते. किंबहुना, त्यांनी तिथे जाऊच नये, असा आमच्या संशोधनाचा स्पष्ट निष्कर्ष आहे, असे मूर सांगतात!  उषा राय यांच्या Indian Express च्या २३ डिसेंबर १९९४च्या अंकात आलेल्या Preschool Education : A nightmare या लेखातील  माहिती प्रत्येक पालकाने लक्षपूर्वक वाचण्याची आवश्यकता आहे. शिक्षणात आणि जीवनात आपल्या मुलाने इतरांपेक्षा चार पावले पुढे राहायला हवे म्हणून अजून ज्याला धड चालताही येत नाही किंवा जे अजून लडखडतच आहे, अशा दोन किंवा तीन (म्हणजे दीडच्या तुलनेत किती?) वर्षांच्या मुलाला औपचारिक शिक्षणाकरिता इतके धावडवतात की स्वाभाविकत:च त्याच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होत असल्याचे आढळते. परिणामत: नको नको त्या व्याधी बालकांना ग्रासत आहेत. श्वसनाचे विकार, पाठदुखी, थकवा आणि मानसिक ताण, परिणामी नखे खाण्याची प्रवृत्ती, आक्रमकता, दोन ते तीन वयाच्या वयोगटातल्या मुलांच्या मागे लागलेल्या अंथरुणात शू, सततचा मलावरोध अशा व्याधी वाढताना आढळत आहेत.
माझ्या मते खरे तर, शारीरिक विकासाअभावी मुलीचे लग्न विहित वयापूर्वी करणे जसा अपराध मानतात, तसा मानसिक विकासाअभावी बालकांना लवकर शाळेत डांबणे हासुद्धा बालकांवर केलेला घोर अपराध मानून पालकांना शिक्षा व्हायला हवी.