भरतनाटय़म नर्तक, कथकली नर्तक, आकाशवाणीवरील गायक, उत्तम मृदुंगवादक आणि प्रसिद्ध नर्तिकांच्या किमान दोन पिढय़ा घडवणारे गुरू, ही सारी वैशिष्टय़े अडय़ार के. लक्ष्मण या एकाच व्यक्तीत सामावलेली होती. १६ डिसेंबर १९३३ रोजी जन्मलेले लक्ष्मण मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी कालवश झाले. ‘पद्मश्री’ (१९८९) आणि ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ (१९९१) यांखेरीज फारसे राष्ट्रीय सन्मान न मिळताही गुरू म्हणून लक्ष्मण अतिशय समाधानी होते. साक्षात रुक्मिणीदेवी अरुंडेल यांनी (१९५०च्या दशकात) दिलेले प्रोत्साहन, ही तर त्यांना आयुष्यभर पुरणारी ठेव होती.
रुक्मिणीदेवी अरुंडेल यांना जग ओळखते भरतनाटय़मला आजचे रूप देऊन हा नृत्यप्रकार कुलीन कन्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या महान गुरू म्हणून. रुक्मिणीदेवींच्या ‘कलाक्षेत्र’ या संस्थेचे आणखी एक संस्थापक पी. डी. दोराइस्वामी यांनी, लक्ष्मण यांच्या वयाच्या ११व्या वर्षी त्यांना या संस्थेत आणले.. ‘तुमची दोन्ही मुले चांगली गातात, त्यांना आमच्याकडे द्या’ एवढय़ा आग्रहावर लक्ष्मण यांचे शाळामास्तर वडील, लक्ष्मण आणि रामराव या मुलांना कलाक्षेत्रात पाठवण्यास तयार झाले. यापैकी लक्ष्मण यांची प्रगती उत्तम झाली. तालाचे इतके उत्तम ज्ञान त्यांना होते, की ‘आता शारीरिक शिक्षण म्हणून तरी नृत्य शीक’ असे रुक्मिणीदेवींनीच फर्मावले आणि खरोखरच, नृत्याच्या परीक्षा लक्ष्मण भराभर उत्तीर्ण होत गेले. १९५६ साली भारत सरकारची फेलोशिप मिळवून, भरतनाटय़ममध्ये पदव्युत्तर पदविकाही त्यांनी घेतली. अल्पावधीतील या प्रगतीचे बक्षीस म्हणजे रुक्मिणीदेवींच्या ‘कुमारसंभवम्’ नृत्यनाटय़ात भूमिका, त्यातील एक नृत्यप्रसंग रुक्मिणीदेवींसह करण्याची संधी आणि ‘कलाक्षेत्र’मध्ये नोकरी. परंतु लक्ष्मण कर्नाटक-संगीतातही उत्तम प्रगती करीत होतेच. गायनाचे रीतसर शिक्षण संपवून आकाशवाणीवर १९५८ पासून त्यांचे कार्यक्रमही नियमित होऊ लागले होते. त्यांनी १९५६ पासून तर कथकलीचेही शिक्षण अंबू आणि चंदू पणिक्कर या गुरूंकडून घेणे सुरू केले, तसेच मृदंगवादनाचेही धडे पक्के केले. भरतनाटय़म् नृत्याचा ताल शास्त्रोक्तच राखण्यासाठी झांजेसारखे जे मूलभूत ताल-वाद्य किंवा ‘नटुवांगम’ वाजवत कृती गायिली जाते, त्या परंपरेचे जाणकार किंवा ‘नटुवानर’ म्हणूनही ते प्रख्यात होते.
‘नाटय़ालय’ या वैजयंतीमाला यांनी स्थापलेल्या संस्थेत गुरू म्हणून लक्ष्मण रुजू झाले, तेथे नृत्यदिग्दर्शनात त्यांची चमक दिसून आली. तेथील दशकभराच्या अनुभवानंतर २२ ऑगस्ट १९६९ रोजी त्यांनी ‘भरतचूडामणि’ संस्थेची स्थापना केली. अनिता रत्नम, पद्मिनी चारी, रोजा कण्णन आदी अनेक नृत्यांगनांचे ते गुरू. त्यांच्यामागे दोन कन्या आहेत, त्याही गायन-नर्तनात प्रवीण आहेत.