26 February 2021

News Flash

वाचावे नेट-के : ब्लॉग पत्रकारितेचा की ‘स्वत:’चा

पत्रकारांना ब्लॉग राखणं कठीण नाही. त्यातही अनेक पत्रकार केवळ पूर्वप्रकाशित लिखाण ब्लॉगवर कटपेस्ट न करता स्वतंत्र ब्लॉगनोंदी करतात. पत्रकारांचे ब्लॉग लक्षवेधक असणं, हेही व्यवसायानुरूप साहजिक

| December 3, 2012 03:13 am

पत्रकारांना ब्लॉग राखणं कठीण नाही. त्यातही अनेक पत्रकार केवळ पूर्वप्रकाशित लिखाण ब्लॉगवर कटपेस्ट न करता स्वतंत्र ब्लॉगनोंदी करतात. पत्रकारांचे ब्लॉग लक्षवेधक असणं, हेही व्यवसायानुरूप साहजिक आहे. पण त्यापलीकडचा ‘स्वत:’ कुठे येतो? दुनियेशी संबंध- संपर्क ठेवणारी आणि शब्दांशी खेळणारी ही माणसं दिल की बात सांगताना मात्र सामान्य माणसांचं थेट अनुकरणच करतात की काय?
हो किंवा नाही यातलं एकच उत्तर अनुचित तर ठरेलच, पण परिचित पत्रकारांच्या किमान एक-दोन नोंदी यापेक्षा निराळय़ा अपवादात्मकरीत्या चांगल्या होत्या, याची आठवण अनेक ब्लॉगवाचकांना असेल. पत्रकारितेचा भाग म्हणून केलेल्या लिखाणापेक्षा निराळं स्वतला लिहिता येतं का?
मराठीसंदर्भात हा प्रश्न सध्या तरी महत्त्वाचा आहे. या प्रश्नामागे  असलेली, ‘पत्रकारितेपेक्षा निराळय़ा जातकुळीचं लिखाण असायला हवं’ ही अपेक्षा योग्य ठरेल. (इंग्रजीत ब्लॉग-पत्रकारिता असा व्यवसाय होऊ शकतो आणि मराठीत तसं सध्या तरी होऊ शकत नाही,  हे कटू वास्तवही त्यामागे आहे.) शिवाय, मराठी ब्लॉगविश्वात एवढय़ा संख्येनं पत्रकार आहेत ते फक्त त्यांना स्वत:चंच आयतं लिखाण तयार मिळतं म्हणून तर नाहीत ना, हाही प्रश्न धसाला लावण्याची ताकद त्या ‘व्यावसायांतर्गत लिखाणापेक्षा निराळय़ा जातकुळीचं लिखाण’ अपेक्षेत आहे.  या पाश्र्वभूमीवर सुनील तांबे यांचा ‘मोकळीक’ आणि ज्ञानदा देशपांडे यांचा ‘बृहत्कथा’ या दोन ब्लॉगकडे आज पाहू.
तांबे यांच्या ब्लॉगवर ‘साधना’ साप्ताहिकातले त्यांचे अनेक लेख दिसतात, पण एरवी त्यांनी स्वत:चं लिखाणही भरपूर केलं आहे. गद्यकार म्हणून  तांबे यांचं लिखाण स्पष्ट असतं, वाचकाला कुठेतरी नेणारं आणि आता तुमचे तुम्ही फिरा या विचारप्रांतात, असा विश्वास देणारं असतं. पण त्यांच्या ब्लॉगवर हल्लीच कविताही आहेत.  गद्यात हेच अनुभव वाचताना ते अर्धेमुर्धे वाटले असते, म्हणून त्या कविता आहेत इतकंच. बाकी ब्लॉगवरल्या कवितांबद्दल कधी कुणी जाहीर मतप्रदर्शन करू नये, हा संकेत इथेही पाळणं इष्ट ठरेल. सत्यदेव दुबे यांच्यावरल्या मृत्युलेखात ‘नाटक हाच त्यांचा सेक्स होता’ असं विधान करणारे सुनील तांबे दुबेजींना केवळ दाद देत नाहीयेत.. ते कशाची तरी उत्तरं शोधताहेत आणि तो शोध पत्रकारीय कुतूहलातून आलेला आहे. तांबे यांचा आणखी एक ‘मृत्युलेख’ आहे- ‘कळते-समजते’ हा पत्रकारांची खबर देणारा-घेणारा ब्लॉग बंद झाला तेव्हा त्यांनी ‘हे इलेक्ट्रॉनिक लिटिल मॅगेझिन होतं’ असं निरीक्षण नोंदवलं आहेच, पण ‘दुष्कृत्यं करणारे, समाजविघातक विचारांचा प्रसार करणारे अनेकदा अनामिक राहू इच्छितात. त्यांच्या मार्गावरून सज्जन चालू लागले की असा करुण मृत्यू होतो. एका अश्रूचीही श्रद्धांजली त्यांना मिळत नाही’ असा शेवट करून तांबे यांनी चर्चेला तोंड फोडलं आहे. त्या ‘कळते-समजते’ ऊर्फ ‘बातमीदार’ या ब्लॉगचं लिखाण संयत होतं का, तरीही त्याच्या जाण्यानं काही नुकसान झालंय का, याबद्दल मतप्रदर्शन सुरू झालं. किंवा, ‘लोकांच्या प्रश्नांची, समस्यांची, वेदनांची पकड सामाजिक प्रसार माध्यमानं (सोशल मीडिया) घेतली, त्यामुळे क्रांतिकारी नसूनही सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद जनलोकपाल आंदोलनाकडे आली’ असा थेट आणि स्पष्ट निष्कर्ष वाचकाहाती देऊन तांबे यांनी ऑगस्ट २०११ मध्ये लिहिलेल्या लेखाचा शेवट होतो.. मतप्रदर्शन भरपूर, वैयक्तिक संदर्भही भरपूर, पण लोकांना ‘इक्विप’ करणं हा तांबे यांचा हेतू त्यांच्या शैलीला पुरून उरतो. स्वत:च्या अनुभवाशी प्रामाणिक असण्याचा धागा अजिबात न सोडता तांबे पत्रकाराचं कौशल्य वापरून ब्लॉगनोंदी लिहितात, हे स्वतंत्रपणे लिहिलेल्या नोंदी वाचताना नक्कीच दिसतं.
ज्ञानदा देशपांडे यांचा ब्लॉग वाचताना आपण त्यांच्याइतक्या वेगानं विचार करू शकत नसूनही वाचून मनन करू शकणार आहोत, याचं बरं वाटत राहातं. त्या पत्रकार आहेत/ नाहीत अशी स्वप्रतिमा राखूनच लिहितात, पत्रकार म्हणून काम केलं तरी ते इलेक्ट्रॉनिक माध्यमात असतं त्यामुळे त्यांचं लिखाण बहुतेक अप्रकाशितच वाचायला मिळतं. पण कमी. इतकं कमी की, ‘बृहत्कथा’वर अखेरची नोंद आठ मार्चची आहे.. ‘विंगेतल्या चळवळीची वाट पाहताना..’ अशी, स्त्रीमुक्तीची आजची चळवळ कशी कुंठित झाली आहे आणि आगरकर-सदृश पुरुष या चळवळीला पुढे नेतील, असा वैचारिक विश्वास हे या चळवळीच्या कुंठितपणाचं सध्याचं मोठं लक्षण ठरतं आहे, असा वाद उभा करणारी. वाद ही बौद्धिकच क्रिया आहे आणि त्यात भावना आणायच्या नसतात (भावनांमुळे जी परिस्थिती निर्माण झाली/ होते त्याकडे मात्र बुद्धीनं दुर्लक्ष करायचं नसतं) याची जाण ज्ञानदा यांनी अन्य ब्लॉगांवर दिलेल्या प्रतिक्रिया, फेसबुकवरल्या प्रतिक्रिया अशी अन्यत्रही दिसत असतेच, ती त्यांच्या ब्लॉगवर आणखी स्पष्टपणे दिसते. एकदा का हा वाद भावनिक पातळीवर जाऊ लागतोयसं दिसलं की त्या सरळ दुर्लक्ष करतात, हेही प्रतिक्रियांचा कालानुक्रम नीट पाहिल्यास लक्षात येईल. अनिल अवचट यांच्या हल्लीच्या लिखाणाबद्दल नापसंती जाहीर करणारं लिखाण ज्ञानदा यांनी केलं, त्यावर नंतर कुठेतरी (बहुधा मायबोली) चर्चा सुरू झाली होती. दुसरीकडे, मकबूल फिदा हुसेन यांच्या मृत्यूनंतर लिहिताना ‘सरतेशेवटी व्यक्तीला समूहशरण बनवणं’ हे नाटय़ ज्ञानदा यांना दिसतं, पण त्यांच्यापुढला प्रश्न ‘हा चित्रकार काँट्रोव्हर्सी-प्रवण कसा झाला’ हा आहे. ‘त्यांनी आधुनिकतावाद पूर्णपणे स्वीकारलाच नाही’ हा विवान सुंदरम यांचा आक्षेप ज्ञानदा यांना पटतो आणि सत्तेशी जवळीक, ‘लोकेषणा’ (एक अर्थ पॉप्युलिझम. दुसरा जनसन्मानाची हाव) ही कारणं त्यामागे असावीत, हा निष्कर्ष सर्वाधिक जवळचा वाटतो. यावर ‘हे वाचण्यासाठीची बौद्धिक तयारी मराठी वाचकांची नसूही शकते’ अशा अर्थाची प्रतिक्रिया दोघांनी दिली आहे. ‘बृहत्कथा’मधल्या अनेक नोंदींना तीच प्रतिक्रिया लागू पडेल. याचा विषाद ज्ञानदा देशपांडे यांना वाटणार नाही, याचं कारण या ब्लॉगवरल्या नोंदींची लेखनप्रेरणा छापील माध्यमातल्या पत्रकारासारखी दिसत नाही. वाचक हा सहप्रवासी आहे अशी सोशल मीडियाला साजेशी धारणा ‘बृहत्कथा’कारांचीही असावी, असं वेळोवेळी लक्षात येतं. अस्मिता, जाती, भावनिक प्रतिसादाच्या असामाजिक गर्तेत लोटणारी सामाजिक परिस्थिती, यांवर या ब्लॉगमध्ये भरपूर वाचायला मिळेल. प्रतिक्रियांना चाळणी लावून मगच त्या या ब्लॉगवर अवतरत असाव्यात आणि ही चाळणी लिबरल दिसते, हेही ‘इतिहास आणि अस्मिता’ यांसारख्या नोंदी प्रतिक्रियांसह वाचल्यास कळेल. इतिहास आजच्या संदर्भात, आज(ही) ज्या मूल्यांची गरज आहे, त्या मूल्यांसंदर्भात पाहायचा की  आजची मूल्यं ठरवण्यासाठी इतिहासाचा वापर लोणच्याच्या बरणीसारखा (किंवा हिऱ्यांच्या खाणीसारखा वगैरे) करायचा, हा आजचा सामाजिक संभ्रम आहे. बरणी-खाण यांच्या बाजूनं ज्ञानदा देशपांडे अर्थातच नाहीत. पण ती बरणी आहे आणि ती नसली पाहिजे- इतिहासाचं आत्मीकरण करण्यासाठी त्यापेक्षा निराळे मार्ग नक्कीच आहेत-  हे सूत्र त्यांच्या लिखाणातून वाचकापर्यंत पोहोचेल. अमेरिकेतल्या वास्तव्यादरम्यान काही नोंदी ज्ञानदा यांनी लिहिल्या, त्यातली एक या आत्मीकरणाबद्दल आहे आणि दुसरी- अमेरिकेतल्या व्हिसा-जातींबद्दलची नोंद ही ‘चुरचुरीत, विनोदी’ (पर्यायानं ‘छानच’) होण्याची अपार शक्यता असतानाही त्यातली सामाजिक बोच वाचकांपर्यंत पोहोचते.
पत्रकारांच्या ब्लॉगलेखनात काही नवीन असतं की नाही, याचं सकारात्मक उत्तर या दोन ब्लॉगमधून शोधता येतं.. त्यापासून कुणाला  प्रेरणाही मिळायला हरकत नाही, पण अभ्यास करावा लागेल.  
उल्लेख झालेल्या ब्लॉगचे पत्ते : http://dnyanadadeshpande.blogspot.in , http://moklik.blogspot.in
सूचना, प्रतिक्रियांसाठी : wachawe.netake@expressindia.com     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 3:13 am

Web Title: blogspot dnyanadadeshpande and blogspot moklik
टॅग : Blog,Internet
Next Stories
1 त्याचे वाचनगाणे..
2 सुट्टी.. सुट्टी.. पानं..
3 मतस्वातंत्र्यावरचे स्वार…
Just Now!
X