प्रभाकर फडणीस हे ब्लॉगवर उडत्या गप्पा मारण्यापेक्षा गांभीर्यानं काही लिहू इच्छिणाऱ्या ब्लॉगलेखकांपैकी आहेत. स्वत:बद्दलच्या लेखनापासून लांब राहणं हा त्यांचा स्वभाव दिसतो. काहीतरी वाचून मग लिखाण करणं, अशी त्यांच्या ब्लॉगलेखनाची पद्धत आहे. महाकाव्यं, हल्लीची पुस्तकं किंवा वर्तमानपत्रातल्या बातम्या यांपैकी काहीही त्यांना पुरतं.

वाचलं त्याचा आकृतिबंध महत्त्वाचा नसून मजकूर महत्त्वाचा आणि वाचणाऱ्यानं ‘इथे आणि आत्ता’ तो वाचण्याच्या क्षणाला दिलेला आकारही महत्त्वाचाच, असं मानल्यास त्या मजकुराचा बदलता प्रत्यय मनोज्ञ ठरतो.
अशी प्रत्ययवादी भूमिका फडणीस यांच्या लिखाणामागे दिसेल. या रीतीतून केलेल्या नोंदींचा प्रवासही कसा बदलत गेला, हे फडणीस यांच्या ‘थॉटफॉरटुडे’ – अर्थात, ‘आज सुचलेलं’ या ब्लॉगच्या गेल्या दीड वर्षांच्या वाटचालीतून दिसलं आहे.
प्रत्यय काय फक्त ‘वाचण्या’तूनच येतो का? पाहण्यातून नाही येत? ऐकण्यातून नाही येत? हे प्रश्न वावदूक नाहीत. ते विचाराला निमंत्रण देणारेच आहेत. प्रभाकर फडणीस यांच्या ब्लॉगच्या निमित्तानं ही चर्चादेखील इथं आपण करू शकतो. ग्रहण आणि आविष्करण यांच्यातला संबंध कुठल्या वळणानं जातो, हे पाहताना फडणीस यांचं उदाहरण आपल्याला उपयुक्त ठरणार आहे.
त्याआधी ब्लॉगमधून होणारी फडणीस यांची ओळख काय आहे, याकडे पाहू. ‘सोबती’ या विलेपाल्र्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या मंडळाचे ते अध्यक्ष असताना त्यांनी या मंडळाची माहिती देणारा ब्लॉगही काढला होता. पाच-सहा ब्लॉगपैकी एखादा स्वत:चं लिखाण सातत्यानं करण्यासाठी आणि बाकीचे ब्लॉग विशिष्ट विषयाला वाहिलेले, त्यामुळे त्या विषयाबद्दल नोंदी करून झाल्या की थांबणारे, अशी ब्लॉगिंगची जरा शिस्तशीर पद्धत वापरणाऱ्यांपैकी फडणीस आहेत. महाकाव्यांबद्दल लिहिण्यासाठी ‘माझे रामायण’ आणि ‘महाभारत : काही नवीन विचार’ हे ब्लॉग फडणीस यांनी चालवले. त्यांवर गेल्या दीड-दोन वर्षांत नवं लिखाण काही नाही; पण ते पाहता येतात. फडणीस यांच्या वाचनात ‘इथे आणि आत्ता’चा संदर्भ कसा जिवंत असतो, हे समजण्यासाठी ‘माझे रामायण’ या ब्लॉगवरली ‘बालकांड- भाग १०’ ही नोंद (फेब्रुवारी २००९) जरूर वाचावी. सीतास्वयंवराचा प्रसंग जसा लिहिला गेला आहे, त्याच्या आत्ता येणाऱ्या प्रत्ययाचं हे वर्णन आहे. प्रत्यक्ष राम किंवा प्रत्यक्ष सीतेशी फडणीस यांच्या लिखाणाचा संबंध अजिबात नसून, हे लिखाण म्हणजे वाचनाचा प्रत्ययशोध आहे. मिथक कथेमागल्या शास्त्रीय सत्याचा प्रत्यय (धनुष्य अनेकांनी हाताळल्याने, अनेकवार खेचले गेल्याने त्याचे ‘वर्क हार्डनिंग’ झाले असेल! ) किंवा सामाजिक शल्याच्या सनातनतेचा प्रत्यय (‘प्रत्यक्षात सीतेला कोणी काही विचारलेच नाही! तेव्हा या प्रकाराला स्वयंवर का म्हणावे हा प्रश्नच आहे!’) पाठ आणि पाठभेद यांच्यामधल्या विसंगतीचा प्रत्यय (या सर्व प्रसंगात सीता अजिबात उपस्थित नाही.. .. मग ‘लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा’ कोठून आले?) अशी या प्रत्ययशोधाची उदाहरणं  महाभारताबद्दल लिहिताना ज्याला फडणीस ‘नवीन विचार’ म्हणतात, तोही मूलत: प्रत्ययशोध आहे.
आजच्या काळातून आलेली जिज्ञासा असे प्रत्यय येण्याच्या क्षणांना गती देते. पण अशी जिज्ञासा हा प्रत्ययांचा एकमेव कारक घटक नाही. आणखीही जे अनेक गुण लेखकाकडे असू शकतात, त्यांची गोळाबेरीज ‘जगाबद्दल सजग असणं’ अशी असते. ही सजगता
एखाद्याला अगदी सिनिकल लिखाणाकडे (कशातच काही राम उरला नाही नि जग किती खड्डय़ात चाललंय पाहा- अशाही सुराकडे) नेऊ शकतेच; पण अन्य अनेक ब्लॉगलेखकांप्रमाणे फडणीसही जगण्याच्या आत्ताच्या क्षणावर प्रेम करणारे आहेत. यापैकी बहुतेक ब्लॉगलेखक जगणं म्हणजे स्वत:चं/ (आप्त)स्वकीयांचं जगणं एवढीच व्याख्या करतात, तर फडणीस यांसारखे अनेक जण जगाबद्दलचं कुतूहल आणि माहिती यांची सांगड घालून लिखाणाची उमेद टिकवतात. फडणीस यांच्या ‘आज सुचलेलं’ या ब्लॉगवरची एक जरा जुनी नोंद, मराठीतला श्रावण रिमझिम झरणारा आणि हिंदीतला ‘सावन’ मात्र ‘गरजत बरसत’ येणारा कसा काय, याबद्दल आहे. ती या दृष्टीनं- म्हणजे अंगभूत कुतूहल आणि मिळवलेली माहिती यांच्या मिलाफातून ब्लॉगलेखक एखाद्या नोंदीचं आत्मीकरण कसं साधतात, हे लक्षात येण्यासाठी- पाहण्याजोगी आहे. फडणीस सध्या अमेरिकेतून लिहितात, बातम्या आणि मिळवलेली माहिती यांची फेरमांडणी करतात. या लिखाणावर वर्तमानपत्री प्रभाव दिसतो- ‘टिटबिट’चा छोटासा आकार आणि जुन्या वार्तापत्रांमध्ये असायची तशी अवांतर माहिती खुसखुशीतपणे देण्याची पद्धत ही दोन्ही सकृद्दर्शनी वैशिष्टय़ं इथं आहेत, म्हणून! तरीही फडणीस वेगळे ठरतात. तिखटमीठ न लावता, उगाच पचकल्यासारखी कॉमेंट न करता फडणीस लिहीत असतात. त्यांचं लिखाण टाळी मागत नाही, पण आवडू शकतं.
अशा अनेक नोंदी वाचल्या की फडणीस यांची संदर्भचौकट आणि त्यांच्या कुतूहलाची व्याप्ती इतकी वैविध्यपूर्ण कशी काय, याचं कौतुकमिश्रित नवल वाटू लागेल. पण फक्त वैविध्याबद्दलच दाद देऊन थांबण्याच्या पुढे आपण गेलो की मग वैविध्यामागलं सूत्र आणि त्या सूत्रामागची जीवनदृष्टी- मग त्यातून तयार झालेली लेखनविषयक भूमिका- यांचा अंदाज आपल्याला बांधता येईल. फडणीस यांनी स्वत:ला काय माहीत आहे नि काय नाही, याबद्दल स्पष्ट विधानं केली आहेत. जे माहिती आहे, त्याआधारे आनंद कसा घ्यायचा हे शास्त्रीय संगीताच्या श्रोत्याला जमतं. फडणीस तसे आहेत. (ते शास्त्रीय संगीताचे श्रोते आहेत, हा काही योगायोग नव्हे.) कलानंद निव्वळ भावनिक असू शकत नाही.. तो तुम्ही कसा घेता, तो घेताघेता कोणत्या पायरीवर पोहोचता, हे तुमच्या बुद्धीशी आणि सांस्कृतिक प्रगल्भतेशी निगडित असतं. शास्त्रीय संगीताचा श्रोता तर, कला आणि तिची तंत्रचौकट यांचा एकत्रित आनंद थेटपणे घेऊ शकतो. [अवांतर :  काही श्रोते व्यक्तिनिष्ठेकडे जातात आणि ‘बाकीचे नुस्ते रेकतात’ अशी पठडी शोधून सुखी होतात. संवेदना आणि बुद्धी यांच्या नात्याची जाण असणारे श्रोते, प्रत्येक मैफलीत कान उघडे ठेवून गाण्याचा प्रत्यय घेत असतात.] मैफलीबद्दल पुढे कधीतरी आप्तसुहृदांना सांगताना, हा प्रत्यय कसा होता याचं निरूपणही करतात. स्वत: न गाता गाण्यापर्यंत- संगीताच्या व्याप्तीपर्यंत- पोहोचण्याचा मार्ग अशा श्रोत्यांना गवसलेला असतो. याच प्रकारे, जगणं समजून घेण्याचा मार्ग (उदाहरणार्थ) महाकाव्यं, पुस्तकं आणि बातम्या यांमधून गवसलेले काही जण.. त्यात फडणीस आहेत, कारण मैफलीतून संगीताच्या एकूण अनुभवाकडे जाण्याचा प्रवास जसा अव्याहत असतो, तसंच फडणीस यांचं वाचनातून जगाच्या एकूण व्यवहाराकडे पाहणं – त्याबद्दल लिहिणं- सुरू असतं. ‘हे स्वत:ला सुचलेलं कुठेय?’ हा प्रश्न इथे गैरलागू ठरतो.
उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता :
http://thoughtfortuday.blogspot.in/
तुम्हाला वाचनीय वाटणाऱ्या ब्लॉगची सकारण शिफारस किंवा प्रतिक्रिया, सूचना पाठवण्यासाठी :
wachawe.netake@expressindia.com

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!