पूर्वजांचा सूड वंशजांवर काढण्याचा कोणालाही अधिकार नाही. पूर्वजांचा गौरव हे स्वत:चे कर्तृत्व असल्यासारखे मिरवणे किंवा पूर्वजांना हीन लेखले गेले याआधारे स्वत:त ग्रस्ततागंड कुरवाळत बसणे, हे व्यर्थ आणि आत्मघातकी आहे. कोणीच अर्ज करून जन्माला येत नाही. इतिहास हा शिकण्यासाठी असतो, त्यात अडकण्यासाठी नव्हे. नेमके हेच विसरल्याने ‘जातिसंघर्षांतून जातिनिर्मूलन’ या कार्यक्रमाला एक डेड एंड आला आहे..
जातीचे ‘मूळ’ लक्षण म्हणजे तिच्यात जन्मूनच दाखल होणे आणि आतल्या आत लग्ने करणे (एंडोगामी). हे मूळ उपटून काढणे म्हणजे खऱ्या अर्थाने जाती-‘निर्मूलन’ ठरते. आता ही गोष्ट लादून अमलात आणायची असेल तर काय करावे लागेल? राज्यसंस्थेने सक्तीने लग्ने लावणे किंवा सर्व बाळांचे राष्ट्रीयीकरण करून, त्यांचे मूळ आईबाप गुप्त ठेवून, क्रमविहीन (आर्बट्रिरी) फेरवाटप करणे, या दोनच मार्गानी राज्यसंस्थेद्वारे शीघ्रगतीने जाती-‘निर्मूलन’ करणे शक्य आहे. राज्यसंस्थेचे इतके नियंत्रण हे फॅसिझममध्येच कल्पिता येते. असे अघोरी उपाय जर मान्य नसतील तर, जाती-विभाजन नष्टप्राय होत जाणे, ही एक संथ प्रक्रिया असणार, हे प्रथम मान्य करावे लागेल.
तिचे दोनच मार्ग असू शकतात. आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढत जाणे; इतके की विवाह आवर्जून आंतरजातीय ठरण्याइतपत ‘शुद्ध’ जाती वधुवरांना उरणारच नाहीत! या प्रक्रियेला आपण जाती-विलयन असे म्हणू. ही प्रक्रिया जास्तच दीर्घ पल्ल्याची असणार आहे. ती चालू असताना वारंवार जात उल्लेखिली जाणार नाही, अशा तऱ्हेने व्यवहार करून ती शक्यतो आठवणार नाही, याची काळजी घेण्याच्या मार्गाला आपण जाती-विस्मरण असे म्हणू. अनुल्लेख या मार्गाचा अवलंब करावा अशी सूचना प्रकाश आंबेडकर यांनी केली. ही घटना क्रांतिकारक म्हणावी लागेल. कारण जातिनिर्मूलन या नावाखाली जे जे उपाय आणि काही वेळा नुसतेच ‘कवित्व’ केले गेले ते कित्येकदा विस्मरण व विलयन या विधायक प्रक्रियांशी विपरीत असत आलेले आहे.
भारतातील आधुनिक-पूर्व समाजव्यवस्थेत जातिसंस्था आणि ग्रामसंस्था या एकमेकींत घट्ट गुंफल्या गेलेल्या होत्या. बलुतेदारीच्या जागी बाजारपेठ आल्याने जातीचा आर्थिक पाया नष्ट झालेलाच आहे. जाती-संस्थेवर, व्यवसायांचे स्वातंत्र्य व उपलब्धता आणि संमिश्र रहिवास/प्रवास हे जबरदस्त आघात झाल्याने ती विस्मरणाच्या मार्गावर अनायासेच लागलेली होती. जातिसंघर्ष वाढवत नेल्याने, गेलेले स्मरण पुन्हा पुन्हा घोटवले गेले. याउलट मनुस्मृती जाळणे हे फारच उत्तम झाले. बाबासाहेबांनी हे काम आपल्या चित्रे व सहस्रबुद्धे या निकटच्या सहकाऱ्यांच्या हस्ते केले, यातही ते नव्या युगाचे युगपुरुष असल्याचेच दिसून येते. पण नंतरच्या काळात ‘कटू-स्मृतीं’त भर घालत त्या फायरप्रूफ बनवण्याचा प्रयत्न राजकीय फायद्यासाठी केला जात राहिला. आर्थिक पाया नष्ट होत असताना नवा राजकीय पाया प्राप्त झाल्याने, राजकीय गट म्हणून जातींचे जास्त जोमाने पुनरुज्जीवन झाले. राखीव जागा व नाम-मात्र-दान-वाद (टोकनिझम) या ‘एकमेव’ कार्यक्रमाने जातिनिर्मूलन वा समता तर सोडाच, पण सर्व जातींमधील काहींचा आर्थिक स्तर उंचावण्याचे (व्हर्टकिल-मोबिलिटी) कामही बेताबेतानेच केले.
पूर्वयुगीन वर्ण व सद्ययुगीन वर्ण-प्रवृत्ती
पूर्वयुगीन वर्णाना जर ‘वर्गीय’ म्हणजेच शोषक/शोषित हा सिद्धान्त लावायचा झाला तर काय चित्र दिसते? युद्ध-संस्था ही राज्यसंस्थेची जननी आहे. युद्धात जेते ठरून, सत्ता मिळवणारे आणि गाजवणारे क्षत्रिय हेच सर्वोच्च सत्ताधारी ठरतात. तेव्हाचे ब्राह्मण हे कितीही आत्मप्रौढीची वचने बोलले असले तरी वस्तुत: ते क्षत्रियांचे आश्रित व क्षत्रियांना (व आश्रयाने स्वत:ला) सोयीची मिथके (गूढाधारित वा कपोलकल्पित अपसमज) पसरवणारे एजंट या दुय्यम स्थानावरच होते. क्षत्रिय व ब्राह्मण हे दोन वर्ण उत्पादन न करणारे म्हणून ‘शोषक’ या प्रकारचे होते असे मानावे लागेल. उत्पादक असण्याच्या आधारे वैश्य-शूद्र-अतिशूद्र हे शोषित होते असे मानावे लागेल. हे पूर्वयुगीन चित्र झाले. मध्ययुगीन काळात चातुर्वण्र्य हे बहुस्तरीय जाती-ग्राम व्यवस्थेत मुरवले गेले.
आज आधुनिक युगात वरील वर्ण जरी नसले तरी वर्ण-प्रवृत्ती आहेतच. या प्रवृत्तींना आपण आजची ‘वर्ण’गिरी, म्हणू या. आजची ‘क्षत्रिय’गिरी करणारे (अनुत्पादक आणि केवळ सत्तेच्या जोरावर शोषण करणारे) जास्त करून कोणत्या स्थानांवर आढळतील? राजकारणी, नोकरशहा, कायद्यागणिक वेगळाले इन्स्पेक्टर (पाकिस्तानात लष्करशहासुद्धा), गद्दार कर्मचारी आणि वशिल्याचे (क्रोनी) मक्तेदार मालक या स्थानांवर विशेष लक्ष ठेवावे लागेल. खरे तर कोठेही आढळणारे, अडवणूकक्षमता वा उपद्रवमूल्य असलेले घटक हे वाईट अर्थाने ‘क्षत्रिय’गिरीच करत असतात. वर्ण-प्रवृत्तींचे रूपक लावता शोषित कोण? तर उद्योजक, श्रमिक व विकासवंचित हे होत. हे वर्ण-प्रवृत्तीने अनुक्रमे आजचे ‘वैश्य-शूद्र-अतिशूद्र’ होत. (उत्पादक योगदान करणारे बौद्धिक श्रमिक हेही श्रमिकच.)
आता आजची ‘ब्राह्मण’गिरी म्हणजे काय ते पाहू. अनुत्पादक सत्ताधाऱ्यांच्या सोयीची मिथके समाजात पसरवून छत्रछाया मिळवणे हीच व्याख्या आजच्या ‘ब्राह्मण’गिरीलाही लागू पडते. अशी मिथके बरीच आहेत. ‘प्रश्न फक्त वाटपाचाच काय तो आहे’, ‘सरकार हा कल्पवृक्ष गदगदा हलवला की झाले’ तसेच ‘पूर्वगौरव आणि पश्चिमद्वेष’ वगरे. हे एक महत्त्वाचे मिथक आहे. अशी मिथके पसरवणे ही खरी ‘ब्राह्मण’गिरी आहे. ही करायला जन्माने ब्राह्मण असण्याची गरज नाही. कोणत्याही जातीत जन्मलेले मतप्रणालीबहाद्दूर (आयडियालॉग) वा पंडित (अ‍ॅकेडेमिक) वा जनभावनाबाज (डेमॅगॉग) यांच्यावर लक्ष ठेवावे लागेल व मिथके उघडकीला आणावी लागतील. मतप्रणालीबहाद्दूर जर ‘पुरोगामी’ लेबलचे असले तर त्यांच्या मिथकांमध्ये ‘जातीतल्या मोजक्या व्यक्तींचा उद्धार म्हणजे अख्ख्या जातीचाच उद्धार’ हे मिथक हमखास आढळते. त्यातून ब्राह्मणजातीत जन्माला आलेल्यांना जर स्वत:ला ‘पुरोगामी’ ठरवून घ्यायचे असेल तर जास्तच जोरात नव्या ‘ब्राह्मण’गिरीची बांग द्यावी लागते. कितीही जोरात बांग दिली तरी ते पुरोगामिस्तानमध्ये ‘मुहाजिर’च ठरतात. याला काव्यगत अन्याय किंवा घरचा आहेर असे म्हणता येईल.
संख्याशाही, जातिकारण आणि डेड एंड
भारतातील जातिव्यवस्था ही भरपूर स्तरीभूत आहे. प्रत्येकाला खाली पाहावे तर कोणीतरी दिसतेच! काही ना काही अग्रमानदेखील पुरवलेला असतो. उच्च-नीचतेची उतरंड आणि तिचे लोकसंख्येतील वितरण ही गोष्ट सामान्यत: पिरॅमिडल किंवा त्रिकोणी असते. भारतीय जातिव्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ असे आहे की तिचे लोकसंख्येतील वितरण हे शंकरपाळा किंवा काजूकथलीसारखे (ऱ्हॉम्बस) आहे. म्हणजे संख्याबलाचा विचार केला(जो निवडणुकांमध्ये महत्त्वाचा ठरतो) तर मध्यजाती सर्वात सबळ आहेत. जसे खाली जावे तशी आणि जसे वर जावे तशीही (संख्यात्मक) दुर्बलता वाढत जाते. संख्याबलाच्या जोरावर मध्यजातींच्या व्यक्तींना राजसत्ता जास्त मिळाली. पण तिच्या जोरावर आपल्या  जातिबांधवांचा उद्धार कसा करणार? ‘प्रातिनिधिक-समते’मुळे प्रत्यक्षात फरक पडत नाही, पण अपेक्षा मात्र निर्माण होऊन बसतात. मध्यजातींमधील अरिष्ट (क्रायसिस) नेमके हे आहे. जे दुर्बल आहेत त्यांना भरीव मदत करणे खर्चीक असते. आरक्षण व नाम-मात्र-दाना(टोकन)ने जसे नामांतर, सरकारला खर्च येत नाही. हे चक्क फुकटात फुटवणे आहे. आर्थिक-वंचितता ही जास्त महत्त्वाची म्हणून आर्थिक निकष लावावा हे जास्त चांगले. पण मुख्य मुद्दा निकष आर्थिक की ‘सामाजिक’? हा नसून व्यक्तीला की समूहाला? हा आहे. मंडल आयोगाने तथाकथित आर्थिक निकष लावला पण तो जातींना! व्यक्तींना नव्हे!! म्हणजे ज्या जातीतले तळचे वर्ग-स्तर जास्त दु:स्थितीत आढळले ती अख्खी जात ‘इतर मागास’ ठरली आणि क्रीमी-लेअरचा प्रश्न उभा राहिला. ज्यांचे इतर मागासपण मंडलच्या आर्बट्रिरी निकषांनी थोडक्यासाठी हुकले ते तर एकीकडे पूर्वयुगीन क्षत्रियत्वाचा अभिमान आणि दुसरीकडे सद्ययुगीन शूद्र ठरवून घेण्याची गरज, या विचित्र शृंगापत्तीत अडकले गेल्याने सरभर झालेत.
शत्रूकेंद्री विचारसरणी ही मार्क्‍सवादातील नेमकी नको ती गोष्ट उचलून, त्यातला ‘वर्ग’ हा शब्द कट करून ‘जात’ हा पेस्ट केला की भारतातील पुरोगामित्व सापडलेच, अशी समजूत करून घेतली गेली. शत्रूकेंद्री विचारसरणीमुळे ‘मी कसा उन्नत होईन?’ या प्रश्नाच्या जागी ‘खापर कोणावर फोडायचे?’ हा प्रश्न येऊन बसतो. जो आपल्याहून तथाकथित उच्च तो खलनायक हे त्याचे सोपे उत्तर बनते. खरे तर ‘आत्मोद्धाराच्या प्रेरणे’इतके मोलाचे जगात काहीच नाही. ही एकच गोष्ट अशी आहे की जी राजकारणी लोक आपल्याला देऊ शकत नाहीत. (उलट असलेली काढून घेतात.) पण खापरफोडेपणात अडकलेल्या मध्यजातींना जन्माने ब्राह्मण हे सॉफ्ट टाग्रेट दिसू लागले. खरे तर ‘जन्माने ब्राह्मण’ लोकांनी आधुनिक बनण्यासाठी कसून प्रयत्न केले व बरेचसे बनलेदेखील. पण त्यातून उरलेल्या सुप्त वर्चस्ववाद्यांना व भयगंडग्रस्तांना ‘सनातन-प्रभात’ किंवा ‘परशुराम-प्रतीक’ छापाच्या प्रतिक्रियावादी दुष्प्रवृत्तींकडे ढकलण्याचे काम आता जातिसंघर्षांने सुरू केले आहे. जातिसंघर्षांतून जात्यंत या अत्यंत स्वयंव्याघाती कल्पनेचा हा डेड एंड आहे.
* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.  त्यांचा ई-मेल rajeevsane@gmail.com