श्रीगोंदवलेकर महाराज यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून माणसाचं जगणं परमार्थमय व्हावं, यासाठी आयुष्यभर मोठय़ा खुबीनं बोध केला. याचं कारण हे की प्रपंच आपल्याला सोडवत नाही. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘प्रपंचाला वाईट म्हणणारा साधू आपल्याला आवडत नाही.’’ (बोधवचने, अनु. ६१३) ‘‘प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कोणीच सांगत नाही, आणि तसे सांगितले तरी कोणी ऐकत नाही, पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा, हेच सर्वस्व मानू नका.’’ (चरित्र/ प्रसंग- जग हे असं आहे, पृ. २७१) तेव्हा आपण प्रपंचात पूर्ण जखडून आहोत. गाळात रुतलेल्या माणसाला गाळातून बाहेर पडताच येऊ नये किंवा त्यानं पडायचा प्रयत्न केला तर तो अधिकच गाळात रुतत जावा, तसे आपण प्रपंचात, या जगात, दुनियादारीत रुतून आहोत. उलट त्यावर आपलं मनापासून प्रेमही आहे. मी अगदी निर्जन स्थळी गेलो तरी कोणत्या ना कोणत्या रूपात जग माझ्या अवतीभोवती असतंच आणि त्यापेक्षा व्यापक जग माझ्या अंतरंगात विचाररूपाने, प्रतिमारूपाने, कल्पनारूपाने असतं. या प्रपंचाचा उगम ‘मी’पणाने बरबटलेल्या वासनेत आहे. अंतरंगातील सूक्ष्म जगाचा आधार माझी वासना अर्थात इच्छा, कामना आहे आणि तिच्या होकायंत्रानुसार मी बाह्य़ जगात वावरत असतो. अर्थात माझा उगम आणि या जगातला वावर हा वासनाप्रेरित आहे. मासा जसा पाण्यातच जन्म घेतो आणि पाण्याशिवाय तो कधीच राहू शकत नाही त्याप्रमाणे सूक्ष्म अर्थानं आपला जन्म वासनेतच होतो आणि वासनेशिवाय आपण राहू शकत नाही. अंतरंगातला सूक्ष्म प्रपंच आणि तिच्याच आधारावर दृश्य प्रपंचाचा होत असलेला विस्तार हा या वासनेतूनच प्रसवला आहे. हा प्रपंच अत्यंत चिवटपणे अंतर्बाह्य़ आपल्याला चिकटून आहे. आता दृश्यातला प्रपंच जितका खरा आहे तितकाच आतला प्रपंचही आहेच. पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे असलेली माझी ओढ हादेखील प्रपंचच आहे. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय.’’ (चरित्र/ प्रपंचविषयक बोधवचने) एखाद्यानं स्थूल अर्थानं घरादाराचा त्याग केला आणि पुढे धर्मप्रचारासाठी आश्रम काढला. पण त्याच्या मनात अनुयायांची संख्या वाढविण्याचा मोह उत्पन्न झाला आणि लोकांकडून आदर, प्रेम मिळावे, अशी इच्छा निर्माण झाली तर तोदेखील प्रपंचीच! श्रीएकनाथमहाराजांनी ‘चिरंजीवपदा’त त्याचं मार्मिक वर्णन केलं आहे. तेव्हा या प्रपंचातून कोण सुटला आहे? त्यामुळे श्रीमहाराज स्थूल प्रपंच सोडायला सांगत नाहीत. तो सोडणं एक वेळ सोपं आहे पण अंतरंगातला प्रपंच सुटणं कठीण आहे. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘वासना मारणे कठीण आहे. वासनेत आपला जन्म आहे. ती मारणे म्हणजे स्वत: मरणे आहे. ते कोण पत्करील?’’ (बोधवचने, अनु. २००)