श्रीगोंदवलेकर महाराज यांनी नित्यनेमाबाबत सांगितलेला विचार आपण जाणून घेत आहोत. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘..जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमीच नित्यनेमात असतो.. आपल्याला सदा नामात कसे राहता येईल, याचा विचार करावा. याकरिता गुरुआज्ञा प्रमाण मानणे हेच खरे साधन आहे. गुरू सांगेल तोच नित्यनेम होय. त्याला शरण जावे. रोज थोडेसे वाचन, त्यानंतर मनन, मननानंतर त्याप्रमाणे आचरण आणि शेवटी गुरुस अनन्य शरण, हाच साधकाचा साधनाक्रम आहे आणि हाच नित्यनेम आहे.. केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये; साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे. ’ (९ फेब्रुवारीच्या प्रवचनातून) ‘फार नेम करू नये,’ या वाक्याच्या अर्थाची झलक जाणवली का? ‘प्रथम नेम करावा, परंतु फार नेम करू नये,’ या वाक्यात ‘फार’ हा अंतरंगातील खोलीला नव्हे तर दृश्यातील त्याच्या व्याप्तीकडे संकेत करणारा आहे. अवडंबराला लागू आहे. नित्यनेम म्हणजे नित्य जो भगवंत त्याचं स्मरण ठेवण्याचा नेम. नित्यनेम म्हणजे अनित्यात न गुंतण्याचा अभ्यासपूर्वक प्रयत्न. तो कसा साध्य होईल? तर श्रीसद्गुरुंचा जो बोध आहे त्याचं मनन करीत त्यानुसार आचरणाचा प्रयत्न सुरू केला तरच! आता आज ते होत नाही कारण ज्या मनानं नित्याचं स्मरण राखायचं तेच मन अनित्य अशा दुनियेच्या मननात गुंतलं आहे. मनाचा एक विशेष असा की मन ज्या गोष्टीवर केंद्रित होतं तिच्या विचारानं आणि प्रभावानं ते व्यापून जातं. त्यामुळे मनाच्या या क्षमतेचा उपयोग नित्याच्या प्रभावानं मन आणि त्यायोगे जीवन व्यापून जावं, यासाठी करता येऊ शकतो. त्यासाठी मनात नित्याचं बीज रुजवलं पाहिजे. ते बीज रुजविण्याचा उपाय म्हणजे नाम आहे. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘भगवंताचे स्मरण राहील व ते प्राणाबरोबर सांभाळता येईल असा नियम असावा. नेम अगदी सुटसुटीत व सहज करता येण्यासारखा असावा.’’ (बोधवचने, अनु. १०२) आता नाम हे सुटसुटीत साधन आहे, सहज आहे. ते कुणीही, कोणत्याही स्थितीत आणि कुठेही सहज घेऊ शकतो. मृत्युशय्येवर तळमळणारा माणूस जवळच्या आप्तांच्या नावाचा पुकारा करतो, याचाच अर्थ प्राणाबरोबर जर काही सहज सांभाळता येत असेल तर ते केवळ नामच आहे! हेच नाम जर समजून केलं तर ते भगवंताचं स्मरण घडविणारं साधनही आहे. ते समजून करण्यावरच श्रीमहाराजांचा भर आहे. म्हणूनच ते सांगतात, ‘नेम आहे म्हणून उगीच करू नये.’ या ‘उगीच’चा अर्थ त्यांच्याच शब्दांत अधिक स्पष्ट झाला आहे- ‘‘नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम कर्ता आहे या भावनेने.’’ (बोधवचने, अनु. ८५) जर दुनियाकेंद्रित होऊन, दुनियेनंच व्यापून मन जर नाम घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो नेम उगीच करायचा म्हणून करणे आहे. त्याचाही उपयोग होईल, यात शंका नाही पण वेळ फार लागेल आणि तो जो आवश्यक वेळ आहे तिथवर माझे साधन सुरूच राहील, याचीही हमी नाही. त्यामुळे नामस्मरण जे करायचे ते राम कर्ता आहे, या भावनेने समजून केले पाहिजे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”