सीमेवर गोळीबार झेलत निधडय़ा छातीने शत्रूला सामोरे जाताना वीरमरण पत्करणाऱ्या लष्करातील जवानाविषयी समाजात जी कृतज्ञता आणि आदर असतो, त्याच भावना आज एका चोरटय़ाला पकडण्याच्या प्रयत्नात मरण पत्करलेल्या एका वीर पोलिसाविषयी मुंबईकरांच्या मनात दाटलेल्या असतील, यात शंका नाही. डोंगरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अजय प्रभाकर गावंड नावाच्या या निधडय़ा छातीच्या पोलीस शिपायाने आपल्या कर्तव्यदक्षतेचा आगळा आदर्श तमाम पोलीस दलासमोर ठेवून रविवारी देह ठेवला.
वाडीबंदर परिसरातील एका इमारतीत शिरलेल्या चोरास जेरबंद करण्यासाठी दाखल झालेल्या पोलीस पथकात हा ४३ वर्षांचा तरुण होता. पोलिसांचा सुगावा लागताच चोरटय़ाने इमारतीची गच्ची गाठली आणि तेथून पोलिसांवर दगडांचा मारा सुरू केला. त्याला तोंड देतच अजय गावंड त्याच्यापर्यंत पोहोचले आणि चोरटय़ाने एका मजबूत लाकडी दांडय़ाने त्यांच्या मस्तकावर प्रहार केले. पहिला प्रहार झेलूनही गावंड डगमगले नाहीत. मस्तकावर जीवघेणे प्रहार झेलत त्यांनी चोरटय़ाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांना वीरमरण आले. गावंड नावाच्या एका शूर शिपायाच्या या कहाणीने आज पोलीस दलात सर्वत्र हळहळ पसरली आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेने आणि निधडय़ा छातीने संकटाला सामोरे जात कर्तव्य बजावण्याच्या भावनेने अवघे पोलीस दल भारावले आहे. पोलीस दलास अलीकडे मरगळ आली आहे, तक्रारींची दखल घेण्यातच टाळाटाळ होत असल्याने तपास तर लांबची बाब असल्याची भावना समाजात बळावत चालली आहे. त्यातच, पोलीस दलाची प्रतिमाही पहिल्यासारखी स्वच्छ राहिलेली नाही. साहजिकच, समाज आणि पोलीस यांच्यातील विश्वासाचे नाते अलीकडे दुरावत चाललेले असताना, अजूनही पोलीस दलात कर्तव्याचे कठोर पालन करणारा एक वर्ग आहे, याचा वस्तुपाठच अजय गावंड यांनी समाजासमोर ठेवला आहे.
पोलीस भरतीच्या वेळी अतिश्रमामुळे तरुण उमेदवारांचा मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे काही महिन्यांपूर्वी खळबळ माजली होती. पोलिसांवरील मानसिक व शारीरिक तणावाबद्दलही अनेकदा चिंता व्यक्त होत असतात. समाजापासून काहीशा अंतरावरच राहण्याची प्रवृत्ती पोलिसांमध्ये बळावल्याचे दिसत असताना जिवावर उदार होऊन कर्तव्य बजावणाऱ्या अजय गावंड यांनी आपल्या हौतात्म्यातून समाज आणि पोलीस यांच्यातील हे वाढू पाहणारे अंतर पुसले आहे. पोलीस दलातही माणसे आहेत आणि त्यांना सामाजिक सुरक्षेच्या कर्तव्याचे भान आहे, त्यासाठी ते प्राणांची बाजी लावतात, हे उदाहरण मागे ठेवून गेलेले अजय गावंड हे मुंबई पोलिसांसमोरील कायमचा आदर्श म्हणून गणले जातील.