जगभरात सवंग पत्रकारितेला ऊत आलेला असताना आणि मूल्यांची ढासळण होत असताना बातमीच्या विश्वासार्हतेबद्दल आग्रही असणाऱ्या आणि ती कायम टिकवणाऱ्या,  उपेक्षितांच्या बाजूने कायम उभ्या राहणाऱ्या एका पत्रकाराला जग मुकले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे पत्रकार डेव्हिड कार यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले.  
कार यांचा जन्म ८ सप्टेंबर १९५६ रोजी अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील हॉपकिन्स येथला.  ‘टाइम्स’मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी ‘द अटलांटिक मंथली’ आणि ‘न्यूयॉर्क’ या नियतकालिकांसाठीही लिखाण केले. ‘टाइम्स’च्या सुरुवातीच्या काळात ते सांस्कृतिक कार्यक्रमांचे वार्ताकन करीत. त्या वेळी त्यांचा कार्पेटबॅगर नावाचा स्तंभ चांगलाच गाजला होता. त्यात ते सिनेपुरस्कार वितरण सोहळ्यांवेळी होणाऱ्या घटनांविषयी लिहीत असत. मात्र ‘टाइम्स’मध्ये दर सोमवारी येणाऱ्या त्यांच्या ‘द मीडिया इक्वेशन’ या स्तंभासाठी ते खास ओळखले जात. त्यात ते प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञान यांचा परस्परसंबंध या विषयावर प्रामुख्याने लिखाण करत. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आयुष्यात यशस्वी झालेल्या अनेक व्यक्तींच्या प्रयत्नांना त्यांनी प्रकाशात आणले. पॅरिसमधील ‘शार्ली हेब्दो’ या व्यंगचित्र साप्ताहिकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल लिहिले होते. मात्र त्यांच्या प्रामाणिकपणाची खरी झलक दिसते ती २००८ साली त्यांनी लिहिलेल्या ‘द नाइट ऑफ द गन – अ रिपोर्टर इन्व्हेस्टिगेट्स द डार्केस्ट स्टोरी ऑफ हिज लाइफ- हिज ओन’ या आत्मचरित्रात. आपल्या तरुणपणी कार कोकेन आणि दारूच्या आहारी गेले होते; पण अमली पदार्थाच्या व्यसनातून आपण कसे निश्चयपूर्वक बाहेर पडलो याचे कोणताही आडपडदा न ठेवता आणि ज्या विश्लेषक भूमिकेतून ते बातमी लिहीत त्याच भूमिकेतून, स्वत:ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, त्यांनी केलेले वर्णन म्हणजे वस्तुनिष्ठतेचा परिपाठच आहे.  मात्र त्यातून बाहेर पडून त्यांनी उभारी घेतली आणि जागतिक कीर्तीच्या पत्रकारांमध्ये नाव कमावले. ‘फ्रंट पेज’ नावाची ‘न्यूयॉर्क टाइम्स’वरील प्रसिद्ध डॉक्युमेंटरी खरे तर त्यांच्याच जीवनाचा माहितीपट आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपादकांसह व्यवस्थापनानेही एक असामान्य पत्रकार हरपल्याची हळहळ व्यक्त केली. त्यांनी काही काळ बोस्टन विद्यापीठात पत्रकारितेच्या अध्यापनाचेही काम केले; पण आजकाल पत्रकारितेच्या महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळत नसल्याची खंत ते व्यक्त करत.