चार आण्यांची भांग घेतली की हव्या तेवढय़ा कल्पना सुचतात, हे वाक्य लोकमान्य टिळक यांनी उच्चारले त्याचे संदर्भ वेगळे होते. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या अनेक नेत्यांना मात्र कोणत्याही संदर्भात अशा भांगेची आवश्यकता पडत नसून, त्यांना सत्तेची नशाच एवढी चढली आहे की त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष बृहस्पतीलाही सुचणार नाहीत अशा कल्पना सुचत आहेत. नशा कोणतीही असो, तिने जिभेवरील ताबा तर सुटतोच. त्यात आजवर प्रामुख्याने खासदार साक्षी महाराज, उमा भारती अशांचे नाव आघाडीवर होते. त्यात नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही उडी घेतली. अपंगत्व ही परमेश्वराची चूक असल्याचे विधान करून त्यांनी शरीरशास्त्रात चांगलीच भर घातली. शिवाय अपंगत्व प्रत्यक्ष परमेश्वराचीच करणी असल्याने त्यात हस्तक्षेप करणे ही गहन मानवी चूक ठरणार, म्हणजे सरकारच्या आरोग्य खात्याची जबाबदारीही कमी होणार. त्या विधानाची ही आडपैदास कोणाच्या फारशी लक्षात आली नसावी. अशा नेत्यांच्या या यादीमध्ये आता केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या नावाचा समावेश करणेही क्रमप्राप्त आहे. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाणारे डॉ. शर्मा उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अ‍ॅमिटी विद्यापीठाने मानद डॉक्टरेट बहाल करून गौरविलेल्या शर्माजींना त्यांच्या सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दिल्ली हिंदूी साहित्य संमेलन पुरस्कार, जायंट्स इंटरनॅशनलचा पुरस्कार हे त्यातलेच काही. अशा या उच्चशिक्षित आणि संस्कारी महापुरुषाच्या कामाची पावती म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे संस्कृती आणि पर्यटन या दोन खात्यांचा स्वतंत्र कार्यभार सोपविला असावा.  कदाचित या कामाचा ताण सहन न झाल्यानेही त्यांच्या मस्तकात अत्यंत अचाट विचारांचे पर्यटन सुरू झाले असावे. आपल्या सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी परमेश्वरावर सोपविण्याची अफलातून अशा योजनेची वैचारिक मुहूर्तमेढ त्यांनी नुकतीच ठोकली.  जम्मू-काश्मीरमधील सुमारे ३७ हजार २४४ चौरस किलोमीटरच्या अक्साई चीन या भागावरून भारत आणि चीनमध्ये वाद असून, या भागावर सध्या चीनचा ताबा आहे. या अक्साई चीनमध्ये आपण धार्मिक वास्तू म्हणजे अर्थातच मंदिरे उभारली असती, तर चीनची काय बिशाद होती तिकडे वाकडा डोळा करून पाहण्याची, असे डॉ. शर्मा म्हणाले. जेथे धर्म असतो तेथे विजय नक्कीच असतो, असे म्हटलेलेच आहे. त्यानुसार येथून पुढे देशाचे नीट संरक्षण व्हावे असे वाटत असेल, तर सीमेवर देवस्थाने उभारावीत, असेही त्यांनी सुचविले. वस्तुत: संघाच्या बौद्धिकांवर पोसलेल्या डॉ. शर्मा यांना सोमनाथ आणि तत्सम धनाढय़ मंदिरांचा इतिहास ठाऊकच असेल. तरीही त्यांनी असे विधान करावे याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणावे की भोळेपणा हे सांगणे कठीण आहे. मात्र त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यापुढील काम किती अवघड आहे याचीच प्रचीती येते. या अशा बाष्कळ वटवटवीर मंत्र्यांबाबत एखादा वटवटहुकूम काढून मोदी यांनी त्यांना अधिक ‘चांगले’ काम दिल्यास ती मोठीच राष्ट्रसेवा ठरेल.