एकाच कुटुंबातील तीनही पिढय़ा व्यासंगी असण्याचे दुर्मीळ उदाहरण कोसंबी यांच्या घरात घडले. डॉ. डी. डी. कोसंबी यांच्यासारख्या इतिहासकार असलेल्या प्रगाढ विद्वानाची मुलगी आणि बुद्धाचे ज्येष्ठ अभ्यासक व पाली भाषेचे पंडित डॉ. धर्मानंद कोसंबी यांची नात असणे, ही डॉ. मीरा कोसंबी यांच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट ठरली. वडिलांचा संशोधनाचा वारसा त्याच प्रज्ञेने पुढे सुरू ठेवण्यात त्यांना यश आले आणि आपल्या पंचाहत्तर वर्षांच्या आयुष्यात समाजशास्त्रातील विविध संशोधनाने त्यांनी हे यश अधोरेखित केले.   
एसएनडीटी विद्यापीठात महिलाविषयक अभ्यास केंद्राच्या संचालक म्हणून प्रदीर्घ काळ काम करताना भारतीय समाजातील स्त्रीच्या विविधांगी अभ्यासाने त्यांनी या विषयाकडे अनेक पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केला. समाजशास्त्रज्ञ म्हणून डॉ. मीरा कोसंबी यांनी केलेले संशोधन जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त झाले, याचे कारण त्यामध्ये मूलभूत विचारांची एक पक्की बैठक होती.  बदलत्या समाजव्यवस्थेत स्त्रीचे स्थान, हा त्यांच्या सगळ्याच संशोधनाचा गाभा होता. नागरीकरणामुळे स्त्रीच्या जीवनात घडत गेलेले बदल समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून टिपताना त्यांनी मांडलेले निष्कर्ष महत्त्वाचे मानले गेले. कोणत्याही विषयातील अभ्यासाला सर्जनाची जोड मिळाली, की त्याचे महत्त्व वेगळेपणाने उठून दिसते.
डॉ. डी. डी. कोसंबी किंवा मीरा कोसंबी यांच्या अभ्यासात ही नवसर्जनाची जोड नेहमीच स्पष्टपणे दिसून येते. स्टॉकहोम विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केल्यानंतर भारतातील महिलांचे प्रश्न समजून घेण्याच्या प्रयत्नांत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन केले; मग ते मुंबई शहरात घडून आलेले सामाजिक बदल असोत, की भारतातील वाढते नागरीकरण असो.   समाजात सतत घडून येणाऱ्या नव्या गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष असे. त्यामुळे ‘भारतातील खासगी उद्योग क्षेत्रातील महिलांची निर्णयक्षमता’ या विषयावर संशोधन करण्याची आवश्यकता त्यांना जाणवली. ‘पंडिता रमाबाई’ हा त्यांच्या अभ्यासाचा नित्य विषय. रमाबाई यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्यावर ग्रंथलेखन केले. रमाबाईंनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचे भाषांतर करून त्यांनी एकोणिसाव्या शतकातील सामाजिक सुधारणांच्या इतिहासावर वेगळा प्रकाश टाकला.  
केवळ संशोधन हाच ध्यास असलेल्या मीरा कोसंबी यांनी निवृत्तीनंतरही आपला व्यासंग सुरू ठेवला. त्यांच्या निधनाने समाजशास्त्राच्या संशोधनातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!