दुर्गा शक्ती नागपाल या तरुण प्रशासकीय अधिकाऱ्यावरील निलंबनाच्या कारवाईनंतर वादळ निर्माण होऊनही अखिलेश यादव यांना कोणताही खेद वाटत नाही. प्रस्थापित व्यवस्थेत सशक्त आणि सुदृढ दुर्गा सर्वानाच नकोशा असतात हे जितके खरे तितकेच, काही अधिकारी निलाजरे आणि लाचार निपजल्यामुळे राजकारणाऱ्यांना अधिकाऱ्यांवर दंडेली करण्याची सवय लागते, हे प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या संघटनेने मान्य करावयास हवे.
राजकारणात मर्दुमकी गाजवलेल्यांच्या कर्तबगारीत पुढील पिढीत संक्रमित होताना मोठय़ा प्रमाणावर घट होते. राहुल गांधी ते उद्धव ठाकरे ते ओमार अब्दुल्ला व्हाया मिलिंद देवरा आदी उदाहरणांवरून या सिद्धान्तांची सत्यासत्यता तपासता येऊ शकेल. या अकर्तृत्ववानांच्या मालिकेत शिरोमणी म्हणून शोभावे असे नाव म्हणजे अखिलेश यादव. या यादवकुलोत्पन्न मुलायमसुताने उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्यापासून हैदोसच घातला आहे. उच्चविद्याविभूषित, आधुनिक चेहऱ्याच्या, संगणक संस्कृतीशी सुपरिचित अशा उत्तर प्रदेशच्या कायापालटाचे स्वप्न दाखवणाऱ्या या नेत्याची अल्प कारकीर्द वडील बरे होते.. असे म्हणायला लावणारी आहे, यातच काय ते आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद मुलायमसिंग यांनी एकापेक्षा अनेक वेळेस भूषविले. त्यांचा राजकीय पराभव झाला. परंतु त्यांच्याविषयी घृणा म्हणता येईल अशी भावना जनतेत निर्माण झाली नाही. तशी ती होऊ नये म्हणून मुलायमसिंग आपला डाव अत्यंत चलाखपणे खेळत गेले. परंतु वडिलांना जे जमले नाही ते या अखिलेशाने करून दाखविले असे म्हणावयास हवे. सत्ता सोपविली गेल्यानंतर इतक्या लवकर स्वत:विषयी इतकी सार्वत्रिक नाराजी निर्माण करण्यासाठीदेखील कसब लागते. त्याचा अखिलेश यादव यांच्याकडे अमर्याद साठा असावा. इतका की या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती काळजी वाटावी अशी आहे असे विधान तीर्थरूप मुलायमसिंग यांना करावे लागले. यावरूनही कु. अखिलेश याने काही धडा घेतलेला दिसत नाही. असे वाटण्याचे कारण म्हणजे दुर्गा शक्ती नागपाल या तरुण प्रशासकीय अधिकाऱ्याबाबत निर्माण झालेले वादळ. या अधिकारी महिलेने बेकायदेशीररीत्या उभारण्यात येत असलेल्या मशिदीची अपूर्ण असलेली भिंत पाडली म्हणून तिला निलंबित करण्याचा निर्णय अखिलेश यांच्या सरकारने घेतला. पण हे कारण फसवे असल्याचे लगेच उघड झाले. कारण स्थानिक गावकऱ्यांनीच ती भिंत पाडण्याची तयारी दाखवली होती. तेव्हा या दुर्गेवर कारवाईची तलवार कोसळली ती अन्य कारणाने हेही स्पष्ट झाले. ते कारण म्हणजे बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करणाऱ्यांना तिने लावलेला चाप. उत्तर प्रदेश ही बेकायदेशीरांची समृद्ध कर्मभूमी आहे. हे बेकायदेशीर दैत्य सरकारी आo्रयामुळे पोसले जातात आणि त्यांना कोणी अडवणारा भेटला की त्यालाच दूर करतात. दुर्गा शक्ती यांच्याबाबत हेच घडले. बेकायदेशीर वाळू उत्खनन त्यांनी रोखले, त्या कृत्यात गुंतलेल्यांची सामग्री जप्त केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली, हे उघड झाले. परंतु मुलायमसुताचा मस्तवालपणा असा की या कारवाईबद्दल त्यांना ना खेद वाटला ना खंत. उलट आपल्या सरकारने केले ते योग्यच केले असाच अखिलेश यांचा सूर असून बेकायदेशीरतेच्या बाबत पोरगा बापसे सवाई निपजल्याखेरीज असे होणे शक्य नाही. वास्तविक त्यांना लाज वाटावी अशी आणखी एक बाब या कारवाईबाबत घडली. ती म्हणजे ही कारवाईच अखिलेश यांच्या अपरोक्ष घडली. मुख्यमंत्री या नात्याने अखिलेश यांना या कारवाईची पूर्वकल्पना दिली गेली नाही. दुर्गा शक्ती यांच्याबाबत कारवाईचा आदेश निघाल्यावर आणि वर्तमानपत्रांनी आवाज उठवल्यावरच त्यांना याबाबत काय ते कळले. अर्थात त्यांना ती पूर्वकल्पना असती तरी फारसे काही वेगळे घडले नसते. कारण आपणास बिघडत्या कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीबाबत कोणतीही चाड नाही हे अखिलेश यादव यांनी अनेकदा सप्रमाण सिद्ध केले आहे. इतका बेधुंद कारभार त्या राज्यात व्हावा यास अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे तेथे एक नव्हे तर तीन तीन मुख्यमंत्री आहेत. मुलायमसिंग यांचे बंधू हे अखिलेश यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मुख्यमंत्र्यांचे काका हेच खरे मुख्यमंत्री असे प्रशासनात मानले जाते. म्हणजे स्वत: नेताजी मुलायमसिंग, त्यांचे बंधू शिवपालसिंग यादव आणि स्वत: अखिलेश. समाजवादी पक्षाच्या या सत्तेच्या उतरंडीतील र्दुी आहेत ते स्वत: अखिलेश. म्हणजेच सगळय़ात कमी अधिकार आहेत ते मुख्यमंत्र्यांना.
असे घडते तेव्हा त्यामागे आणखी एक कारण असते. ते म्हणजे प्रशासनाची अशक्तता. गेली काही वर्षे सर्वच पक्षांच्या सत्ताधाऱ्यांनी वरिष्ठ नोकरशाहीस लाचार करून ठेवले आहे. परंतु यास जितके राजकारणी जबाबदार आहेत तितक्याच प्रमाणावर हा अधिकारी वर्गदेखील जबाबदार आहे. आपले काम सत्ताधीशांच्या मागे लागणे वा त्यांच्या तालावर नाचणे हे नसून कायद्याने जे योग्य आहे तेच करणे आहे हा कर्तव्यपालनाचा मूलभूत धडा हा अधिकारी वर्ग विसरला. कोणत्याही व्यवस्थेस कर्तव्यदक्ष व नि:स्पृह अधिकारी वर्ग पसंत नसतो हे अर्धसत्य आहे. पूर्णसत्य हे की नेक आणि नैतिक राजकारणी हा सत्तेला चटावलेल्या अधिकाऱ्यांनाही नको असतो. त्यामुळे राजकारणी आणि प्रशासन या दोन्हींतील अप्रामाणिक आणि बेशरमांना सोयीची व्यवस्था हवी असते. लाचार अधिकारी आणि भ्रष्ट राजकारणी हा समसमासंयोग अशा व्यवस्थेसाठी परस्परपूरक असतो. ही परस्पर सौख्यदायी सोय जास्त काळ स्थिरावली आणि तिला कोणीच अटकाव घातला नाही तर त्याचे रूपांतर संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट होण्यात होते. तसे ते झाले की एखादी दुर्गा वा एखादा अरुण भाटिया वा एखादा अशोक खेमका हा प्रस्थापितांना खुपतो आणि उत्तर प्रदेशात जे काही घडले ते घडू लागते. दुर्गा शक्ती यांच्यावरील कारवाई मागे घेतली जावी यासाठी प्रशासकीय अधिकारी संघटनेने आता जोर लावला आहे. ज्याच्यावर स्वार व्हावयाचे तो घोडा निघून गेल्यावर मांड टाकता येत नाही, हे साधे तत्त्व या उत्तरप्रदेशी अधिकाऱ्यांना ठाऊक नसावे. आपल्यातीलच काही अधिकारी बंधू निलाजरे आणि लाचार निपजल्यामुळे राजकारणाऱ्यांना अधिकाऱ्यांवर दंडेली करण्याची सवय लागते, हे या अधिकाऱ्यांच्या संघटनेने आधी मान्य करावयास हवे. एखाद्या दुर्गेवर अन्याय झाला की जणू हे काही आक्रीतच अशी प्रतिक्रिया द्यावयाची आणि राजकारण्यांबाबत बोटे मोडायची एवढेच केल्याने काहीही साध्य होत नाही. राजकारणी असोत की अन्य कोणी. त्यांच्याविरोधात नैतिकतेच्या बळावर ठाम उभे राहावयाचे तर अंगी सत्त्व असावे लागते. परंतु प्रस्थापित व्यवस्था ही सत्त्वहीनांचीच जोपासना आणि पैदास करीत असून त्यामुळेच हे असे प्रकार वारंवार घडतात. आता या दुर्गा शक्तीच्या रक्षणार्थ सोनिया गांधी सरसावल्या आहेत. या अधिकारी महिलेवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिल्याचे प्रसिद्ध झाले आहे. हे सारे प्रसिद्धीसाठीच. नपेक्षा त्यांना या अधिकारी वर्गाची वा नैतिकतेची कणव असती तर आपला जामात रॉबर्ट वडेरा याच्या जमिनीच्या व्यवहारात कारवाई करणाऱ्या अशोक खेमका या अधिकाऱ्याची मुस्कटदाबी त्यांनी होऊ दिली नसती. खेमका याच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या असत्या तर दुर्गा शक्ती हिचा आवाज दाबण्याची हिंमत उत्तर प्रदेश सरकारला झाली नसती.
तेव्हा सोनिया असोत की मुलायमसिंग. प्रस्थापित व्यवस्थेत सशक्त आणि सुदृढ दुर्गा सर्वानाच नकोशा असतात. त्यामुळेच.. क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा.. असे म्हणण्याची वेळ आता या नवदुर्गावरच आली आहे. वास्तवात, दुर्गाचे जगणे दुर्घटच असते.