विद्याचरण शुक्ल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. काही काळ ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेते होते. ते इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात होते. तसेच ते व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांच्या बिगर-काँग्रेसी मंत्रिमंडळातही होते. म्हणजे त्या अर्थाने ते तसे कोणत्याच पक्षाचे नव्हते. सत्ता हाच त्यांचा पक्ष होता. आपल्या राजकीय संस्कृतीचा हाही एक चेहरा आहे आणि त्याचे ते प्रतीक होते. पण त्यांची खरी ओळख ही नाही. भारतीय राजकारणाचा पट आजकाल अशा प्रतीकांनीच भरलेला असल्याने विद्याचरण शुक्ल यांच्यासारख्या नेत्यांच्या आयाराम-गयाराम वृत्तीबद्दल आज कोणास काहीच वाटेनासे झालेले आहे. शुक्ल यांची खरी ओळख ही आहे, की ते आणीबाणीचा एक चेहरा होते. ‘इमर्जन्सी’च्या तीन दलालांत त्यांचा समावेश होता. आणीबाणीकडे आज आणि तेव्हाही दोन पद्धतीने पाहिले जात होते. काहींना आणीबाणी म्हणजे इंदिरा गांधी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे अपत्य वाटत होते, तर डांगेवाद्यांसह इतरांना ती राष्ट्रहिताची बाब वाटत होती. आणीबाणीबद्दल अशी मतभिन्नता असली, तरी एका गोष्टीबद्दल सार्वकालीन एकवाक्यता आहे, ती म्हणजे त्या काळात ज्या नेत्यांनी अक्षरश धुमाकूळ घातला, शाह आयोगाच्या भाषेत सांगायचे, तर ज्यांनी मध्ययुगीन जमीनदारांप्रमाणे आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला, त्यात विद्याचरण यांचे नाव अग्रभागी होते. इंदिरा गांधी यांनी त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रिपद दिले होते, पण ते स्वत:च ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ बनले. राजापेक्षाही अधिक राजनिष्ठा दाखविण्याच्या नादात त्यांनी सेन्सॉरशिपचा असा काही खेळ मांडला, की वृत्तपत्रांत कोरी चौकट ठेवणे हाही अजामीनपात्र गुन्हा ठरला. ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटाची चित्रपटबाह्य़ कथा हा तर शुक्ल यांच्या सेन्सॉरशिपचा अजरामर किस्साच आहे. काँग्रेस सरकार आणि खास करून संजय गांधी यांच्या मारुती मोटारनिर्मितीच्या उपक्रमावर उपहासगर्भ टीका करणाऱ्या या चित्रपटाच्या सर्व प्रतीच त्यांनी नष्ट करून टाकल्या होत्या. किशोरकुमार यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात गाण्यास नकार दिला म्हणून आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांची गाणी वाजविण्यास बंदी घालण्याचा शुक्ल यांचा निर्णयही असाच सत्तांधतेचे दर्शन घडविणारा होता. आणीबाणीच्या त्या प्रचंड अस्थिर, संशयग्रस्त कालखंडात तगणे हेच जगणे होते आणि त्यासाठी जे आवश्यक होते, तेच सगळ्यांनी केले असे म्हटले, तर ते एक वेळ मराठीतील तेव्हाच्या मध्यमवर्गीय कलमबहाद्दरांबाबत मान्य करता येईल. पण या युक्तिवादाच्या आधारे शुक्ल यांच्यासारख्या समर्थाच्या वर्तणुकीचे समर्थन करणे अवघड आहे. मध्य प्रांत आणि बेरारचे आणि स्वातंत्र्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या पं. रविशंकर शुक्ल यांच्यासारख्या सुसंस्कृत स्वातंत्र्यसनिकाच्या घरात ज्यांचा जन्म झाला, त्या विद्याचरण यांच्या डोक्यात सत्तेची हवा अशा प्रकारे जावी हे दुर्दैवीच होते. पण सत्ता हेच त्यांचे जीवनध्येय राहिले होते. छत्तीसगढच्या निर्मितीनंतर ते सत्तेपासून दूर फेकले गेले होते. पण वयाच्या ८४ व्या वर्षीही त्यांची सत्ताकांक्षा कमी झालेली नव्हती. त्यासाठी कष्ट उपसण्याचीही त्यांची तयारी होती. भाजपच्या सरकारविरोधातील यात्रेमध्ये या वयातही ते सहभागी झाले होते. गेल्या महिन्यात त्याच यात्रेवर नक्षलवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यातच मंगळवारी त्यांचे निधन झाले. येत्या २६ जून रोजी आणीबाणीचा ३८वा स्मृतिदिन आहे. त्याच्या १५ दिवस आधी आणीबाणीचा हा चेहरा पडद्याआड जावा हा विचित्रच योगायोग म्हणायचा.