‘अकाउंटिंग स्टँडर्ड्स’ कशी वाकवावीत, कायदे वा नियमांना मुरड घालून धूळफेकीचे गुन्हे कसे सुखेनैव करावेत याची माहिती असलेले आणि तसल्या मार्गाने पैसा ओढू पाहणारे, हे एकत्र आल्यास अनर्थ घडू शकतो. अमेरिकेतील एका कंपनीने, केवळ ‘येणे रक्कम’ मोजण्याची पद्धत बदलण्यासारख्या करामती केल्या होत्याच..

सगळ्या वित्तीय आणि आर्थिक निर्णयांना पाहिजे असते ती व्यवहाराबद्दलची रोकडी आकडेवारी. ही आकडेवारी बव्हंशी उपजते लेखापालांनी ठेवलेल्या आणि मांडलेल्या नोंदींमधून. हे हिशोब राखण्यामागे मुख्य उद्देश असतो तो एकूण उलाढालीचे पाठपुरावा करणारे, माग काढणारे चित्र बाळगणे व उलाढालीतून अंतिम फलित काय निघते ते ‘पडताळा आणि वर्ताळा’ रूपाने दाखविणे. पण हे सगळे व्यवहार नोंदवताना देखील अनेक प्रश्न असतात. त्याला वेगवेगळी पर्यायी उत्तरे असतात. कोणत्या परिस्थितीत कुठले तत्त्व वापरून नोंदणी केली तर अधिक वास्तव, अधिक नेमके, विश्वासार्ह चित्र दिसेल याबद्दल आता निव्वळ मार्गदर्शक तत्त्वेच नाहीत तर मानक ऊर्फ मानदंड (Standards) उपलब्ध आहेत. या प्रत्येक मानदंडामागे एका बाजूला अर्थिक कारण-विचार आहे. दुसरीकडे जे घडले त्याचे खरे, फसवणूक न करणारे चित्रच मिळावे असा आग्रह आहे. भागभांडवल पुरविणारे लोक जोखीम पत्करून भांडवल पुरवितात, तसेच बँका कर्ज देतात. त्यांच्या हाती रोजच्या व्यवसायाच्या किल्ल्या नसतात. आपण पुरविलेल्या भांडवलाचा विनियोग यथायोग्य होतो की नाही यावर त्यांना हरघडी पाळत ठेवता येत नाही. त्यांची फसवणूक, दिशाभूल आणि वंचना होऊ नये याकरिता ठरावीक मुदतीने व्यवसायाची वित्त परिस्थिती जाहीर करणे सक्तीचे असते. ही माहिती मोलाची असते. तिचे खरे-खोटेपण, संभाव्य त्रुटी हिशोब नोंदणाऱ्या लेखापालाने कशी नोंदली यांवर अवलंबून असतात.
या नोंदणीत गफलत, घोटाळा असेल तर वित्तीय लबाडीला असंख्य वाटा फुटू शकतात. हिशेबनिसांतले ‘जीवाजी कलमदाने’, त्यांची जाणती/ अजाणती हेळसांड व मानदंडकांचा गैरवापर हा वित्तीय धूर्ताचा एक राजमार्ग असतो. त्याचा वापर करून अनेक वर्षे डोळ्यांत धूळ फेकणारे गुन्हे झाले. त्यांना पायबंद घालण्यासाठी नवीन नियम, नवी पुस्ती, नवे मानक सांगणारे फर्मान निघते. पण कायद्यांना वा नियमांना चकविणे आणि दोन पावले पुढे राहणे हे तर गुन्हेविश्वातले इंगित असते. विशेषत: जे नियम व संकेत बनवितात त्यांनीच हिरवा कंदील दाखविल्याने झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाणदेखील लक्षणीय असते. पांढरपेशा गुन्ह्यांत जरा अधिकच!
शेअरबाजारात दर तिमाही, सहामाही वा सालानुसार येणारी कंपन्यांची वित्तीय माहिती हा किमतीचे झोके पैदा करणारा एक घटक असतो. जर कंपनीच्या आतल्या वा बाहेरच्या कुण्या ‘टोळीने’ या माहितीची मुरड घातलेली चित्रेच बाजारात फैलावली तर त्यांना हव्या त्या दिशेला शेअरच्या किमती ओढत ठेवता येतात. गुंतवणूक करणारे बाजारगप्पांवर भरवसा ठेवतात. या बाजारगप्पांना प्रतिष्ठित रूप देणारा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यांना म्हणतात विश्लेषक. पूर्वी विश्लेषक हा तटस्थ, आकडेवारीची चिकित्सा करणारा मर्मज्ञ समजला जाई. गेल्या तीन-साडेतीन दशकांत या विश्लेषकांना शेअरबाजाराने भतलेच ‘आत्मसात’ करून घेतले आहे. तीच गत झाली आहे कर्जाच्या गुंतवणुकीची, सुरक्षा जोखणाऱ्या कर्ज मानकऱ्या (क्रेडिट रेटिंग) कंपन्यांची. कर्ज पुरविणाऱ्या बँका, शेअर्सची प्राथमिक गोळाबेरीज करणाऱ्या र्मचट बँका तसेच शेअर्सच्या किमतीची चढ-घट करणारे नंदी व भल्याथोराड गुंतवणुकीची सरमिसळ रोज बदलणारे वित्तनिधींचे व्यवस्थापक यांची आता सांगड वित्तबाजारात रूढ झाली आहे. त्यांच्या संयुक्त कल्लोळामधून बाजारात जे उपजते ते कंपन्यांच्या प्रत्यक्ष स्थितीशी पार विसंगत असू शकते. अनेकदा त्या विसंगतीच्या मुळाशी असते कंपन्यांच्या वित्तीय नोंदणीमधील अफरातफर. याची वानगी म्हणून अमेरिकेतल्या कम्प्युटर असोसिएट्स या कंपनीचा मासला बघू.
कम्प्युटर असोसिएट्स ही जुन्या अवाढव्य ‘मेनफ्रेम’ संगणकांसाठी आज्ञाप्रणाली संच (सॉफ्टवेअर) पुरविणारी कंपनी. गिऱ्हाईकाच्या गरजेनुसार आज्ञाप्रणाली संच (सॉफ्टवेअर) लिहून द्यायचे. त्यांना गरज पडेल तसे बदलून द्यायचे. ते ठीकठाक चालू ठेवण्यासाठी सालोसाल देखभाल व राखणूक करायची, असे त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप होते. अर्थातच गिऱ्हाईकांशी होणारा सौदा दीर्घकालपर्यंत उदा. तीन वर्षे, पाच वर्षे, दहा वर्षे सेवा पुरविण्याचा असायचा. त्याचा मोबदला म्हणून कंत्राट मिळताना काही रक्कम सुरुवातीलाच मिळायची. उरलेला मोबदला सालोसाल वा तिमाही सेवाकाल लोटल्यावर प्रत्यक्षात रोख रूपाने त्या त्या वेळी मिळायचा. समजा १२५ कोटींचे कंत्राट आहे. २५ कोटी या वर्षीच रोखीने मिळणार. उरलेले १०० कोटी पुढील पाच वर्षे २० कोटी दरसाल.
वित्तीय व्यवहारांत भावी काळातल्या येणे रकमेचे आजचे (आजमितीचे) मोल सांगण्याची प्रथा आहे. समजा व्याजदर दहा टक्के असेल तर आजच्या १०० रुपयांचे वर्षभराने ११० रुपये होतात. म्हणजेच वर्षभराने मिळणाऱ्या ११० रुपयांचे सध्याचे मोल आहे १०० रु. असे उलटे पाहिले तर व्याजाच्या दरालाच कसरीचा दर म्हणतात. कम्प्युटर असोसिएट्सने याचा वापर करून आपल्या सालाना उत्पन्नाची रक्कम फुगविली. म्हणजे जणू काही १२५ कोटी आजमितीलाच ‘पावले’ अशा रीतीने आपले उत्पन्न दाखवणे आरंभले. त्याआधारे कम्प्युटर असोसिएट्सचा शेअर भरधाव वर जाऊ शकला. एकदा ही शेअरची किंमत वरच्या दिशेने चळली की अनेकांचे डोळे वळतात. शेअर पुन्हा वर सरकतो.
आता ‘लेखातत्त्वा’नुसार (अकाउंटिंग प्रिन्सिपल) पाहिले तर प्रत्यक्ष रोख उत्पन्न असे २५ कोटीचेच अवतरले आहे. कंत्राटानुसार येणारी उर्वरित रक्कम फक्त ‘भावी येणे’ आहे. प्रत्यक्ष रोखीच्या प्रवाहापेक्षा भावी येणे झपाटय़ाने वाढले तर समजावे की दाखविलेले उत्पन्न एका अर्थाने काल्पनिक आहे. समजा कंत्राटात काही वाद उपजला, रक्कम देणे असणारा गिऱ्हाईकाचा धंदाच  बुडीत गेला तर ही रक्कम निव्वळ कागदावर राहणार. ती जणू आताच रोख पावली असे नोंदणे हेच लेखादृष्टय़ा चुकीचे, गैरलागू व फसवणूक करणारे आहे. लेखातत्त्व सांगते की जेवढे काम पुरविले त्या प्रमाणातच उत्पन्न नोंदवा. प्रत्यक्षातील रोखीचे प्रवाह व ‘नोंदलेले’ उत्पन्न यात मोठी तफावत असते. त्याचे स्पष्टीकरण अहवालात नोंदवा. पण तळटीपांकडे कोण लक्ष देतो! या तळटीपांच्या पैंजणात घणाणत्या धोक्याच्या घंटा असू शकतात.
या कंपनीने आपले उत्पन्न नोंदवायची ही न्यारी कल्पना पत्करताना सिक्युरिटी एक्सचेंजला कळविले होते? त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांनी ही रीत पत्करली ती कशासाठी. त्याचे रहस्य त्यांनी सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनला कळविलेल्या कंपनीच्या निर्णयामध्ये होते! कंपनीचे तीन नोकर हे कळीचे नोकर म्हणून जाहीर केले होते. कंपनीच्या शेअर्समध्ये त्यांना विशेष सहभाग होता. जर कंपनीच्या शेअर्सची किंमत ठराविक पातळीपर्यंत उंचावून त्याच पातळीला ती एक महिना राहिली तर त्यांना काही वाढीव शेअर्स बहाल होणार असे कंपनीने एक्सचेंज कमिशनला कळविले होते. ही एवढी एकच खास बाब जरी कुणाच्या ध्यानी आली असती, तर कंपनीचे उत्पन्न फुगवून शेअर्सची किंमत वरचढ राखण्याचे रहस्य जगाला कळले असते.
याच कंपनीने आणखी एक लेखा करामत करून दाखविली होती. साधारणत: दर तिमाही कालावधी ९१.२५ दिवसांचा असतो. परंतु दर तिमाहीला नव्याने आलेल्या कंत्राटी उत्पन्नाची रक्कम फुगवणे हाच हेतू असल्यामुळे हे तिमाहीचे दिवस ९१ दिवसांऐवजी ९६, ९७, ९८ असे दिवस भरायचे. उद्देश एवढाच की पुढच्या तिमाहीतला व्यवहार पण आदल्या तिमाहीमध्ये दाखविता यावा. परिणामी या कंपनीच्या लेखातत्त्वानुसार तिमाहीचा अखेरचा महिना ३७/३८ दिवसांचा असायचा. त्यावरून या तिमाही अखेरचा महिना किती दिवसांचा? ३५ की ३९ असे विनोदही सर्रास व्हायचे. वराहमिहीर ते ग्रेगोटीपर्यंतच्या महान पंचांगकारांना ‘लेखा’ तत्त्वाने दिलेली ही अनोखी आदरांजली! अशाच ‘लेखा’ असलेल्या पण नीट न जोखलेल्या हिशोब शकलीमुळे आणखी बडे घोटाळेदार कंपनी-नाटय़ घडले! त्या कंपनीबरोबरीने त्यांचे लेखापरीक्षण करणारी कंपनी बंद पडली! त्यांच्या शेअर्सची भलावण करणाऱ्या गुंतवणूक कंपन्यांचे पितळ उघडे झाले त्याचे नाव एन्रॉन! त्याबद्दल पुढच्या वेळी.

लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते.  त्यांचा ईमेल: pradeepapte1687 @gmail.com