मराठी आणि बंगाली भाषांत १९४० च्या दशकापर्यंत अव्याहत सुरू असलेल्या प्रबोधनपर्वाने, या दोन्ही भाषक समाजांचे चारित्र्य घडवले.. त्यातून अभ्यासू आणि समाजनिष्ठ, कर्मशील ज्ञानवंतांची फळीच या दोन्ही भाषक समाजांमध्ये उभी राहिलेली दिसते. अशा ज्ञानवंतांमध्ये बांगलादेशचे विद्वान व ज्येष्ठ कार्यकर्ते, बांगलादेशी स्वातंत्र्यसैनिक प्रा. ‘सरदार’ फजलुल करीम यांचा समावेश होतो. रविवारी पहाटे त्यांचे निधन झाल्याने ८९ वर्षांचा हा प्रबोधनकाळाचा एक दुवा निखळला आहे. त्यांनी आयुष्यभर सारे ग्रंथलेखन बंगालीतूनच केले, ती १७ पुस्तके आता त्यांचे विचारसंचित म्हणून मागे उरली आहेत. त्यातही ‘दर्शनकोश’ हा त्यांनी सिद्ध केलेला तत्त्वज्ञान-कोश पुढील बंगालीभाषक पिढय़ांनाही मार्गदर्शक ठरणारा आहे.
ढाका विद्यापीठात वयाच्या एकविसाव्या वर्षांपासून (सन १९४६) ते शिकवू लागले, त्याही अगोदर बंगालमधील १९४३ च्या दुष्काळाने व्यथित होऊन, त्यांनी थेट गरिबांमध्ये मिसळून मदतकार्यात भाग घेतला होता. पूर्व बंगालचा ‘पूर्व पाकिस्तान’ होणे कुणाही बुद्धिजीवींना रुचलेले नव्हते. साहजिकच पाकिस्तान सामिलीकरणविरोधी चळवळीत सरदार फजलुल करीमही उतरले. बुद्धीला मार्क्‍सवादी तेज, समाजात चटकन मिसळण्याची आवड आणि तयारी तसेच अभ्यासपूर्ण वक्तृत्व या फजलुल करीम यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे पाकिस्तानी शासकांनी त्यांना ‘उचलले’ आणि नऊ वर्षे तुरुंगात ठेवले. तेथेही, कैद्यांना चांगली वागणूक मिळण्याच्या मागणीसाठी वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांनी आरंभलेल्या ५८ दिवसांच्या उपोषणात ते सहभागी झाले होते. मात्र १९५४ मध्ये पाकिस्तानच्या घटनासमितीत, पूर्व विभागाचे एक प्रतिनिधी म्हणून त्यांचा समावेश करून, त्यांना चुचकारण्याचे पाऊलही उचलण्यात आले. त्यानंतरची काही वर्षे बरी गेली, पण १९५८ नंतर हुसैन सुऱ्हावर्दी यांच्या राजवटीत पुन्हा फजलुल हसन यांना दोनदा तुरुंगवास घडला. एकंदर २३ वर्षे पाकिस्तानच्या कब्जात बांगलादेश होता, त्यापैकी ११ वर्षे फजलुल कारावासातच होते आणि उरलेल्या १२ वर्षांत त्यांना या ना त्या कारणाने विद्यापीठाबाहेर ठेवण्याची तजवीज करण्यात पाकिस्तानधार्जिणे सरकार धन्यता मानत होते.
अशा स्थितीत, सुरुवातीस ‘प्लेटोर रिपोब्लिक’ ‘आरिष्टोटलेर पालिटिक्स’ अशी बंगाली सटीक भाषांतरे फजलुल यांनी केली. जाँ जाक रूसो, प्लेटो, एंगल्स हे त्यांनी बंगालीत आणले. पुढे समकालीन बुद्धिवंतांशी साधलेल्या संवादाच्या पुस्तकासह, अनेक विचारप्रवर्तक पुस्तके त्यांनी लिहिली, त्यात त्यांचे आत्मचरित्रही आहे. राजकारणात चमकण्याची संधी असूनही त्या क्षेत्रापासून ते दूर राहिले. त्यांच्यासारखे बुद्धिवंत बांगलादेशी राजकारणात असते, तर आज त्या देशाचे राजकीय चित्र निराळे दिसले असते.