18 September 2020

News Flash

विरचनावादी भारतीय दार्शनिक

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय समाजात ‘कॉर्पोरेट भांडवलशाही’ या नावाची नवी व्यवस्था राजमान्यता घेऊन येथे स्थिरावत आहे.

| April 17, 2014 12:54 pm

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय समाजात ‘कॉर्पोरेट भांडवलशाही’ या नावाची नवी व्यवस्था राजमान्यता घेऊन येथे स्थिरावत आहे. या खासगी व सरकारी नवलूटमारशाहीत वर्ण-वर्ग-जात-स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद उभा करण्याचे आव्हान पेलणे ही भौतिक आणि तात्त्विक गरज आहे, याची जाणीव करून देणारे विचारवंत शरद पाटील यांना वाहिलेली ही आदरांजली..
इंग्रजी विद्येचा परिणाम म्हणून ब्रिटिश भारतातील वैचारिक विश्वात दोन घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे ‘आपण आपली प्राचीन दार्शनिक परंपरा समजावून घेतली पाहिजे’ हे नवे भान भारतीयांमध्ये जागे झाले. दुसरी घटना म्हणजे आपली दार्शनिक परंपरा इतर कुणी तरी समजावून देण्यापेक्षा आपणच ती समजावून दिली पाहिजे, असे आणखी एक नवे भान जागे झाले. ‘समजावून देणे’ ही गोष्ट दोन पातळीवर अमलात आली. पहिली पातळी भारतीय दार्शनिक परंपरेचा जगाला यथार्थ परिचय करून देणे ही होती आणि दुसरी पातळी या परंपरेचा येथील नेटिव्ह जनतेलासुद्धा यथार्थ परिचय करून देणे ही (आजही) आहे. नेटिव्ह जनतेला केवळ परिचय करून देणे, एवढय़ावर भागणार नव्हते तर येथे मूळ धरलेल्या इम्पोर्टेड इंग्रजी विद्येमुळे भारतीय जीवनशैलीत होणारे बदल समजावून देणेसुद्धा आवश्यक होते. हे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ अशा दोन प्रकारे झाले, असे आज म्हणता येते.
स्वातंत्र्यपूर्व काळात यातील पहिल्या पातळीवरील काम बऱ्यापकी झाले; पण नेटिव्ह जनतेला यथार्थच काय, पण साधा परिचय करून देणेसुद्धा अवघड होते. कारण ‘आपल्या दार्शनिक परंपरेचे भान’ या नावाची गोष्ट उघडपणे या दार्शनिक परंपरेचेच कर्मफळ असणाऱ्या वर्णजातीलिंगभेदाच्या भयावह जोखडाखाली दाबले गेले होते. शिवाय ही जाणीव करून दिली की मुख्यत: शूद्र असलेली नेटिव्ह जनता बंड करेल ही भीती सनातन्यांना होतीच; तरीही इंग्रजी विद्येचे दर्शन अटळ होते.
 ‘दर्शन परंपरा’ उच्चवर्ण असलेल्या ब्राह्मणी पकडीत होती. साहजिकच जगाला ती समजावून देण्याची पहिल्या पातळीवरील जबाबदारीही ब्राह्मणी विद्वानांची होती. ती त्यांनी प्रामाणिकपणे  पार पाडली. (अर्थात त्यात अनेक पेच आहेत.)
 इंग्रजी विद्येतील उदारमतवादाबरोबरच जडवाद ही नवी तात्त्विक प्रणाली भारतीयांना परिचित झाली. या जडवादावर आधारलेली नवीन विचारसरणी म्हणजे मार्क्‍सवाद. ‘वर्ग’ हा या विचारसरणीचा मुख्य वादाचा मुद्दा होता. पण वर्ग नव्हे तर ‘जात’ हा चच्रेचा मुख्य मुद्दा आहे, याची जाणीव चच्रेच्या केंद्रस्थानी आणली ती सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याआधी त्यांनी ‘मूकनायक’मध्ये मार्क्‍सच्या ‘दास कॅपिटल’ या ग्रंथाचे आणि मॅक्झिम गॉर्कीच्या ‘आई’ कादंबरीचे क्रमश: प्रकाशन केले आणि स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.    
स्वातंत्र्योत्तर काळात या जडवादी तत्त्वज्ञानाचे भारतीयीकरण करणे आणि ती येथील सामाजिक व राजकीय समस्या सोडविण्यास समर्थ आहे, असे नवे भान जागे करणे हे आव्हान होते. याचाच अर्थ ‘भारतीय मार्क्‍सवाद’ या नावाचा नवा विचार आणि चळवळ राबविणे. त्याच वेळी हा मार्क्‍सवाद परंपरेतील कोणत्या दर्शनाशी जुळू शकतो किंवा नाही, याचे भान जागे करणे गरजेचे होते.
तथापि भारतीय मार्क्‍सवादाची त्याच्या परिचयापासूनच या देशात शोकांतिका होत गेली होती. भारतीय मार्क्‍सवाद पद्धतशीरपणे भारतीय झाला नाही. म्हणजे जातजमात आणि उच्चवर्णीय स्त्री ते शूद्रातिशूद्र स्त्रीची व्यथा ‘भारतीय मार्क्‍सवाद’ या नावाने विकसित झालेल्या विचारसरणीत मांडली गेली नाही. या मुद्दय़ावरून (सवर्ण मार्क्‍सवादाने पूर्ण दुर्लक्ष केल्याने) आधी आंबेडकरांचे धर्मातर झाले आणि नंतर भारतीय मार्क्‍सवादात फूटतूट झाली.  
मार्क्‍सवाद हा पर्याय नसून विश्लेषणाची पद्धती आहे, याचे भान आधीच्या मार्क्‍सवाद्यांनी दिले होते. तथापि त्याचा विकास भारतीय दर्शनांच्या संदर्भात कसा करावयाचा याचा पहिला धडा कॉम्रेड शरद पाटील यांनीच दिला. व्यवहार आणि तत्त्वज्ञान यांची सांगड कशी घालता येते, याचे थेट प्रात्यक्षिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी करून दाखविले.
शरद पाटील यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला दिलेले योगदान कोणते? शरद पाटील यांचे तत्त्वज्ञान कोणते? कुंठित विचार प्रवाहित केला, याचा नेमका अर्थ काय? तर मार्क्‍सवाद-फुले-आंबेडकरवाद विश्लेषण पद्धती, त्यातूनच विकसित झालेली सौत्रान्तिक मार्क्‍सवादी पद्धती आणि वर्ण-वर्ग-जात- स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद, हे तीन मुख्य सिद्धान्त हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे.
भारतीय समाजाचे विश्लेषण करणे व उपाय सुचविणे यासाठी केवळ मार्क्‍सवाद अथवा फुलेवाद किंवा आंबेडकरवाद पुरेसा नाही. भारतीय समाजवास्तव इतके भीषण आहे की या तिन्हींचा मेळ घालून काहीएक नवी विश्लेषण पद्धती रचली तरच भारतीय वास्तवाचे अस्सल भान येऊ शकेल, हे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणजे ‘दार्शनिक सत्य आणि भौतिक मुक्ती कधी चिरस्थायी, त्रिकालाबाधित नसते. कालचे सत्य आजचे असत्य बनून (त्या) अस्थिर सत्याला अधिक दुबरेध करते. कालची मुक्ती आजची गुलामगिरी बनून (त्या) अस्थिर मुक्तीला आणखी अस्थिर करते’ हे त्यांचे प्रतिपादन.  
या तीनही सिद्धान्तांचे त्यांचे स्वत:चे साहित्य, त्यांच्यावर झालेली टीका, त्याला त्यांनी दिलेली उत्तरे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्या तपशिलात जाण्यासाठी त्या साहित्याकडेच थेट वळणे आवश्यक राहील.   
आजच्या (खरे तर कालच्या), उत्तराधुनिक तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत मांडावयाचे झाले तर शरद पाटलांचे कार्य विरचनावादी (डीकन्स्ट्रक्शन) आणि पुनर्रचनावादी (रीकन्स्ट्रक्शन) म्हणता येईल. महाभारत, रामायण, उपनिषदे, पुराणे आणि मिथके तसेच अनंत भाकडकथा यांच्या महाकथनाच्या (ग्रँड नॅरेशन) जडशीळ ओझ्याखाली दबलेली अब्राह्मणी परंपरा त्यांनी मोठय़ा शर्थीने मुक्त केली. या महाकथनाचे उत्तर बारीकसारीक कथाकथनांनी नाही तर मूळ महाकथनांची विरचना करून देता येईल, असे त्यांच्या बाजूने म्हणता येईल.
भारतीय दार्शनिक आणि सांस्कृतिक जीवन केवळ ब्राह्मणी नाही तर तिला समांतर अब्राह्मणी चेतना काम करते, ती कळीची भूमिका बजावते, हे त्यांनी दिलेले भान मौलिक आहे. विशेषत: कथा, पुराणे, मिथके आणि स्त्री-शूद्रांच्या समांतर साहित्यातून त्यांचा इतिहास उलगडतो. इतिहास वर्तमानकाळाला प्रभावित करीत असतो, म्हणजेच वर्तमानकालीन समस्यांची मुळे इतिहासात असतात. इतिहास पुरुषी बनला, त्याने स्त्री-शूद्रांची मानवी जीवनविकासातील भूमिकाच नाकारली. म्हणूनच ‘घटनांची निवड’ हा इतिहास लेखनातील धोका आहे, हे त्यांच्या ‘निऋती’ या संकल्पनेच्या विश्लेषणातून समजते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातून आयात करण्यापेक्षा बौद्ध, जैन परंपरेतून लाभू शकतात, त्यांची बीजे स्त्रीसत्तेत शोधता येतात, पण म्हणून पुन्हा स्त्रीसत्ता यावी असे नव्हे तर; समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी वर्ण-वर्ग-जात-स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद अनिवार्य आहे, याची जाणीव शरद पाटील करून देतात.      
शरद पाटील उत्तराधुनिक तत्त्वज्ञानाच्या विश्लेषण पद्धतीकडे वळले असते तर कदाचित ते आणखी नवे अन्वेषण पद्धतीशास्त्र शोधू शकले असते. त्यांच्या माफुआ आणि सौत्रान्तिक मार्क्‍सवादी पद्धतीचा त्यांच्या वारसदाराकडून विकास न झाल्यास शरद पाटील हेच शेवटचे माफुआवादी आणि सौत्रान्तिक मार्क्‍सवादी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2014 12:54 pm

Web Title: feature article dedicated homage to the thinker comrade sharad patil
Next Stories
1 मतदात्यांचा मोक्ष
2 प्रज्ञानाचे प्रेम
3 तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान आणि दर्शन
Just Now!
X