क्रिकेट हा धर्म मानल्या जाणाऱ्या भारतात अव्वल दर्जाच्या खेळाडूंची कमतरता नाही, मात्र आपल्या देशात असे अनेक खेळाडू होऊन गेले की ज्यांच्या सुप्त गुणांकडे दुर्लक्षच झाले. महाराष्ट्राचे हुकमी फलंदाज व यष्टीरक्षक असलेले हेमंत कानिटकर हे अशाच उपेक्षित खेळाडूंपैकी एक खेळाडू होते.
ज्या काळात मर्यादित षटकांच्या सामन्यांचा अभाव होता व केवळ कसोटी सामनेच म्हणजेच क्रिकेट असलेल्या काळात कानिटकर यांनी प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये आपल्या तंत्रशुद्ध शैलीचा ठसा उमटविला. पदार्पणातच शतक झळकावणे ही अतिशय अवघड कामगिरी मानली जाते, मात्र कानिटकर यांनी पहिल्याच सामन्यात शतक ठोकून आपल्या भावी कारकीर्दीची झलक दाखविली. पंधरा वर्षे त्यांनी प्रथम दर्जाची कारकीर्द केली. त्यामध्ये त्यांनी ४२.८७ च्या सरासरीने पाच हजारांहून अधिक धावा केल्या. तेरा वेळा शतकी खेळी खेळताना त्यांनी आपल्या कलात्मक फलंदाजीचा प्रत्यय घडविला. रणजी स्पर्धा ही देशातील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. अशा  स्पर्धेत त्यांनी १९७०-७१ मध्ये महाराष्ट्रास उपविजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे १९७४-७५ मध्ये त्यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाकडून खेळण्याचे भाग्य लाभले. अँडी रॉबर्ट्स याच्यासह अनेक तेज गोलंदाजांचा समावेश असलेल्या विंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. मात्र, जबरी आत्मविश्वास व निर्भीड वृत्ती लाभलेल्या कानिटकरांनी पहिल्याच सामन्यात अर्धशतक फचकाविले. त्यांच्या दुर्दैवाने त्या वेळी फारुख इंजिनीअर, बुधी कुंदरन यांच्यासारखे तुल्यबळ प्रतिस्पर्धी यष्टीरक्षक असल्यामुळे कानिटकर यांची कसोटी कारकीर्द अल्पकाळच ठरली. केवळ दोनच कसोटींमध्ये कानिटकर यांच्यासारख्या महान खेळाडूची बोळवण केली, यासारखे दुर्दैव असूच शकत नाही. तथापि कानिटकर यांनी त्याबाबत कधीही तक्रार केली नाही. अतिशय तत्त्वनिष्ठ, कष्टाळू व सहकारी वृत्ती लाभलेल्या या खेळाडूने राष्ट्रीय कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही दुसरी इनिंग यशस्वी केली. त्यांचा मुलगा हृषीकेश हा देखील अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू आहे. मात्र त्याला राष्ट्रीय संघात घेण्यासाठी त्यांनी कधीही कोणाला गळ घातली नाही. जर त्याच्याकडे गुणवत्ता असेल तर तो आपोआपच संघात स्थान मिळवील हेच त्यांचे तत्त्व होते. निवड समितीवर काम करतानाही त्यांनी सतत याच तत्त्वाचा पाठपुरावा केला. त्यामुळेच ते अजातशत्रू क्रिकेटपटू म्हणून स्मरणात राहतील.