सद्गुरू जीवनात प्रवेश करण्याआधीपर्यंत कर्माचा प्रवाह अज्ञानजन्यच असतो. त्यामुळे अनेकवार हातून दुष्कर्मच होतात. म्हणजे चुकीची कर्म होतात किंवा चुकीच्या रीतीनं होतात. त्यामुळे अशा रीतीनं कर्मचिखलात रुतलेल्या मला त्यातून एकदम कसं सोडवता येईल? उतारावर वेगानं निघालेली गाडी एकदम थांबवून उलट दिशेनं वळवता येत नाही. त्याप्रमाणे जो आवश्यक कर्मेही नीट करू शकत नाही अशा मला संसारात निस्संग व निष्कर्मवान होण्याचा उपदेश करणंही घातकच होईल. माउली सांगतात, ‘‘जें सायासे स्तन्य सेवी। तें पक्वान्नें केवीं जेवी। म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं। धनुर्धरा।।’’ अरे अर्जुना, ज्या अर्भकाला अद्याप आईच्या स्तनातलं दूधही प्यायला कष्ट पडतात त्याच्यासमोर पक्वान्नांचं ताट वाढून काही उपयोग आहे का? ती पक्वान्नं जशी त्याला देता येणार नाहीत, तशी- ‘‘तैशीं कर्मी जया अयोग्यता। तयाप्रति नैष्कम्र्यता। न प्रगटावी खेळतां। आदिकरूनी।।’’ तशी ज्याच्यात साधी कर्मेही नीट करण्याची योग्यतादेखील आलेली नाही त्याला गमतीतदेखील नैष्कम्र्यतेचा बोध करू नये! ‘‘तेथें सत्क्रियाचि लावावी। तेंचि एकी प्रशंसावी। नैष्कर्मीही दावावी। आचरोनि।।’’ (ज्ञानेश्वरी, अध्याय ३). त्याला सत्र्कमच करायला लावावे, त्या सत्कर्माचीच प्रशंसा करावी, नव्हे निष्कर्मवान अशा सत्पुरुषानं ती आचरूनही दाखवावीत! तेव्हा उतारावर वेगानं निघालेली गाडी थांबवता येत नाही, पण दुसऱ्या रस्त्याकडे वळवता येते. तसं दुष्कर्माच्या खाईकडे निघालेली गाडी सत्कर्माच्या चांगल्या रस्त्यावर प्रथम वळवावी लागते. १३व्या अध्यायात माउली म्हणतात, ‘‘..परमात्मा ऐसें। जें एक वस्तु असे। तें जया दिसे। ज्ञानास्तव।। तें एकवांचूनि आनें। जियें भवस्वर्गादि ज्ञानें। तें अज्ञान ऐसें मनें। निश्चयो करी।।’’ परमात्मा हीच एकमात्र सद्वस्तू ज्या ज्ञानामुळे अनुभवास येते त्या अध्यात्मज्ञानावाचून इह-परलोकाविषयीचं सर्व ज्ञान जरी कमावलं तरी ते अज्ञानच आहे. थोडक्यात, अध्यात्मज्ञान हेच खरं, श्रेष्ठ ज्ञान आहे. हे अध्यात्मज्ञान शाब्दिक नाही, ऐकीव नाही. ते अनुभवसिद्ध आहे. तो अनुभव घेण्याची ज्याची तयारी झालेली नाही, ज्याला स्वत:विषयीदेखील योग्य ज्ञान नाही त्याला अध्यात्माचं ज्ञान देऊन काय उपयोग? माउली म्हणतात, ‘‘आंधळोनि हाती दिवा। घेऊनि काय करावा। तैसा ज्ञाननिश्चयो आघवा। वायां जाय।।’’ दिवा हातात घेतला की रस्ता नीट चालता येतो हे खरं, पण दृष्टिहीनाच्या हाती दिवा देऊन काय उपयोग? एकतर त्याच्या सोबत जायला हवं किंवा त्याच्या हाती काठी द्यायला हवी. तसं ज्याला खरी जीवनदृष्टीच नाही, ज्याचं समस्त जीवन अज्ञानानंच भरलं आहे, त्याला कितीही आध्यात्मिक ज्ञान पाजलं तरी ते ऐकण्या-बोलण्यापुरतंच राहाणार. प्रसंग उद्भवताच त्या ऐकीव ज्ञानाचा निश्चय टिकेल का? तेव्हा सद्गुरूंना अशा जिवाला सत्कर्मरत करावं लागतं. अध्यात्म मार्गावरून चालवावं लागतं. उपासनेची काठी हाती देत एकटय़ानं चालण्याचा विश्वासही त्याच्या मनात उत्पन्न करावा लागतो. ज्याचं सर्वस्व कधीच सुटत नाही त्याला सर्वस्वभाव ओतलेलं खरं भजन शिकवावं लागतं!