सत्ता स्थापन करण्यास निघालेल्या नरेंद्र मोदींच्या मनात काय आहे, हे भाजपमधल्या एकाही नेत्याला सांगता येत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी स्वत:ची ‘अजातशत्रू’ ही प्रतिमा उभी करण्यात यश मिळवले असून  त्यांच्या धोरणी वागण्याने परिवारातल्या संघटनांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ‘सब का साथ-सब का विकास’ ही घोषणा ऐकल्यानंतर ज्यांनी मोदींचे ‘काटेरी’ प्रेम अनुभवले आहे, त्यांना हायसे वाटत असेल..
धर्मावर आधारित भारतीय जनता पक्षाची ओळख पुसून काढून विकासाच्या मुद्दय़ावर मते मागण्याची भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना सफल झाली. एकाधिकारशाहीचे मेरुमणी अशी संभावना झालेल्या नरेंद्र मोदी यांची प्रतिमा या निवडणुकीच्या निमित्ताने बदलली. मोदी म्हणजे एकहाती कारभार, मोदी म्हणजे एकलकोंडे, मोदी म्हणजे हिंदुत्वाचा प्रयोग करणारे ‘शास्त्रज्ञ’, अशा विशेषनामांसह नरेंद्र मोदी गेले दशकभर चर्चेत राहिले. त्यांच्या स्वभावातील स्थायी स्वरूपातील गुणदोषांसकट संघाने त्यांना स्वीकारले होते. आता देशवासीयांनीदेखील त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन करण्यास निघालेल्या मोदींच्या मनात काय आहे, हे भाजपमधल्या एकाही नेत्याला सांगता येत नाही.  कुशल प्रशासक असाच कठोर असतो. त्यातही मोदींसारखा कर्मठ प्रशासक असेल तर इतरांना त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी जास्तच कष्ट पडतात. भाजप व संघपरिवाराचे संबंध हे केंद्र व राज्याच्या संबंधांसारखे आहेत. त्यात संघाची प्रमुख भूमिका असते. गुजरात जशी हिंदुत्वाची प्रयोगशाळा होती, तशीच ती संघपरिवारासाठीदेखील प्रयोगशाळाच होती.
ज्या प्रसारमाध्यमांनी नरेंद्र मोदींना २००२ पासून हिटलर ठरविले, त्यांच्यासाठी मोदी ‘प्राइम-टाइम’ नेते झाले आहेत. भाजपलादेखील मोदीनामाचा ज्वर झाला आहे. १९८०-८५ नंतर जन्मलेली व तंत्रज्ञानाने परिपूर्ण भारतातील पहिली युवा पिढी असलेल्यांसाठी मोदींचा विजय भान हरवून टाकणारा आहे. शपथविधीचे निमंत्रण ‘सार्क ’ देशांना विशेषत: पाकिस्तानला दिल्यावर ‘व्हाट्सअ‍ॅप’वर केजरीवाल, राहुल गांधी यांच्यासह अजून एका चेहऱ्याची भर पडली. तिकडे शंकरसिंह वाघेला यांची गळाभेट घेऊन नरेंद्र मोदी यांनी मनातील कटुता दूर झाल्याचा संदेश संघपरिवारातील सर्वच संघटनांना दिला. मोदींचे असे वागणे ना संघासाठी चमत्कारिक आहे ना भाजपसाठी! सत्तेचे स्वत:चे असे एक समर्थन असते. या समर्थनामुळे आता भाजपमधला मोदीविरोध संपला आहे. संघपरिवारातला मोदीविरोध कधीच संपला आहे, पण अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. ज्याप्रमाणे मोदींनी शंकरसिंह वाघेला यांची गळाभेट घेतली, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रण पाठवले, तसाच पुढाकार घेऊन मोदी संघपरिवारात त्यांनी दुखावलेल्या स्वत:च्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांना जवळ करणार का, असा प्रश्न संघपरिवारातून उपस्थित करण्यात येत आहे.
भाजपचे माजी केंद्रीय संघटनमंत्री संजय जोशी यांची व नरेंद्र मोदींची गेल्या आठेक वर्षांत समोरासमोर भेट झालेली नाही. तरीही मोदी व जोशींमधून विस्तव जात नाही. रालोआचे सरकार असताना संजय जोशींचा आब बघण्यासारखा होता. सत्तेत कोणतेही पद नसतानादेखील संजय जोशी यांच्या शब्दाला किंमत होती. जीनांना राष्ट्रभक्त ठरवल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांचा राजीनामा घेण्याची क्रूर जबाबदारी संघाने अखेरच्या क्षणी जोशींकडे सोपवली होती व त्यांनी ती संघनिष्ठेने निभावली. सीडीकांडानंतर संजय जोशी विजनवासात गेले. भाजपच्या संघटनमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर संजय जोशींनी पक्षाने दिलेले वाहन परत केले. सीडी प्रकरणाचे वादळ शमल्यानंतरही जोशींच्या मनात कुणाविषयीदेखील कटुता नाही. गेल्या दहा वर्षांत ना संजय जोशी मोदींविषयी अपशब्द बोलले ना मोदी संजय जोशींविषयी! संघगीतांमधला ‘बंधुभाव’ दोन्ही प्रचारकांनी निष्ठेने पाळला! दोन्ही कुशल संघटक. दोघांभोवती सतत कार्यकर्ते असायचे. संजय जोशी गुजरातमध्ये भाजपचे पदाधिकारी असताना मोदींच्या कार्यशैलीस त्यांचा विरोध होता. त्याचे पर्यवसान वैयक्तिक रोषात झाले. पुढे जोशी दिल्लीत आल्यानंतर हे अंतर अजूनच वाढले. हे अंतर कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला होता. गडकरी अध्यक्ष असताना त्यांनी संजय जोशींना पुन्हा भाजपमध्ये अधिकृतपणे सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतप्त मोदींनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामाच गडकरींकडे पाठवला होता म्हणे. मोदीच नव्हे तर गुजरातमधील सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. त्यावरून जोरात वादंग उठले. परिणामी संजय जोशींना पुन्हा भाजपच्या मुख्य प्रवाहातून पुन्हा बाजूला करण्यात आले. सत्तापिपासू राजकारणी पक्षबदलासाठी आसुसलेले असताना संजय जोशींसारखे कार्यकर्ते आहे त्या परिस्थितीत निष्ठेने काम करीत राहिले.  घराणेशाहीसमोर झुकणाऱ्यांच्या काळात मोदी-जोशींसारखे पक्षाला मातृस्थानी मानणारे नेते- कार्यकर्ते हेच भाजपचे वेगळेपण आहे.
 विश्व हिंदू परिषदेचे डॉ. प्रवीण तोगडिया यांचीदेखील हीच गत. ‘मंदिर वही बनायेंगे’ काळात तोगडियांना खूप महत्त्व आले होते. कट्टर हिंदुत्ववादी, अशीच त्यांची छबी होती. आक्रमकतेचे रूपांतर पुढे प्रक्षोभक भाषणांमध्ये झाले. त्यांनाही मोदींच्या संदेशानंतर बाजूला सारण्यात आले. आपल्याखेरीज दुसऱ्या कुणाचे नेतृत्व उभे राहणार नाही यासाठी केलेली ही तजवीज होती. अर्थात तोगडिया आदी मंडळींनी शांत राहणे म्हणजे भाजपवर उपकारच होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी संघपरिवारातील किती संघटनांना मदत केली, हा प्रश्न हल्ली कुणीही विचारत नाही. भारतीय किसान संघाच्या गुजरातमधील कार्यालयातील सामान कुणाच्या काळात सरकारी अधिकाऱ्यांनी रस्त्यावर टाकले, कुणा-कुणाशी मोदींचे संघटनेत मतभेद होते, कोणत्या संघटनेला मदत नाकारण्यात आली, गुजरातमध्ये संघाचे काम वाढले की भाजपचे काम वाढले, संघाच्या किती प्रचारकांचे मुख्यालय निव्वळ मोदींमुळे गुजरातमधून बदलण्यात आले.. असे गेल्या दशकभरापासून संघपरिवारात चर्चिले जाणारे प्रश्न भाजप विजयामुळे ‘आनंदवनभुवनी’ बुडाले आहेत.
आनंदाच्या क्षणी कटुता विसरावी, असा सल्ला जुनेजाणते देतात. नितीन गडकरी दुसऱ्यांदा अध्यक्ष होऊ नये अशी दिल्लीतील कित्येक भाजप नेत्यांची इच्छा होती. गडकरींविरोधातल्या ‘पूर्ती’ प्रकरणाला याच नेत्यांची मूकसंमती होती. प्रसारमाध्यमांच्या बरोबरीने भाजप नेतेच विरोधकांची जबाबदारी पार पाडत होते. आज पूर्ती प्रकरणाचे वादळ शमले आहे, पण जे झाले त्यानंतर गडकरींच्या मनात भाजप नेत्यांविषयी ना नाराजी आहे ना कटुता! हा वैदर्भीय मोकळेढाकळेपणा म्हणा हवं तर! असा मोकळेपणा नरेंद्र मोदी संघपरिवारातील संघटना, सहकाऱ्यांच्या बाबतीत दाखवणार का? सत्तास्थापनेची धामधूम सुरू असली तरी हा मुद्दा गैरलागू ठरत नाही. समान क्षमता व समान महत्त्वाकांक्षा असलेल्या समकालीन सहकाऱ्यांमध्ये परस्परांविषयी ईर्षां असू शकते, पण त्याची जागा मत्सराने, द्वेषाने घेता कामा नये. आज भाजप सत्ताधारी पक्ष बनला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, नानाजी देशमुख, अटलबिहारी वाजपेयी यांच्या समृद्ध परंपरेचे पाईक असलेले नरेंद्र मोदी आजच देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. तेव्हा काही प्रश्न उपस्थित केले गेले पाहिजेत, कारण दिल्ली म्हणजे गांधीनगर नव्हे. तिथे मोदी एकहाती सत्तेचा गाडा हाकत होते. आता चवीपुरते का होईना सहकारी पक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींनी स्वत:ची ‘अजातशत्रू’ ही प्रतिमा उभी करण्यात यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी कदाचित ‘पंचशील’ तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांनादेखील मागे टाकू शकतील. त्यांच्या धोरणी वागण्याने परिवारातल्या संघटनांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ‘सब का साथ-सब का विकास’ ही घोषणा ऐकल्यानंतर ज्यांनी मोदींचे ‘काटेरी’ प्रेम अनुभवले आहे, त्यांना हायसे वाटत असेल. मोदींचे प्रेमच इतके काटेरी असेल तर, त्यांचा विरोध कसा असेल, याचा विचार न केलेलाच बरा! ‘काटेरी’ प्रेमाचे अनुभव ऐकल्यानंतर काँग्रेसलादेखील ‘सब का साथ..’चे मर्म उलगडेल.
निवडणुकीत मिळालेला विजयोत्सव सुरू असताना संघाने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली. संघाच्या शाखा-शाखांवर सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या स्वाक्षरीचे पत्रक वाचून दाखविण्यात आले. त्यात ‘आपले काम संपले आहे’, अशी भावना संघाने व्यक्त केली होती. सरकार चालवणारे सक्षम आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी संपली. सरकार भाजपचे असले तरी स्वयंसेवकांनी कसलीही अपेक्षा ठेवू नये. हा मुद्दा विस्ताराने समजावण्यासाठी लग्न लावणाऱ्या भटजीचे उदाहरण देण्यात आले. लग्न लावणाऱ्या भटजीचे जसे काम असते, तशीच आपली भूमिका होती. आपले काम संपले आहे. भाजपच्या विजयानंतर संघाची ही भावना आहे. कारण रालोआचे सरकार आल्यावर भाजपप्रणीत उत्साही कार्यकर्त्यांमुळे संघाचे काम वाढले, पण ती संख्यात्मक सूज होती. गुणात्मक वाढीसाठी संयम लागतो. त्यासाठी वर्षांनुवर्षे काम करण्याची चिकाटी लागते. पण राजकीय परिवर्तन झाले नि सारे संपले, असे मानणाऱ्यांची संख्या संघपरिवारात त्या काळी खूप होती. आताही आहे. त्यांना दिशादिग्दर्शन करण्यासाठी संघाने अधिकृत पत्रक काढल्याने भाजप व संघाचे संबंध पुढील पाच वर्षांसाठी कसे असतील हेच यातून ध्वनित होते. मोदींना अपेक्षित राजकीय यश मिळाल्याने आता तरी त्यांच्यात व परिवारात असलेली कटुता दूर होईल. संघाचे काम बंधुभावनेने होत असते, असा दावा सातत्याने केला जातो. मग हा बंधुभाव नरेंद्र मोदी सत्तासंचालनादरम्यान दाखवणार का? अटलबिहारी वाजपेयी इमोशनल आहेत तर लालकृष्ण अडवाणी रॅशनल! मानवी स्वभावाचे हे दोन्ही पैलू नरेंद्र मोदींच्या ठायी समान आहेत. मोदींच्या स्वभावातील या दोन्ही छटा देशवासीयांनी नुकत्याच अनुभवल्या आहेत. पंतप्रधान बनून विक्रमादित्याच्या सिंहासनावर विराजमान होणारे नरेंद्र मोदी विश्वबंधुत्वाच्या भावनेने आपल्या सहकाऱ्यांशी वागतील अशी आशा आहे.