कलावंताने फक्त स्वत:च्या आनंदासाठी, अजिबात प्रसिद्धी न मिळवता कलाकृती घडवत राहावे, ही मध्ययुगापासूनची अपेक्षा हल्ली वेडगळ वाटेल. पण चंडिगढनजीकच्या ‘रॉक गार्डन’चे कर्ते नेकचंद सैनी यांनी १९६० ते १९७५ अशी सलग १५ वर्षे ही अपेक्षा तंतोतंत पूर्ण केली होती. तसे त्यांना करावेच लागले. कारण चंडिगढ हे ‘भारतातील पहिलेच सुनियोजित शहर’ १९६६ साली बांधून पूर्ण होण्याआधीच (१९५० पासूनच) या शहरानजीकच्या ज्या भूभागावर ‘कोणीही कोठलेही बांधकाम करू नये’ असा दंडक होता, त्याच सुखना तलावाच्या आसपासच्या भागात नेकचंद हे गुपचूप आपल्या कलाकृती साकारत होते. कलाकृती कशाच्या?  वाया गेलेल्या फरशा, कपबशा, वीजवहनासाठी वापरले जाणारे चिनीमातीचे सामान यांचे फेकून दिलेले तुकडे हे त्या शिल्पवजा कलाकृतींच्या दर्शनी भागाची शोभा वाढवणारे असत. जमिनीवर आकार घेऊन तिथेच भक्कमपणे उभ्या असलेल्या या शिल्पांचा आतील भागसुद्धा फेकून दिलेल्या विटा, सिमेंट आदी राबिटाने बनलेला असे. शहरनियोजकांनी निर्जन भाग म्हणून मुद्दाम मोकळा ठेवलेल्या या भागात नेकचंद हे प्रतिसृष्टीच उभारत होते. खेळणारी किंवा ओळीने व्यायाम करणारी मुलेमुली, विविध कामे करण्यात गर्क असलेले स्त्रीपुरुष, उत्सवी समूहनृत्य करणारी माणसे आणि विविध प्रकारचे प्राणी.. असे सारे काही त्या १५ वर्षांत नेकचंद यांनी साकारले.
‘लपूनछपून’ केलेले हे काम १९७५ साली उघडकीस आले, आणि नेकचंद यांना प्रसिद्धी मिळाली! लोककलेशी साधम्र्य सांगणाऱ्या (आणि आधुनिक भारतातील ‘शांतिनिकेतन शैली’च्या अनेक शिल्पकारांशी नातेही सांगणाऱ्या) या कलाकृती नेकचंद यांना ‘पद्मश्री’ (१९८५) मिळवून देणाऱ्या ठरल्या. जागतिक स्तरावरील प्रसिद्धी आणि मान त्यांना १९९० च्या दशकात मिळू लागले. असे समाधानी आयुष्य जगून नेकचंद १२ जून रोजी निवर्तले.
वयाच्या २३ व्या वर्षी फाळणीमुळे भारतात यावे लागलेल्या नेकचंद यांना कलेची ओढ होतीच, पण औपचारिक कलाशिक्षण अजिबात नव्हते. तशात सन १९५० मध्ये ते विवाहबद्ध झाले, १९५१ पासून चंडिगढमध्येच ‘सा. बां. खात्या’त रस्ते निरीक्षक म्हणून नेकचंद नोकरीस लागले, तेव्हा संसाराला स्थैर्य आले. या नोकरीत असतानाच साधारण १९६० च्या सुमारास नेकचंद यांनी रॉक गार्डनचे काम ‘गुपचूप’ सुरू केले.  नेकचंद यांनी हे का केले, कोणत्या प्रेरणेने केले, याचे समाधानकारक उत्तर कधीच मिळणार नाही. पण त्यांचे काम कलाप्रेमींना समाधान देणारेच आहे.