मानवी इतिहासातील पहिला अंतराळवीर- युरी गागारीन- रशियाने १२ एप्रिल १९६१ रोजी अवकाशात पाठवला आणि गागारीन सुखरूप परतही आला.. किंवा त्याहीआधी १९५७च्या नोव्हेंबरात ‘लायका’ नावाची कुत्री रशियाने ‘स्पुटनिक’ या उपग्रहवजा अंतराळवाहनातून पाठविली, त्यापूर्वी २६ ऑक्टोबर १९५७ रोजी पृथ्वीवरून पहिलावहिला ‘स्पुटनिक’ उपग्रह रशियन तळावरून अंतराळात झेपावला, यामागे अनेकांचे परिश्रम होते.. ती सारी माणसे आज इतिहासजमा झालेली असतानाच, गेल्या आठवडय़ात ओलेग इवानोवस्की यांचेही निधन झाल्याची बातमी काहीशा उशिरानेच जगभर पसरली. वयाच्या ९२ व्या वर्षी, १८ सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.. निधन कोठे झाले, कशाने, याची माहितीदेखील रशियन ‘रॉसकॉसमॉस’ अंतराळ संस्थेने या बातमीसह दिलेली नाही.
अनामिक राहून काम करायचे, कधी तरी आपल्याच चुकीमुळे घडलेल्या अपघातात (किंवा चूक घडल्याची अधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा म्हणून) मरायचे, असे शिर तळहाती घेऊनच रशियाची अंतराळ मोहीम १९५३ सालापासून सुरू झाली. तिचे शिल्पकार सर्जी कोरोल्येव. ओलेगसारख्या हिकमती आणि यंत्रांमध्ये गती असलेल्या तरुणाने आपल्याकडे आलेच पाहिजे, अशा आग्रहाने त्यांनी ओलेग यांना स्पुटनिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले. ‘मला अनुभव नाही’ या ओलेग यांच्या सबबीला ‘येथे अनुभव आहे कुणाला?’ हे उत्तर मिळाले! पण या अननुभवी रशियनांनी बाजी मारलीच.. इतकी की, आज रशियापेक्षा किती तरी प्रगत असलेल्या अमेरिकी अंतराळ कार्यक्रमाला त्या वेळी रशिया करील तसे करण्यात शक्ती खर्ची घालावी लागत असे.
या रशियन यशात ओलेग यांच्यासारख्या तंत्रज्ञांचे श्रेय खुलेपणाने मान्य करण्याची पद्धत क्रुश्चेवकालीन सोविएत संघात नसली, तरी या संघाच्या विघटनानंतर ओलेग यांचे महत्त्व युरोपीय प्रसारमाध्यमांनी जाणले. युरी गागारीनबद्दलच्या इंग्रजी पुस्तकातील बराच भाग ओलेग यांच्या मुलाखतीवर आधारित आहे, ‘आमच्या शास्त्रज्ञांनी कूट अंकाची विचित्र तजवीज करून ठेवली; परंतु हा अंक जाणण्यासाठी युरीला पाकीट फोडावे लागणार होते.. ही हालचाल कशी जमणार, याच्या काळजीने मी त्याच्या कानात तो अंक (१-२-५) सांगून टाकला’ असा गौप्यस्फोटही त्यांनी केला होता!   ओलेग जन्मले १९२२ साली. ओलेग तरुणपणी दुसऱ्या महायुद्धात- स्टालिनच्या फौजांत लढले, युद्धानंतर ते शस्त्रतळावर छोटी-मोठी कामे करू लागले आणि वयाच्या ३२ व्या वर्षी ऊर्जा अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून अंतराळ कार्यक्रमात आले. ‘लावोच्किन’ या अंतराळ संस्थेत १९६१ ते १९८३ अशी कारकीर्द करून, पुढे अंतराळ संग्रहालयाचे प्रमुखपदही त्यांनी भूषविले होते.

Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी