आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात बातमीची विश्वासार्हता ही चोळामोळा करून फेकून द्यायची गोष्ट झाली आहे. अशा परिस्थितीतही बातमीचे पावित्र्य जपणाऱ्या ज्या काही मोजक्या प्रसारण संस्था जगात आहेत, त्यात अजूनही ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन म्हणजे ‘बीबीसी’चे नाव घेतले जाते. बीबीसी ट्रस्टचे अध्यक्ष असलेले ख्रिस पॅटन यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला आहे.
१ मे २०११ मध्ये पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी त्यांची नियुक्ती केली होती, त्यांनतरच्या काळात पॅटन यांनी या प्रसारण संस्थेचे पद खंबीरपणे सांभाळले, पण आता हृदयशस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांनी हे पद सोडले आहे. अर्थात, माध्यमांच्या जगात ते नवे होते तरी यापूर्वी त्यांनी तशीच तोलामोलाची पदे सांभाळली होती. शिक्षणानंतर ते राजकारणात आले. कन्झर्वेटिव्ह (पुराणमतवादी) पक्षाचे ते सदस्य होते. काही काळ मंत्रिमंडळातही होते. पक्षाध्यक्ष म्हणून त्यांनी १९९२ मध्ये विजय खेचून आणला, पण ते स्वत: मात्र पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी हाँगकाँगचे शेवटचे कमांडर इन चीफ म्हणून कार्यभार घेतला. युरोपीय समुदायातील ब्रिटनचे सदस्य म्हणून त्यांनी १९९९ ते २००४ दरम्यान काम केले व नंतर २००३ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलगुरू झाले. ब्रिटनमध्ये दबदबा असलेला रोमन कॅथॉलिक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. अलीकडेच बीबीसीच्या कामाचा आढावा घेतला गेला होता व तो प्रकाशित होण्याच्या आधीच पॅटन यांनी राजीनामा दिला. कारण त्यात सॅव्हिले बाल लैंगिक शोषण प्रकरण, मॅकअल्पाइन प्रकरण याशिवाय लोकलेखा समितीचे ताशेरे यांचा समावेश होता असे म्हणतात. त्यामुळे पॅटन यांनी आजारी असल्याने राजीनामा दिला असला, तरी बीबीसीमध्येही आता नव्या काळाची आव्हाने पेलण्यासाठी काही तरी बदल होणे अपेक्षित होते.
 मे २०१५ मध्ये ब्रिटनमध्ये निवडणुका आहेत, या पाश्र्वभूमीवर १ लाख १० हजार पौंड वार्षिक वेतन असलेल्या या पदाचे उत्तराधिकारी बनण्यासाठी स्पर्धा आहे. ‘सोनी’चे माजी प्रमुख सर हॉवर्ड स्ट्रिंगर यांचे नाव त्यात आघाडीवर आहे. ‘फायनान्शियल टाइम्स’च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डेम मारजोरी स्कारडिनो, ‘चॅनेल फोर’चे अध्यक्ष लॉर्ड बर्नस, ‘फायनान्शियल टाइम्स’चे माजी संपादक व सीबीआयचे माजी प्रमुख सर रिचर्ड लॅम्बर्ट, माजी मंत्री लॉर्ड मायनर्स यांची नावे चर्चेत आहेत. बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे बीबीसीच्या प्रमुखपदी महिलेचीच निवड होण्याची शक्यता असून त्यात साराहॉग, पेशन्स व्हीटक्राफ्ट व स्कारडिनो, कोलेट बोवे, गेल रिबर, अॅन विडेकॉम्ब यांच्यापैकी कुणाला तरी पसंती मिळू शकते. बीबीसीचा नवा अध्यक्ष हा घटनांवर सतत लक्ष ठेवणारा वॉचडॉग हवा; चीअर लीडर नको, अशी अपेक्षा आहे.