अर्जेटिनातील जीवशास्त्रज्ञ डॉ. आंद्रेस करास्को यांचे संशोधन ‘विज्ञान : शाप की वरदान?’ या (शाळकरी निबंध म्हणून सोप्पा, पण एरवी कठीण) प्रश्नाची एक बाजू दाखवणारे होते. मॉन्सॅन्टोसारख्या बलाढय़ बियाणे-कंपनीच्या एका बियाण्यात गर्भाच्या मेंदूसाठी विघातक घटक आहेत असा सप्रयोग दावा करणारे डॉ. करास्को हे रेण्वीय जीवशास्त्र, मेंदूशास्त्र, भ्रूणशास्त्र आणि जनुकशास्त्र या विषयांतील तज्ज्ञ म्हणून ओळखले जात. हयातभर कोणत्याही महत्त्वाच्या पुरस्काराला पारखेच राहून, कॉपरेरेट दाव्यांतील तथ्य वैज्ञानिक पद्धतीने शोधून पाहणारे हे शास्त्रज्ञ शनिवारी निवर्तले.
‘राऊंडअप’ हे मोन्सॅन्टोच्या तणनाशक औषधाचे नाव. या औषधाचा दुष्परिणाम होणार नाही अशी खास सोयाबीन आणि तांदळाची बियाणीही या कंपनीने बाजारात आणली होती. शिवाय, या तणनाशकाची मात्रा कमीत कमी असली पाहिजे, असे निर्देश अमेरिका आणि युरोपीय संघाच्या कृषी यंत्रणांनी बजावले होते. परंतु या मात्रेपेक्षा किती तरी कमी तणनाशक वापरले तरीही गर्भाच्या मेंदूंवर परिणाम होऊ शकतो, हे प्राण्यांचे गर्भ प्रयोगशाळेत वापरून डॉ. करास्को यांनी सिद्ध केले. त्यांचा हा अभ्यास २००९ साली एका संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आणि जगभर सुरू असलेल्या मॉन्सॅन्टोविरोधी लढय़ाला बळ मिळालेच; पण त्याहीपेक्षा, जगभरच्या शास्त्रज्ञांसाठी प्रयोगनिष्ठ अभ्यासाची निराळी दिशा खुली झाली.
अगोदर मॉन्सॅन्टोने डॉ. करास्को यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्षच केले, परंतु ऑक्टोबर २०१०मध्ये जोरदार खुलासा केला.. ‘करास्को यांचा अभ्यास अगदीच अर्धकच्चा आणि चुकीचा आहे. कोंबडय़ांच्या अंडय़ातील भ्रूणांवर कॅफेनचाही अगदी घातक दुष्परिणाम होतो, असाही अभ्यास १९९५ मध्येच झाला होता. तरी लोक चहा-कॉफी पितात’ अशा आशयाच्या या खुलाशाने भागले नाही म्हणून की काय, डॉ. करास्को यांना ‘अज्ञात इसमांकडून धमक्या’ मिळू लागल्या. त्यांचे एक भाषण हाणूनच पाडण्याचा प्रकार एका गावात घडला. या साऱ्या बातम्यांतून डॉ. करास्को यांची लोकप्रियता वाढतच गेली.
या खळबळजनक संशोधनापूर्वीही डॉ. करास्को यांना मान होताच. अमेरिकेतील इंडियाना, टेक्सास आणि कॅलिफोर्निया या विद्यापीठांमध्ये डॉ. करास्को यांनी संशोधन केले होते. स्वित्र्झलडमधील बाझल विद्यापीठ आणि जर्मनीचे गॉटिंगेन विद्यापीठ इथेही ते कार्यरत होते. १९७१ पासूनच ते जगभर अनेक विज्ञान-परिषदांसाठी फिरले. परंतु खुद्द अर्जेटिनासह अनेक देशांचे सरकारे आणि कॉपरेरेट जगत् यांनी त्यांच्यावर गेल्या काही वर्षांत अघोषित बहिष्कारच घातला होता. अर्जेटिनातील मेंदुरसायन संस्था तसेच जीवरसायन संशोधन संस्था, अमेरिकेतील सोसायटी ऑफ डेव्हलपमेंटल बायॉलॉजी आदी संस्थांचे ते सदस्य होते.