याही गावात नदी होती.. चांगली भरलेली! गावही त्या नदीबाबत कृतज्ञ होतं. पण तिच्या वरच्या अंगाला कारखाना निघाला आणि त्यातून प्रदूषणही सुरू झालं. त्या प्रदूषणाचा त्रास गावाला होताच नदीच्या पाण्याचा वापर या गावानं बंद करून टाकला.. सरकारनंही त्याची तातडीनं दखल घेऊन योग्य ती कारवाई केली.. हे छोटंसं प्रकरण थेट राष्ट्रप्रमुखापर्यंत गेलं..
एका गावाची गोष्ट ही. आता गाव म्हटलं की गरीब, साधंसुधं, मातीचे रस्ते असणारं, संध्याकोळी परतणाऱ्या गाईंची धूळ अंगावर घेणारं.. वगैरे असं काहीसं वाटेल. पण हे गाव तसं नव्हतं. चांगलं विकसित म्हणता येईल असं. उत्तम रस्ते, घराघरात पाण्याची व्यवस्था, उत्तम आरोग्य सेवा, अगदी श्रीमंतांनाही वापरावी वाटेल अशी नगरपालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, गर्द झाडी, भरपूर बगीचे, उद्यानं आणि वाटिका.. त्यात मनसोक्त खेळणारी मुलं.. कोणालाही हेवा वाटेल अशी शिक्षण व्यवस्था, मोठमोठे ब्रँड्स, चकचकीत बंगले, त्याहूनही चकचकीत त्यात राहणारे.. असं गोष्टीतलं वाटावंसं गाव.
आता इतकं सगळं वर्णन वाचल्यावर कोणालाही प्रश्न पडेल, असं काय कुठे असतं का? गाव म्हणजे कसा अडचणींचा पाढा. उघडे रस्ते, धुपाटय़ात पक पक करत वैताग आणणाऱ्या कोंबडय़ा, रोजगाराच्या शोधात असल्यासारख्या गोंधळणाऱ्या चेहऱ्यांनी उगाचच हिंडणाऱ्या बकऱ्या आणि आध्यात्मिक शांततेत अंगावरच्या माश्या उडवत चिखलात ढुप्प बसलेल्या म्हशी.. याला गाव म्हणतात. तेव्हा वरचं वर्णन काही आपल्या गावाचं नाही असं अनेकांना वाटेल. असेल. तसंही असेल.
पण नाही म्हणायला आपल्या गावात आणि या वर्णन केलेल्या गावात एक साम्य मात्र होतं.
ते म्हणजे आपल्या गावातल्या गावाप्रमाणे या वर्णनातल्या गावालाही नदी होती.
हे साम्य इथेच संपतं, कारण आपल्या नद्यांचं पोट खपाटीला गेलेलं असतं. माणसाचं असं झाल्यावर जशा त्याच्या बरगडय़ा दिसू लागतात, तसं नद्यांचं होतं. नदीचं पोट खपाटीला गेलं की आतले दगडगोटे ठसठशीतपणे दिसायला लागतात. तसं या नदीचं नव्हतं. चांगली भरलेली होती. ही नदी गावची फारच लाडकी. गावची सुख-दु:खं तिला बरोबर ठाऊक. गावातली काही प्रसन्न उद्यानं तिच्या काठी होती. गावच्या अनेक तरुणांचे दोनाचे चार होतानाचे हात कुणाच्या लेकीचे असणार ते या नदीकाठच्या उद्यानालाच पहिल्यांदा कळायचं. अनेकांची आयुष्य या नदीच्या साक्षीनंच बहरली. इतकंच काय अनेकांनी भूतलाचा निरोप घेतला तोही याच नदीच्या साथीनं. नदीचं अस्तित्व हे या गावाची ओळख होती. तशी ती अनेक गावांची असते. पण विशेष हे की हे गाव त्या नदीबाबत कृतज्ञ होतं. नदीविषयी गावाच्या मनात भक्ती होती. भाव होता. घरातल्या थोरल्या बहिणीनं स्वत:ची मौजमजा करायच्या काळातही काटकसर करून पाठीवरच्या भावंडांच्या शिक्षणासाठी, संसारासाठी काही ना काही करावं तसं नदीचं होतं. घरातल्या थोरल्या बहिणीप्रमाणेच ते गावही नदीच्या आकंठ कृतज्ञतेत बुडालेलं होतं.
आता नेमका त्याच नदीला घात झाला होता.
या गावाच्या पलीकडे, वरच्या अंगाला नुकताच एक कारखाना सुरू झाला होता. या गावात नियम होता नदीत काहीही घाण, विषारी सांडपाणी जाता नये. नदीतल्या पाण्याचं पावित्र्य जपायचं. त्या पावित्र्याला धक्का लागेल असं काहीही करायचं नाही. उद्योगांवर लक्ष ठेवायचं. धनदांडगे पैशाच्या थैल्या घेऊन आले तरी बाटायचं नाही आणि नदीतल्या पाण्याचा सौदा करायचा नाही. एका अर्थानं ते गावही भाग्यवान. कारण ते गाव ज्या राज्यात येतं त्या राज्याच्या सरकारनं, केंद्रानं अमुक एखाद्या कारखान्याला हो म्हणाच अशी कधी गळ गावाला घातली नाही की स्थानिक कोणत्या पुढाऱ्यानं प्यायल्या पाण्याचं इमान विकलं नाही. आपण असू किंवा नसू.. पण गाव आणि नदी कायम राहणार आहेत.. त्यांना नको ती चटक लावायची नाही.. असाच सात्त्विक विचार सगळ्यांचा. पण सगळ्याच गावात असे विचार करणारे कसे असणार? आणि दुसरं असं, नदी काय एकटय़ा गावाची थोडीच असते. किती गावांना कवेत घेत ती वाहत असते. तेव्हा एकाच गावानं अशी पातिव्रत्याची शपथ घेऊन काय होणार?
झालं असं की त्या दिवशी नदीचं पाणी पाच-दहा जणांना बाधलं. म्हणजे अचानक उलटय़ा आणि जुलाब सुरू झाले. सुरुवातीला जेमतेम दुहेरी असलेली ही बाधितांची संख्या तीन अंकी झाली. काही मुलांचं डोकं गरगरू लागलं. त्यांच्या उलटय़ा थांबेनात. अगदी रुग्णालयातच दाखल करायची वेळ आली त्यांच्यावर. काही महिला म्हणू लागल्या कसला तरी वास येतोय पाण्याला. काहींच्या अंगावर चट्टे आले. सगळीकडे तणाव. जगात असं कुठे कुठे घडलं त्याच्या आठवणी निघाल्या. त्यात किती जणांचे प्राण गेले त्यावर माध्यमात चर्चा सुरू झाल्या. हा हा म्हणता बातमी पसरली. नदीच्या पाण्यानं विषबाधा होऊन रुग्णालयात दाखल करावं लागत असलेल्यांची संख्या वाढतीच होती. बाधितांमध्ये खंड पडत नव्हता.
जसजशी बातमी पसरली तसतसे वाहिन्यांचे बातमीदार गावात थडकू लागले. ब्रेकिंग न्यूज तर कधीच सुरू झाली होती. च्यानेलांनी प्रकरण लावून धरलंय म्हटल्यावर राजकारणी यायला लागले. मंत्रीसंत्री आले. भेटी फारच वाढतायत असं लक्षात आल्यावर सरकारवरही दडपण आलं. त्या इलाक्याचे प्रमुख होते त्यांनी लगेच आदेश दिला. या नदीचं पाणी प्यायला बंदी घातली गेली. पाण्याच्या टाक्या रिकाम्या केल्या गेल्या. दुसरा आदेश निघाला. गावकऱ्यांना लागतील तितक्या पाण्याच्या बाटल्या पुरवायच्या. तो सगळा खर्च स्थानिक सरकार करणार असंही त्यांनी जाहीर केलं. जितके दिवस नदीचं पाणी असुरक्षित राहील तितके दिवस सरकारतर्फे लागतील तितक्या पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जाणार होत्या. गावाची आणि परिसराची लोकसंख्या कित्येक लाख. त्या सगळ्यांना आता सरकार पाणी देणार. याच्या बातम्या सगळीकडे झळकल्या. अगदी राष्ट्रप्रमुखांच्या कानावरही गेल्या. त्यांनीही जाहीर केलं काय पाहिजे ते दिलं जाईल पण गावाचं पाणी स्वच्छ आणि सुरक्षितच राहील. पाणी का बिघडलं त्याच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले.
आठेक दिवस वातावरण हे असं तणावपूर्ण होतं. या काळात सगळ्या चौकश्या झाल्या. त्याचे निष्कर्ष आले. त्यातून कळलं.
प्रकरण वाटतं तितकं काही गंभीर नव्हतं. किंबहुना जेवढा बभ्रा झाला तितकं त्यात काही नव्हतं. रुग्णालयातले सगळे घरी सुखरूप परतले. काहीही जीवितहानी झाली नाही. ज्यांनी ही घटना हाताळली त्यांचं कौतुक थेट राष्ट्रप्रमुखांनीच केलं. उत्तम जागरूकता दाखवली म्हणून. नंतरच्या तपासण्यातून कळलं या पाण्यात ४- मिथाईलसायक्लोहेक्झेन मिथेनॉल हा घटक मिसळला गेला होता. तो काही फारसा धोकादायक नाही. घशात खवखव सुरू होते आणि अंगाला खाज सुटते त्याच्यामुळे इतकंच. पण जीवितहानी नाही म्हणून कारवाई झाली नाही असं नाही. कंपनीवर रीतसर कारवाई सुरू झाली.
ही काल्पनिक गोष्ट नाही. सत्यकथा आहे. गेल्याच आठवडय़ात अमेरिकेतल्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यात, चार्ल्सटन गावात घडलेली. विषबाधेची केवळ शंका आल्यामुळे त्या गावानं, राज्यानं आणि थेट अमेरिकेच्या सरकारनं अतिशय खबरदारी घेतली. इतकी की त्या नदीचं पाणी अजूनही पिण्यासाठी शुद्ध असल्याचं घोषित केलेलं नाही. क्षुल्लक रसायन मिसळल्याचं निश्चित झाल्यानंतर ही खबरदारी घेतली जातीये. त्यातूनच, ही नदी अधिक प्रदूषित असल्याच्या आणि अमेरिकेत अन्यत्रही याच प्रकारचं प्रदूषण असल्याच्या बातम्यांचा ओघ आता सुरू होतो आहे..
शल्य इतकंच की आपल्या देशात १० हजारांचे प्राण घेऊन तीसेक हजारांना जायबंदी करणारी, भोपाळ कांड घडवणारी युनियन कार्बाईड ही कंपनी त्याच देशाची.
भोपाळात जे झालं ते त्या कंपनीच्या मायदेशात झालं असतं का?