शिक्षक चांगला असेल तर गणितही रंजक करता येते. प्राध्यापक स. पां. देशपांडे हे अशी किमया साधलेले हाडाचे गणित शिक्षक होते. त्यांच्या निधनाने आंतरराष्ट्रीय गणित वर्षांत गणितावर प्रेम करणारे एक उमदे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांचा जन्म शिरवळ (जि. सातारा) इथला, शालेय शिक्षणानंतर ते पुण्यात आले. गणित विषयात एमएस्सी केल्यावर त्यांनी दोन वर्षे स. प. महाविद्यालयात फिजिक्स डेमोनस्ट्रेटर म्हणून काम केले. नंतर ते गरवारे महाविद्यालयात दोन वर्षे गणित शिकवत. मुंबईत व्हीजेटीआय संस्थेत १९५७ ते १९६२ या काळात गणिताचे अध्यापन केल्यावर १९६२ मध्ये ते मफतलाल पॉलिटेक्निक या संस्थेत गणित विभागप्रमुख झाले. १९९० पर्यंत म्हणजे २८ वर्षे त्यांनी तेथे गणिताचे अध्यापन केले. ‘मॅथेमेटिक्स फॉर पॉलिटेक्निक स्टुडंट्स’ हे पहिले पुस्तक त्यांनी लिहिले, ते पन्नास वर्षे वापरात आहे, त्याच्या ३५ आवृत्त्या निघाल्या आहेत. १९६४ मध्ये त्यांनी अभियांत्रिकी पदविकेच्या दुसऱ्या वर्गासाठी पुस्तक लिहिले ते ४७ वर्षे वापरात आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वर्कशॉप कॅलक्युलेशन’ हे पुस्तक त्यांनी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून लिहिले. गणित विषय खरेतर अनेकांना आवडत नाही; पण तो सोपा करून शिकवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. गणित लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी ‘रँग्लरचे ग्लॅमर’, ‘संख्यादर्शन’, ‘संख्याशास्त्राचे किमयागार’, ‘गणितानंदी कापरेकर’ अशी वेगळ्या धाटणीची पुस्तकेही सामान्यांसाठी लिहिली. अलीकडेच त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टसाठी ‘कन्सेप्ट ऑफ झीरो’ हे पुस्तक लिहिले असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. गेली साठ वर्षे त्यांनी एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे गणितविद्या विद्यार्थ्यांना दिली.त्यांनी गणितावर २५० लेख लिहिले. पन्नासच्या वर भाषणे दिली. रेडिओवरही त्यांनी गणितातील गमतीजमती उलगडून दाखवल्या. त्यामुळेच २००९ मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यांना मानद सदस्यत्व दिले होते. एक प्रकारे त्यांनी गणित पत्रकारिता हा एक नवीन विषय त्यांच्या खास शैलीत हाताळला. महाराष्ट्र भाषा संचालनालयाच्या गणित परिभाषाकोशात त्यांनी लेखन केले होते. इतरही कोश वाङ्मयासाठी त्यांनी योगदान दिले.