‘‘बीबी’का मकबरा’’ हा अग्रलेख (२० मार्च) वाचला.  त्यात म्हटले आहे की  ‘इस्रायलमधील निवडणुकांसाठी नेतान्याहू यांनी अमेरिकेतील त्यांच्या भाषणाचा वापर केला.’ महाराष्ट्रातील आताच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनेदेखील तेच केले.  नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील मेडिसन स्क्वेअर येथील भाषणाचा प्रचारात मुक्तपणे (गर)वापर केला. वास्तविक नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान या नात्याने आणि सरकारी खर्चाने गेले होते. ते भाजपचे नेते म्हणून पक्षाच्या खर्चाने गेलेले नव्हते. तरीही भाजपने त्यांच्या त्या भाषणाचा गरवापर केला.  अग्रलेखात असेही म्हटले आहे की, नेतान्याहू यांना तिथे एखादा खमका निवडणूक आयोग असता तर असा उद्योग करता आला नसता. पण महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाला त्यात (आणि ‘शिवछत्रपतींच्या आशीर्वादाच्या’ उल्लेखाच्या जाहिरातीत) काहीही खटकले नाही, यातून काय अर्थ काढायचा?
आमचा पक्ष इतरांपेक्षा वेगळा, अशी बढाई मारणाऱ्या भाजपमध्ये हा निगरगट्टपणा त्यांनी राष्ट्रवादीशी केलेल्या छुप्या समझोत्यामुळे आलेला असावा.

प्रस्थान त्रयीच्या निमित्ताने..
शरद बेडेकर यांच्या लेखात सोमवार      (१६ मार्च) ब्रह्मसूत्रात ईश्वर या संकल्पनेचा उल्लेख नाही असे विधान आहे. वस्तुस्थिती अशी आहे की माणसाच्या मनात ईश्वराचे स्थान मात्र भक्कम आहे. चौथ्या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात ईश्वर कोणाचे पापपुण्य घेत नाही या श्लोकावर, जो सृष्टी पाळी संहारी। ऐसे बोलती जे चराचरी। ते अज्ञात गा अवधारी। पंडु कुमरा।। या ओवीत ज्ञानेश्वरांचे पाऊल गीतेच्या पुढेच पडते; परंतु इथेही ‘तो’ हा पुल्लिंगी शब्द प्रकटला आहे आणि ‘तो’ हा शब्द ईश्वर कल्पनेला साहाय्यभूत ठरतो.
ब्रह्म ही गोष्ट क्रियाशून्य आणि नपुंसकलिंगी आहे, याकडे म्हणूनच दुर्लक्ष होते. पुढे सोळाव्या अध्यायात (१८, १९) अहंकार, बल, गर्व, काम, क्रोध वगैरेंनी ग्रासलेल्यांना आणि माझा द्वेष करणाऱ्या नराधमांना मी असुरी जन्मामध्ये कायमच ढकलतो असे विधान श्रीकृष्ण करतो, त्यावरच्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या तर श्रीकृष्णाच्या विधानापेक्षा अतिरेकी आहेत. ज्या नासदीय सूक्ताचा बेडेकर उल्लेख करतात, त्याच सूक्तात हे विश्व कसे झाले हे ईश्वराला तरी ठाऊक असेल की नाही, असाही उल्लेख आहे.
ज्या कर्मकांडी पूर्वमीमांसेला बेडेकर निरीश्वरवादी म्हणतात त्यात यज्ञातून फळ मिळण्याच्या क्रिया सांगितल्या असून तिथे यज्ञ इष्टदेवतेचे आणखी एक रूप होते. पूर्वमीमांसा या विषयावर मंडन मिश्र आणि शंकराचार्याचा वाद झाला. त्यात आचार्य जिंकले. तेव्हा मंडन मिश्र यांची पत्नी शारदा हिने आचार्याच्या बाजूने न्याय दिला. ती शारदा म्हणजे सरस्वती, तिला आपण देवत्व बहाल केलेच आहे. वरच्या वाक्यातला न्याय शब्द न्यायदर्शनातून आला आहे. त्याचा गाभा तर्क आहे. तिथे ईश्वराला स्थान नाही. सांख्यदर्शन, पतंजली योगदर्शन दोन्ही रोकडे विज्ञान आहे. त्यातही ईश्वर ही कल्पना नाही. कणादांचा अणुवाद (वैशेषिक) तर तद्दन ईहवादी आहे. या सगळ्यातून निर्माण झालेल्या वेदान्तातही ईश्वराचा उल्लेख असला तरी ब्रह्मच आधारस्थानी आहे.  असे असले तरी कर्ताकरविता शिक्षा देणारा ईश्वर माणसाच्या मनामधून हटत नाही, कारण ईश्वर ही वस्तुस्थिती नसली तरी माणसाच्या स्वभावाला त्याची गरज भासते, ही आणखी एक वस्तुस्थिती आहे. गरजवंताला अक्कल नसते, त्याला हवा असतो आधार. यातून तथाकथित पापपुण्ये घडत राहतात. माझ्यासारखा एखादा लेखणी सरसावतो. ज्ञानेश्वरांच्या भाषेत ते असते ‘पाण्यावरी मगरीचे रेखाटन’.
 – डॉ. रविन थत्ते, माहीम (मुंबई)
 
‘कायदा सर्वाना समान’  हे फक्त पाठय़पुस्तकातच?
‘हा रिलायन्सचा टोल नाका..’ ही बातमी (२१ मार्च) वाचली. टोलमाफीत आमदार, खासदार, नगरसेवक, महापालिकेचे कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेते, त्यांच्या प्रभावळीतील पाच हजारी, दस हजारी मनसबदारांची वाहने, टोलनाक्याच्या परिसरात राहणारे नागरिक.. यादी संपतच नाही. एवढय़ा साऱ्यांना टोलमुक्ती देण्याची काही एक आवश्यकता नाही असे प्रामाणिकपणे वाटू लागले आहे.
कायदा हा सर्व नागरिकांना समान असतो असे आम्ही नागरिकशास्त्रात शिकलो होतो, मग लोकप्रतिनिधी, जनसेवक वगरे भेदभाव का?
आपण ‘अ‍ॅनिमल फार्म’मध्ये तर नाही ना राहत? जनतेच्या सेवकांनीदेखील जनतेप्रमाणेच टोल भरावा. साऱ्यांना गोष्टी फुकटात पदरात पाडून घेण्याचा विकार जडलेला दिसतोय.
बरे या टोलधाडीत जो भरडला जातो तो सामान्य नागरिक ‘सुस्तच’ आहे. त्याला ना कसला खेद ना कसली खंत. त्याच्या या  वागण्यानेच सरकारचे फावते व ‘लुटालुटा कोण अधिक लुटे’चा खेळ सुरू होतो. प्रत्येक वेळी ‘खळ्ळ् खटॅक’ केलेच पाहिजे असे नाही, परंतु सरकारलासुद्धा तुमचा निर्णय चुकीचा, तसेच सामान्य नागरिकावर अन्याय करणारा आहे हे समजलेच पाहिजे.  अन्यथा ‘अ‍ॅनिमल फार्म’चा शेवट जसा झाला तसेच पाहावे लागेल.
 – शैलेश न. पुरोहित, मुलुंड (मुंबई)

वि. स. पागे हेच मनरेगाचेही मूळ जनक
‘मनरेगाचे (दुहेरी) ढोल’ हा अभ्यासपूर्ण लेख (लोकसत्ता, ४ मार्च) वाचला. त्यातील एका महत्त्वाच्या बाबीची वाचकांना माहिती करून देण्याच्या दृष्टीने हा पत्रप्रपंच.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कायद्याची मूळ कल्पना प्रसिद्ध व्यासंगी गांधीवादी नेते व महाराष्ट्र विधान परिषदेचे भूतपूर्व सभापती कै. वि. स. पागे यांची. महाराष्ट्रात ‘रोजगार हमी योजना’ या नावाने तिचे कायद्यात रूपांतर झाले. गरीब जनतेच्या कल्याणाविषयीची तीव्र तळमळ हा  पागे यांच्या कार्याचा आत्मा होता. काम करण्यास तयार असलेला कोणीही उपाशी राहू नये, या तळमळीतून त्यांनी ही योजना तयार केली व ती महाराष्ट्र सरकारने स्वीकारावी, असा आग्रह तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांना दीर्घकाळ केला; परंतु योजनेसाठी लागणारा खर्च सरकारला झेपणार नाही, या कारणाने नाईक ती योजना स्वीकारण्यास तयार होईनात. मग योजनेच्या खर्चासाठी छोटासा कर बसवावा, हा उपाय कै. पागे यांनी त्यांना सुचविला. तथापि, त्यानंतरही ही योजना स्वीकारण्याबाबत  नाईक यांची चालढकल चालूच राहिली. मग पागे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक बोलावून त्या बैठकीपुढे आपल्या रोजगार हमी योजनेबाबत चर्चा घडवून आणली. या चर्चेत योजनेच्या सर्व साधकबाधक अंगोपांगांचा सविस्तर विचार होऊन तिला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यानंतर तीवर सर्व उपस्थितांच्या सह्य़ा घेऊन आपल्या निवेदनासह मुख्यमंत्री  नाईक यांच्याकडे  पागे यांनी ती योजना पाठविली. मग मात्र  नाईक यांच्याकडून योजनेचा स्वीकार होऊन तिला विधेयकाचे स्वरूप देण्यात आले. या विधेयकावर विधानसभा व विधान परिषद दोन्ही ठिकाणी रीतसर चर्चा होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले व ती सर्व महाराष्ट्रात लागू करण्यात आली.
वरील माहितीवरून कालांतराने केंद्र सरकारच्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’चे मूळ जनक कै. वि. स. पागे हे होते, असे मानण्यास हरकत नसावी.
उल्लेखनीय बाब म्हणजे वरील योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘रोजगार हमी मंडळा’ची स्थापना होऊन पागे त्याचे अध्यक्ष झाले; परंतु त्या पदाचे नाममात्र मानधन म्हणून ते मासिक फक्त एक रुपया घेत असत. त्या पदावर ते जीवनाच्या अखेरीपर्यंत कार्यरत होते.
(मी त्या वेळी विधानमंडळ सचिवालयात ‘सभापतींचा स्वीय साहाय्यक व जनसंपर्काधिकारी’ म्हणून कार्यरत असल्याने वरील घटनाक्रम ‘चक्षुर्वेसत्यम्’ म्हणून मान्य होण्यास प्रत्यवाय नसावा.)
– वसंत वामन इनामदार, वांद्रे (मुंबई)