अविचार आत्मघातालाच प्रवृत्त करत असतो. आयुष्याचा अर्थ समजून घेऊन जगणे सुंदर करावे, असे संस्कार दुर्मीळ होत चालल्याने जगण्याची मौज आणि त्याच्या संकल्पनाही संकुचित होत चालल्याने तरुणाईचा अविचारीपणा फोफावल्याची खंत अनेकदा जाणत्या पिढीकडून व्यक्त होताना दिसते. सळसळणाऱ्या तरुणाईला जणू अविचाराने घेरले असावे, अशी परिस्थिती आसपास दिसू लागल्याने देशाचे भविष्य हाती असलेली पिढी स्वत:चे भविष्य कसे घडविणार, याची चिंताही अनेकदा व्यक्त होताना दिसते. कारण, अविचार आणि आत्मघात या एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात, असा अनुभव अलीकडे पावलोपावली येऊ लागला आहे. नव्या जगात माणसासमोर हात जोडून उभ्या असलेल्या प्रत्येक सुखसुविधेची दुसरी बाजू धोक्याची असते, याची जाणीव असतानाही या धोक्यांना आव्हान देण्याची अविचारी प्रवृत्ती तरुणाईमध्ये बळावली, म्हणूनच भविष्याचा प्रत्येक क्षण जणू अस्थिर होत चालला आहे. क्षणाचा शाश्वतपणाच पुरता हरवत चालला आहे. मुंबईसारख्या महानगरात, क्षणाक्षणाला समोर संकटे उभी असतात, याची प्रत्येकाला पुरेपूर जाणीव असते. या संकटांचा मुकाबला करण्यासाठी संयम आणि विवेकाची गरज असताना, अविचार आणि अविवेकाचेच मार्ग प्रभावी ठरू लागल्याचे चिंताजनक वास्तवही अलीकडे बळावत चालले आहे. जगण्याचे संदर्भच बदलत असताना, अविचारीपणाने संकटांना कवटाळणारी तरुणाई आसपास दिसते, तेव्हा भविष्याच्या या चिंतांचे सावट आणखीच गडद होत जाते. मुंबईची उपनगरी रेल्वे ही खरे तर मुंबईची जीवनवाहिनी; पण संकटांना अविचारी आव्हान देणाऱ्या असंख्य जिवांसाठी ती केवळ जीवघेणी ठरली आहे. पश्चिम उपनगरातील मालाडच्या अक्सा चौपाटीवरील समुद्रकिनारा धोकादायक आहे. या समुद्राने आजवर असंख्य बळी घेतले आहेत. त्यामुळे या किनाऱ्यावरून समुद्रात पोहण्यास उतरू नये, यासाठी डोळ्यांत तेल घालून जीवरक्षक पथके तेथे पहारा देत असतात. पण
या समुद्रात जागोजागी असलेल्या फसव्या खड्डय़ांमध्ये दबा धरून बसलेला मृत्यू जणू अविचारांना साद घालतो आणि हा पहारा चुकवूनही मृत्यूला अविचारी आव्हान देण्याची दुर्बुद्धी सुचते. गेल्या पाच वर्षांत
या समुद्रात जवळपास ५१ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तीन वर्षांपूर्वी जुलै २००० मध्ये, या समुद्राने एकाच वेळी १३ बळी घेतले होते. त्यानंतर जीवरक्षकांची फळी तेथे अधिक सावध झाली,
पण संकटांना आव्हान देण्याच्या अविचाराने पछाडलेल्या अनेकांनी त्यांनाच चकवा दिला आणि जीव गमावला. उमलू पाहणाऱ्या, भविष्य घडवू पाहणाऱ्या असंख्य आयुष्यांच्या ईष्र्याना निसर्गाने मनापासून साथ आणि दाद दिल्याची असंख्य उदाहरणे आसपास असताना, केवळ अविचारी साहसातून निसर्गाला आव्हान देण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आता अधोरेखित झाली आहे. त्यासाठी कदाचित, जगण्याचे वर्तमानकालीन संदर्भ बदलणे आवश्यक ठरेल. अविचारी आणि अतिरेकी साहसवृत्तीला आयुष्याचा आणि जगण्याचा अर्थ समजावण्याचे आव्हान कोण स्वीकारणार, हा खरा प्रश्न आहे.