09 March 2021

News Flash

शर्मिला निकोलेट

गोल्फ म्हटले की गालिच्याप्रमाणे पसरलेली हिरवळ, या हिरवळीतच लपलेली गोल्फ होल्स, मध्येच डोकावणारी वाळूची बेटं, सरळसोट लांब आणि चेंडूला ढकलण्यासाठी खाच असलेली स्टिक, या स्टिकने

| March 10, 2014 01:13 am

गोल्फ म्हटले की गालिच्याप्रमाणे पसरलेली हिरवळ, या हिरवळीतच लपलेली गोल्फ होल्स, मध्येच डोकावणारी वाळूची बेटं, सरळसोट लांब आणि चेंडूला ढकलण्यासाठी खाच असलेली स्टिक, या स्टिकने खेळणारा गोल्फर आणि बाकी उपकरणांचा पसारा सांभाळणारा त्याचा सोबती हे चित्र टीव्हीवर पाहायला अगदीच रमणीय. गोल्फच्या सुखेनैव विश्वातले टायगर वूड्स हे नाव आपल्या परिचयाचं. या विश्वापासून आपण तसे चार हात दूरच. पण भारताच्या शर्मिला निकोलेटने आपल्या शानदार खेळाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा रोवला आहे. उच्चभ्रूंच्या कोंदणातला खेळ अशी गोल्फची व्याख्या केली जाते. त्यात महिलांचे गोल्फ हा आणखी अतिविशिष्ट असा गट. मात्र या गटातटांच्या पल्याडचा विचार आणि कृती करत शर्मिलाने आंतरराष्ट्रीय गोल्फ विश्वात २२व्या वर्षीच स्वत:चा ठसा उमटवला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब स्पर्धेचे जेतेपद पटकावत शर्मिलाने शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
मार्क आणि सुरेखा निकोलेट या दाम्पत्याची ही लेक. वडील फ्रान्सचे आणि आई भारतीय. सॉफ्टवेअर हे वडिलांचे क्षेत्र, तर परफ्युम कंपनी हा आईचा व्यवसाय. घरातून खेळाची अशी कोणतीही पाश्र्वभूमी नसताना शर्मिलाने घेतलेली भरारी अचंबित करणारी आहे. शालेय जीवनात जलतरणात राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, टेनिस-बास्केटबॉल तसेच अश्वशर्यतीत सहभागी होणाऱ्या शर्मिलाने अकराव्या वर्षी पहिल्यांदा गोल्फ स्टिक हाती घेतली आणि नंतर हेच तिचे विश्व बनले. देशांतर्गत, आशियाई आणि त्यानंतर युरोपातील स्पर्धामध्ये जेतेपदांची कमाई करत तिने आपला निर्णय सार्थ ठरवला.  दोहा येथे २००६ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. अखिल भारतीय गोल्फ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी ती सर्वात कमी वयाची महिला ठरली. भारतीय गोल्फ संघटनेतर्फे आयोजित ११ स्पर्धाची जेतेपदे तिने नावावर केली. या सुरेख प्रदर्शनासाठी शर्मिलाला गोल्फ संघटनेने ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानाने गौरवले. अठराव्या वर्षी व्यावसायिक दर्जाच्या गोल्फमध्ये तिचा प्रवेश झाला. युरोपियन टूरसाठी पात्र ठरलेली ती सगळ्यात कमी वयाची गोल्फर ठरली. या टूरचे फुल कार्ड अर्थात अव्वल खेळाडूंसाठी मिळवण्याचा मानही तिने पटकावला.
गोल्फ कोर्सची मर्यादित संख्या, दर्जेदार प्रशिक्षण देऊ शकतील अशा अकादमींची वानवा, प्रायोजकांचे दुर्लक्ष अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीतही शर्मिलाने जिद्दीने या खेळाची आवड जोपासली. या आवडीला शिस्त आणि मेहनतीची जोड देत आगेकूच केली. अभिनेत्रीला साजेसे रूप असूनही गोल्फ हीच आवड असल्याचे ठामपणे सांगत वाटचाल करणारी शर्मिला आधुनिक नारीशक्तीचे प्रतीक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 1:13 am

Web Title: sharmila nicollet an indo french professional golfer
Next Stories
1 हाला शुक्राल्ला
2 लक्ष्मी अगरवाल
3 ‘ते’ दोघे
Just Now!
X