स्टीफन शाबरेनेर हा गृहस्थ धार्मिक बाबतीत कोणाचेच ऐकणारातला नव्हता. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा तर त्यांचा जगण्या-मरण्याचा सवाल होता. अखेर त्यानेच त्यांचा बळी घेतला. नव्हे, ते शहीद झाले. नमस्कार करण्यास सांगितले तर लोटांगणच घालणाऱ्यांची सद्दी माध्यम क्षेत्रात वाढत आहे. अशा काळात स्टीफन शाबरेनेर यांच्यासारख्यांच्या बलिदानास मोलच नसते. ते दोन अर्थाने. एक म्हणजे अनेकांसाठी त्याची काहीच किंमत नसते. त्यांच्या व्यवहारवादात ते बसत नसते. पण त्याच वेळी समाजातील अनेकांसाठी ते अनमोल असते. प्रेरणादायी असते. शाबरेनेर यांच्या संपादकीय कारकीर्दीचा अवघा प्रवास तसा वादग्रस्तच. त्यांचे शार्ली हेब्दो हे व्यंग-पत्र म्हणजे तर वादांना आवतणच. आणि ते तसेच असणार होते. धर्म आणि धर्मगुरू यांच्याविरोधातील कोणतीही गोष्ट समाजाचा रोष ओढवून घेणारी आणि वादांना आवतण देणारीच ठरत असते. शाबरेनेर यांचे म्हणणे असे, की आम्हांस अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. ते आम्ही उपभोगतो. त्यांची ही भूमिका अनेकांना अर्थातच मान्य नव्हती. . शाबरेनेर यांनी आपल्या संपादकीय आयुष्यात अशा टीकेची पर्वा कधी केलीच नाही. ते सातत्याने धर्मावर, धार्मिक प्रतीकांवर, धर्मनेत्यांवर आपल्या व्यंग-पत्रातील चित्रांतून आघात करीतच राहिले. इस्लामसाठी तर हे व्यंग-पत्र म्हणजे शत्रुवतच होते. याचे कारण इस्लाममधील चित्रबंदी. मोहम्मद पैगंबराचे चित्र काढणे हे तर जहन्नममध्ये जाण्यायोग्य पाप. त्यामुळे २००७ मध्ये एका डॅनिश मासिकाने मोहम्मद पैगंबराची डझनभर व्यंगचित्रे प्रसिद्ध केली तेव्हा प्रचंड गदारोळ माजला. तेव्हा शाबरेनेर यांनी ती व्यंगचित्रे पुनप्र्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.  ते प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने बंदीची याचिका फेटाळली. ती व्यंगचित्रे हा इस्लामवरील हल्ला नसून तो कट्टरतावादाविरोधातील हल्ला असल्याचा तेव्हाचा न्यायालयाचा निर्णय शाबरेनेर यांना सुखावणारा असाच होता. २०११ मध्ये त्यांनी पुन्हा पैगंबरावरील व्यंगचित्रे प्रसिद्ध केली. त्याने चिडलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला केला. याने आपण डगमगणार नाही, असे सांगत शाबरेनेर सगळ्याच धर्मनेत्यांविरोधातील व्यंगचित्रे प्रसिद्ध करीत राहिले. त्या संदर्भात ल मॉन्दने त्यांची मुलाखत घेतली होती. त्यात शाबरेनेर म्हणाले होते, ‘मी जे म्हणतोय ते तुम्हाला जरा बढाईखोरपणाचे वाटेल. पण गुडघ्यावर चालण्याऐवजी मी मरण पत्करीन.’ अखेपर्यंत कलाकारांच्या स्वातंत्र्याची मशाल फडकत ठेवत शाबरेनेर यांनी मरण पत्करले.