मी त्याच परमात्म्याचा अंश आहे ही व्यापकत्वाची, शाश्वताची जाणीव टिकविण्याचा अभ्यास  म्हणजेच सोऽहंचा अभ्यास आहे. आता स्वामी स्वरूपानंद यांनी योगसाधनेच्या अंगानं जसा सोऽहंचा अभ्यास बिंबवला तसाच जीवनधारणा म्हणूनही तो अनेक प्रसंगी सांगितला आहे. योगाच्या अंगानं स्वामींनी केलेलं सोऽहंचं मार्मिक विवेचन अशोकानंद रेळेकर यांनी ‘सोऽहं भजन’ या पुस्तकात केलं आहे. आपण धारणेच्या अंगानं सोऽहंचा विचार करू. स: अहं, या धारणेचा हा अभ्यास शाश्वत, संकुचित जिणं जगत असतानाच केला पाहिजे. स्वामी स्वरूपानंदही सांगतात की, ‘‘सतत सोऽहं अनुसंधानानेच सर्व साधेल, हे पक्के लक्षात ठेवा. यासाठी जगावेगळे काही करावयाचे असेही नाही, सर्व संसारकर्मे यथायोग्य करीत असतानाच हे सर्व साधते. काही सोडावयास नको, काही निराळे अट्टाहासाने करावयास नको. सहजप्राप्तीसाठी कष्ट कशाला?’’ (स्वामी म्हणे अमलानंदा, पृ. ४५). हे सांगणं वरकरणी साधंसोपं वाटतं, पण त्यावर चिंतन केलं तर त्यातला गूढ हेतू जाणवेल. शाश्वताचा अभ्यास मला अशाश्वत जगणं सुरू असतानाच केला पाहिजे. काही जगावेगळं करून मी तो अभ्यास केला तर जे सहज आहे त्याच्या प्राप्तीसाठी मी आधार आणि निमित्तांची अनावश्यक गरज मनात उत्पन्न करीन. म्हणजे, एकांतवासाशिवाय परमात्म्याचाच मी अंश, हे चिंतन अशक्य आहे, असं मी मानलं तर मग आयुष्यभर एकांत शक्य आहे का हो? उलट प्रपंचात राहूनच खरा प्रामाणिक अभ्यास साधेल. याचं कारण मोठं गूढ आहे! माझं जगणं संकुचित असताना, अशाश्वत असताना मला मीच व्यापक परमात्म्याचा अंश आहे, शाश्वत परमात्म्याचा अंश आहे, हा अभ्यास करायचा आहे! मग या अंतर्विरोधाने माझ्यात खळबळ निर्माण होईल. ती माझं अंतर्मन ढवळून काढेल. परमात्मा परम आनंदी असताना त्याचाच अंश असलेला मी दु:खं का भोगत आहे? परमात्मा शाश्वत, स्थिर असताना त्याचाच अंश असलेल्या माझ्या जीवनात अशाश्वतता का, अस्थिरता का? परमात्मा व्यापक असताना माझ्या जीवनात संकुचितपणा का? परमात्मा सर्वशक्तिमान असताना त्याचाच अंश असलेल्या माझ्यात चिंता, भीती, काळजी का? हे द्वंद्व मला अधिकच जागं करील. जीवनाकडे अंतर्मुख होऊन पाहायला लावील. ताक घुसळलं की लोणी हाती येतं ना तसं जीवनसत्याचं हे नवनीत या आंतरिक घुसळणीनं हाती येईल. जसजसं अनुसंधान वाढत जाईल तसतशी ही प्रक्रिया वाढत जाईल. स्वामीही सांगतात, ‘‘अखंडानुसंधानाने सोऽहंमधील अहं हळूहळू गळून जाऊन स: च शिल्लक उरतो. स्वानुभव तसा येऊ लागला की अनन्यभक्तीस सुरुवात होते’’ (स्वामी म्हणे अमलानंदा, पृ. ४४). श्रीगोंदवलेकर महाराजही सांगत की, अद्वैत म्हणजे तूच मी नव्हे, तर केवळ तूच! स्वामींना अभिप्रेत अनन्यभक्ती ती हीच! तेव्हा माझं जगणं सोडता येणार नाही, कर्तव्यं सोडता येणार नाहीत, प्रपंच सोडता येणार नाही. त्यात राहूनच त्याच्या पकडीतून सुटता येईल. नित्यपाठातली पुढची ओवी हेच बिंबवते.