एखाद्याच्या जीवनात खरा सद्गुरू प्रवेश करतो तेव्हा त्या जिवाचा जो गोतावळा असतो त्यांचाही भार सद्गुरू सहजपणे स्वीकारतात. मोठय़ा लोहचुंबकाला खिळा चिकटतो अन् त्या खिळ्याला लगटून असलेल्या टाचण्या, पिना, अन्य खिळे हेदेखील त्या खिळ्यासोबत लोहचुंबकाच्याच शक्तीने चिकटतात ना? तसं एकजण जेव्हा सद्गुरूंचा होऊ लागतो तेव्हा हळूहळू त्याचे आप्तस्वजनही सद्गुरूंच्या बोधाकडे वळू लागतात. ते प्रत्यक्ष त्यांचे झाले नाहीत तरीही त्यांच्या मनाला अनाकलनीय तृप्तीचा व शांतपणाचा लाभ होऊ लागतो. स्वामीभक्ताच्या घरातली, पण स्वामींबाबत विशेष श्रद्धा नसलेली मंडळीही कालांतराने स्वामीचरणी दृढ झाली, याचे काही दाखले स्वामी स्वरूपानंद यांच्या भक्तांच्या आठवणींतही आहेत. अहो वधुवरांचिये मिळणीं। जैशीं वऱ्हाडियांही लुगडी लेणीं। तैसे देशियेच्या सुखासनीं। मिरवले रस.. या ओव्यांचा हा प्रत्यय आहे. एकदेशी वृत्ती नसलेले आणि एकरसातही निमग्न नसलेले आप्तजनही शांती, तृप्तीचे दागिने प्राप्त करतात! तेव्हा जोवर साधकाचं मन आणि बुद्धी या दोन्हींचं केंद्र सद्गुरू होत नाहीत अर्थात सद्गुरूंच्या बोधानुसार अनासक्त भावानं कर्तव्य पार पाडली जात नाहीत, ध्येयाचं स्मरण राखून प्रपंचात वावरणं होत नाही तोवर मन आणि बुद्धीचं ऐक्य होणार नाही. चित्ताचं समत्वही साधणार नाही. चित्त सतत अस्थिर, दूषितच राहील. तेव्हा जे काही घडत आहे ते सद्गुरूंच्या इच्छेनंच घडत आहे, असा स्वीकारभाव येत नाही तोवर मन आंदोलितच होत राहाणार. आता जीवनातल्या खऱ्या अडचणी, खरी संकटं उद्भवतील तेव्हा मी माझ्या शक्तीनिशी, क्षमतांनिशी त्यांना तोंड दिलं पाहिजेच. पण अनेकदा लहान-सहान अडचणी आणि दु:खांपायीही माझं मन, बुद्धी हेलकावू लागते. त्यामुळे हा स्वीकारभाव हवा. जर मन अखंडपणे सद्गुरूबोधात असेल तर मग अखंड प्रसन्नता आहेच! कबीरांचा दोहा आहे ना? दुख में सुमीरन सब करै, सुख में करे न कोय। सुख में सुमीरन जब करै तो दुख काहे को होय!! या स्वीकारभावाचा प्रत्यय सुशीलाबाई देसाई यांच्या जीवनात आढळतो. एक दिवस स्वामींनी भाऊ देसाई     आणि त्यांच्या पत्नी सुशीलाबाई यांना अनुग्रह दिला. त्यानंतर त्यांनी सुशीलाबाईंना विचारलं, ‘तुम्हाला काय हवंय? हवं असेल ते मागा!’ सुशीलाबाई काही बोलल्या नाहीत. स्वामींनी पुन्हा विचारलं तरी त्या गप्पच राहिल्या. स्वामी किंचित हसत म्हणाले, ‘सगळं तुमच्या मनासारखं होईल!’ सुशीलाबाईंनी ही गोष्ट खूप वर्षांनी मृणालिनी जोशी यांना सांगितली. मृणालिनीताई लिहितात : माझ्या तर्कट बुद्धीला वाटलं यांच्या एवढय़ा मोठय़ा संसारात आणि इतक्या वर्षांत खरंच का प्रत्येक गोष्ट यांच्या मनासारखी घडली असेल? मी धीर करून सुशीलाताईंना हा प्रश्न विचारला. त्या तोंड भरून हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘अहो, जे झालं ते मनासारखंच वाटलं!’’(स्वामी कृपांकित : कर्मयोगी भाऊ, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ प्रकाशन, पृ. ८८वरील आठवण). सद्गुरू इच्छेत आपली इच्छा अशी विरघळवून टाकणं कुणाला जमेल?