र. धों. कर्वे आपली बुद्धिवादी भूमिका यत्किंचितही पातळ न करता आपल्या ध्येयाला व विचाराला अखेपर्यंत चिकटून राहिले ही बाब काही कमी प्रशंसनीय नाही. परंतु धों. के. कर्वे यांनी थोडी तडजोड केली म्हणून त्यांना नावे ठेवायचेही काही कारण नाही.  अण्णांची ना निष्ठा डळमळीत झाली होती ना ते ध्येयापासून दूर गेले होते. चालत असताना दोन पावले मागे घेतल्यामुळे पळता येणार असेल, तर त्याला माघार म्हणायचे कारण नाही.
कोणत्याही समाजात वेगवेगळ्या काळात काही कर्तबगार माणसे होऊन गेल्याचे दिसते. त्यांनी त्या त्या समाजाच्या स्थितीगतीच्या संदर्भात काही कामगिरी केल्याचेही दिसून येते. तथापि, त्यांच्यापैकी सर्वानाच समाजाचे नेते किंवा पुढारी म्हणता येत नाही. येथे नेता या शब्दाने ज्याच्यामागे अनुयायीवर्ग आहे, तो मनुष्य अभिप्रेत आहे. काहींशी तर समाजातील प्रथा परंपरांवर शस्त्रच धरलेले असते. आता अशा व्यक्तींचे नेतृत्व समाज कसे स्वीकारणार? या व्यक्तींचे म्हणणे बरोबर होते, असे कालांतराने सिद्ध होते. मग लोक त्याची गौरवगीते गातात. पण त्यांच्या हयातीत त्यांच्या वाटय़ाला उपेक्षा, उपहास व विरोध येतात.
याचे सर्वात ठसठशीत उदाहरण म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे. कव्र्याना समाजाविषयी प्रचंड आस्था होती. त्यांनी तेव्हाच्या समाजावर जी टीका केली ती या आस्थेपोटीच. पण ते कळण्याची कुवत कव्र्याच्या समकालीनांमध्ये नव्हती. आजही ती आहे असे म्हणता येणार नाही. पण निदान कव्र्याच्या मांडणीतील प्रत्यक्ष उपयुक्त ठरणारा भाग व्यावहारिक सोय म्हणून तरी समाजाने स्वीकारला आहे.
र. धों. कव्र्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी नेतृत्वाच्या मोहात पडून कोणतीही तडजोड केली नाही. आपली मते सौम्य केली नाहीत. याबाबतीत त्यांचा त्यांच्या वडिलांच्या भूमिकेशी विरोध होता, असेच म्हणावे लागते.
धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांच्या सुधारणांचा प्रश्न हातात घेतला. या सुधारणांमध्ये एक सुधारणा म्हणजे उच्चवर्णीयांमध्ये विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा. दुसरी सुधारणा अर्थातच स्त्रीशिक्षणाची. कारण तेव्हा मुलींना शाळेत पाठवून शिकवणे हे धर्माच्या विरुद्ध मानले जायचे!
कव्र्यानी स्वत: विधवा स्त्रीबरोबर पुनर्विवाह करून सुधारणेचा पहिला धडा आपल्या स्वत:च्या आचरणाने घालून दिला. या संदर्भातील त्यांची मते मान्य असलेल्या काही थोडय़ा लोकांचे ते नायक-नेते बनले. या लोकांना स्त्रीशिक्षणाच्या प्रश्नात स्वारस्य नव्हते अशातला भाग नाही. परंतु, विधवांची दु:स्थिती पाहून ते व्यथित होत व ती दूर करण्यासाठी पुनर्विवाहाची प्रथा पाडलीच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.
आता एकूण उच्चवर्णीय समाजाचा विचार केला तर काय दिसते? हा समाज ज्याला मध्यमवर्ग म्हणता येईल अशा अवस्थेत पोहोचला होता. बालविवाहाची प्रथा अद्याप सुरूच असल्यामुळे व बऱ्याचदा हा विवाह विषम म्हणजे जरठबाला प्रकारचा असल्याने विधवांचे प्रमाणही लक्षणीय होते. पूर्वी कुटुंबाचा आकार मोठा असल्याने त्या खटल्यात एखादी दुसरी विधवा स्त्री खपून-म्हणजे सामावून जाणे अवघड नसायचे. उलट कुटुंबातील स्वयंपाकपाणी, धुणीभांडी, झाडलोट अशा कामात अशा विधवांची मदतच व्हायची.
बदलत्या परिस्थितीत विधवा कुटुंबासाठी भार बनू लागली. त्यामुळे तिला शिकवून आपल्या पायावर उभी केली, तर ती भार बनण्याऐवजी उत्पन्नाचे बरे साधनही होऊ शकेल, असा विचार हे मध्यमवर्गीय करू लागले असल्यास ते मनुष्य-स्वभावास धरून आणि गरजांच्या दडपणांशी सुसंगतच म्हणावे लागेल.
अर्थात, विधवांना शिकवून आपल्या पायावर उभे केले, स्वावलंबी बनवले तर त्यांच्या परिस्थितीत पालट होईल, अशा सद्हेतूनेही काही लोक प्रेरित झाले असणार, यावर शंका घ्यायचे कारण नाही.
अशा दोन्ही प्रकारांच्या लोकांसाठी अण्णा कव्र्यानी काढलेली स्त्री शिक्षणसंस्था ही एक पर्वणीच झाली, असे म्हणायला हरकत नाही. पण एक अडचण होती आणि तीसुद्धा कमी महत्त्वाची नव्हती.
स्त्रियांना (व विधवा स्त्रियांनासुद्धा) शिकवायला हरकत नाही. या मतापर्यंत पोहोचलेल्या बहुतेकांची अद्याप विधवांचा पुनर्विवाह स्वीकारण्याची तयारी झाली नव्हती. त्यामागे धार्मिक रूढी, तसेच समाजाचा रोष पत्करण्यासाठी लागणाऱ्या साहसाचा अभाव ही कारणे होती. अशा लोकांना अण्णा कर्वे अर्धे मान्य होते, अर्धे अमान्य. अण्णा जोपर्यंत मुलींना शिकवतात, तोपर्यंत मान्य, मात्र ते विधवाविवाह लादू लागले तर अमान्य. त्यांनी काढलेल्या शाळा-कॉलेजात घरातल्या विधवा मुलीला, बहिणीला, सुनेला पाठवायला व शिक्षित करायला हरकत नाही, पण तेथे गेल्यावर या मुलींना पुनर्विवाह करण्यास उत्तेजन मिळणार असेल, त्यांची लग्ने लावून देण्यात येणार असतील, तर विचार करावा लागेल!
समाजमनातील हे विचार न कळण्याइतके अण्णा असमंजस नव्हते. त्यांनी व्यावहारिक विचार केला. अण्णांच्या आश्रमात शिकण्यासाठी दाखल केलेल्या विधवांचा विवाह होतो म्हणून त्यांना तेथे पाठवूच नये असे कोणाला वाटत असेल, तर अण्णा आपला मूळचा विधवाविवाहाचा विचार सोडायला तयार झाले.
दुसरे असे, की विधवाविवाहावर भर दिला असता, तर या संस्थेत मुलींवर चुकीचे संस्कार होतील, त्या वाईट मार्गाला लागतील, या भीतीपोटी आपल्या अविवाहित मुलींना शाळेत पाठवायचे प्रमाणही यामुळे कमी झाले असते.
अण्णांनी मग विचारपूर्वक निर्णय घेतला. संस्थेत दाखल झालेल्या विधवा स्त्रीच्या विवाहाशी संस्थेला काही देणे-घेणे नाही. तो सर्वस्वी तिचा व तिच्या पालकांचा प्रश्न राहील. संस्था आपल्या विद्यार्थिनींना त्यासाठी उद्युक्त करणार नाही, तसा आग्रहही धरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
अण्णांच्या या भूमिकेमुळे त्यांचे काही सहकारी कोडय़ात पडले. त्यांना ही मूळच्या ध्येयधोरणापासूनची च्युती वाटली. त्यांचे मतभेदही झाले.
या सहकाऱ्यांचे असे वाटणे तात्त्विक भूमिका म्हणून निश्चितच समर्थनीय व उचित होते यात शंका नाही. पण लोकव्यवहाराचा विचार केला असता अण्णांची विचारपद्धती योग्य होती, असेच म्हणावे लागेल. संख्येने अल्प असलेल्या विधवांचा विवाह करण्यावर भर दिला असता बहुसंख्य मुलींच्या शिक्षणात अडथळा येणार होता व त्या वंचित राहणार होत्या. ‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम् त्यजति पंडित:’ असे संस्कृत सुभाषित सर्वश्रुत आहे. येथे तर अध्र्यापेक्षाही कमी असलेल्या गोष्टींचा त्याग करावा लागणार होता. अण्णांनी तो केला.
यातील आणखी एक सूक्ष्म मुद्दा असाही होता, की संस्थेने कोणत्याही प्रकाराची प्रत्यक्ष शिकवण न देता, प्रवृत्त न करता, हस्तक्षेप न करतासुद्धा नव्या शिक्षणाचे वारे प्यालेल्या स्त्रिया आपण होऊनच पुनर्विवाहास तयार होतील.
अण्णांनी एक पाऊल मागे घेतले. ना त्यांची निष्ठा डळमळीत झाली होती ना ते ध्येयापासून दूर गेले होते. चालत असताना दोन पावले मागे घेतल्यामुळे पळता येणार असेल, तर त्याला माघार म्हणायचे कारण नाही.
येथे धोंडो केशव आणि रघुनाथ धोंडो या कर्वे पिता-पुत्रांची तुलना करण्याचा हेतू नाही. र. धों. आपली बुद्धिवादी भूमिका यत्किंचितही पातळ न करता आपल्या ध्येयाला व विचाराला अखेपर्यंत चिकटून राहिले, ही बाब काही कमी प्रशंसनीय नाही. परंतु, धों. के.नी थोडी तडजोड केली म्हणून त्यांना नावे ठेवायचेही काही कारण नाही.
नेतृत्वालाही दोन तऱ्हा आहेत. देशकाल-परिस्थितीचा विचार न करता, येतील तेवढय़ा अनुयायांना व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाणारी आणि कोणीही बरोबर आले नाही तरी चालेल, असे म्हणत ‘एकला चालो रे’ वाल्या एकांडय़ा शिलेदाराची. समाजाला दोन्ही प्रकारच्या नेतृत्वाची गरज असते.
समाजात असेही काही लोक असतात, की जे स्वत: यापैकी कोणत्याही प्रकारच्या नेत्याच्या मागे जात नाहीत, स्वत:ही नेतृत्व करीत नाहीत. पण सर्व प्रकारच्या नेत्यांवर टीका करण्यात मात्र आघाडीवर असतात.
अर्थात, अशा सवंग समीक्षकांचीही समाजाला गरज असते. त्यांनी केलेल्या टीकेमुळे कार्यप्रवण नेतृत्वास आपल्यामधील त्रुटींची जाणीव होते. त्या दूर करण्याचा ते प्रयत्न करतात.
महाराष्ट्राला जसे दोन्ही नमुन्यांचे नेतृत्व लाभले, तसेच टीकाकारही लाभले. त्यामुळेच तो पुढे जात असावा.
 *लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
 *उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’ हे सदर