संजीवकुमारचे चित्रपट ज्यांना लख्ख आठवत असतील, अशा चाहत्यांना अभिनयाच्या विविध पद्धतींना आपला नायक कसा लीलया सामोरा गेला आणि म्हणून ‘खिलौना’तला मनोरुग्ण, ‘सिलसिला’तला नवरा आणि ‘शोले’तला ठाकूर हे निरनिराळे कसे वठले, याचीही आठवण असते. नेमक्या अशाच आठवणींची शिदोरी यापुढे फिलिप सेमूर हॉफमनच्या जगभरातील चाहत्यांकडे उरणार आहे. सवरेत्कृष्ट अभिनेता म्हणून २००५ साली ‘ऑस्कर’ची सोनेरी बाहुली मिळवणाऱ्या फिलिप हॉफमननं ‘कपोट’ चित्रपटात लेखक ट्रमन कपोट यांची भूमिका समरसून केली. पण त्याच्या अभिनयशैलीचा तो एक प्रकार होता- त्यात बोलण्याला, आवाजाला महत्त्व होते. याच फिलिप हॉफमनने अगदी ‘मिशन इम्पॉसिबल’मध्येही (तिसऱ्या भागात) भूमिका केली, तिथेही कसदारच अभिनय केला, पण तो देहबोलीच्या जोरावर. देहबोलीचेही विभ्रम असतात, त्यामागे अभ्यास असावाच लागतो, हे दाखवून देण्यासाठीच जणू ‘फ्लॉलेस’ या चित्रपटात एका समलिंगी तरुणाची व्यक्तिरेखा फिलिपने साकारली आणि या चित्रपटातील रॉबर्ट डि नीरोपेक्षा फिलिप हॉफमनचाच अभिनय सरस आहे, यावर पैजा लागल्या! यापुढेही लागतील.
अभिनयशैलींचा रीतसर अभ्यास फिलिप सेमूर हॉफमन यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या ड्रामा स्कूलमध्ये केला होता. इथूनच नाटय़-शास्त्राची पदवी घेऊन ते बाहेर पडले आणि नाटकांतून, तसेच ‘इंडी फिल्म्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोटय़ा चित्रपटांतून भूमिका करू लागले. जन्मच न्यूयॉर्क राज्यात झालेल्या फिलिप यांना न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवर मान मिळू लागला, तो दिग्दर्शक म्हणूनही. आर्थर मिलरचे ‘डेथ ऑफ अ सेल्समन’ हे नाटक नटांच्या अभिनयक्षमतेचीच नव्हे तर अभिनयाची समज किती आहे याचीही परीक्षा पाहणारे. त्यातील भूमिकेसाठी त्यांना अमेरिकी नाटय़क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा ‘टोनी अवॉर्ड’ २०१२ मध्ये मिळाला. वय अवघे ४६. आजवरचे चित्रपट साठेक. ‘कपोट’ला ऑस्कर मिळाल्यापासून चित्रपटक्षेत्रात गेली सात वर्षे दबदबा, त्याच काळात आणखी तीनदा- डाउट, चार्ली विल्सन्स वॉल आणि द मास्टर या चित्रपटांतील सहनायकाच्या भूमिकांसाठी ऑस्करच्या सवाई पाचांत समावेश.. त्यामुळे आता कुठे फिलिप हॉफमनला ज्येष्ठतेचा मान मिळू लागला होता. ‘हंगर गेम्स’च्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण सुरू झाले होते. अन्य चित्रपट, नाटकांचे प्रयोग यांत वेळेचा ताळमेळ घालण्याची करामत फिलिप हॉफमन यांना जमू लागली होती. हे वळण अपयशाचे नक्कीच नव्हे. उलट यशाकडून आणखी मोठय़ा यशाकडे नेणारे.. पण अमली पदार्थाच्या जुन्या सवयीने याच काळात डोके वर काढले होते. त्यामुळे सुखा-समाधानाच्या नव्या शिखरांऐवजी हा अभिनेता मृत्यूच्या गर्तेत गेला. ‘तो अमुकच, असा शिक्का मारता येत नाही’ हे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे तंतोतंत खरे ठरवून!