12 August 2020

News Flash

महर्षी शिंदे यांना का गमावले?

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला खूप मान्यता मिळाली होती. ते स्वत: सवर्ण असले, तरी समकालीन अस्पृश्यांचे नेतेच मानले जात.

| April 11, 2014 01:46 am

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला खूप मान्यता मिळाली होती. ते स्वत: सवर्ण असले, तरी समकालीन अस्पृश्यांचे नेतेच मानले जात. शाहू महाराजांनी, अस्पृश्यांनी परजातीच्या नेतृत्वावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्यातलाच नेता निवडावा यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन शिंदे यांचे नेतृत्व संपले व आंबेडकरांचे नेतृत्व पुढे आले..
कोणत्याही समाजाच्या स्थितीगतीमध्ये त्याच्या नेतृत्वाचा मोठा वाटा असतो, याविषयी दुमत होण्याचे फारसे कारण दिसत नाही. सैद्धान्तिक पातळीवर विचार करायचा झाल्यास मार्क्‍सवादानुसार नेता हेसुद्धा तत्कालीन परिस्थितीचे अपत्य असते असे म्हणता येईल. परंतु हे फारच बाळबोध सुलभीकरण झाले असे म्हणण्यात खुद्द मार्क्‍स, लेनिन, कॅस्ट्रो, डांगे, बसू इ.च्या कर्तृत्वाचे अवमूल्यन होत आहे हे विसरता कामा नये. परिस्थितीचे सम्यक आकलन करून लोकसहभागाने तिच्यात हस्तक्षेप करून ती बदलण्यात यश मिळवणे हे नेतृत्वाचे लक्षण मानले, तर असे नेतृत्व केवळ परिस्थितीने घडते असे म्हणण्यात अर्थ उरत नाही. परिस्थिती तर समकालीन सर्वानाच समानत्वाने लाभलेली असते.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या चरणातील मराठी समाजाचा विचार करताना नेतृत्वाच्या त्रिकोणाची कल्पना पुढे येते. फुले, रानडे, चिपळूणकर हा तो त्रिकोण होय. हा साध्य त्रिकोण नसून एक प्रकारचा बम्र्युडा त्रिकोण होता, असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही. कारण त्या काळातील कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला त्यापासून अलिप्त राहणे शक्यच नव्हते. या तीन नेत्यांचे नेतृत्वच इतके जबरदस्त होते, की तुम्ही तुमच्या पिंडप्रकृतीनुसार त्यांच्यापैकी कोणाकडे तरी खेचले जाणारच.
उदाहरण म्हणून स्वत: लोकमान्य टिळकांचा विचार करणे उचित ठरेल. जातिनिहाय पाहिले तर टिळकच काय, पण एखाददुसरा अपवादवगळता वरिष्ठ जातीचा कोणीही फुल्यांचे नेतृत्व स्वीकारील हे दुरापास्त होते. मग या मंडळींसाठी रानडे व चिपळूणकर हे दोन पर्याय उपलब्ध होते. पैकी रानडे हे वयाने ज्येष्ठ आणि सरकारदरबारी तसेच लोकमानसातही चांगले प्रतिष्ठित झालेले. याउलट चिपळूणकर तसे पोरसवदा आणि सरकार व सरकारशी संबंधितांवर टीका करून पुढे आलेले. त्यामुळे त्यांच्या मागे जाण्यात धोका होता. आता या संदर्भात टिळकांचा विचार केला तर असे दिसते की एकदा सरकारी नोकरीच्या बेडीत अडकायचे नाही, असा निश्चय केल्यामुळे रानडय़ांच्या नेतृत्वाचा पर्याय टिळकांसाठी असून नसल्यासारखा झाला. एरवी कोणत्याही विषयाच्या खोलवर जाण्याची टिळकांची वृत्ती ही चिपळूणकरांपेक्षा रानडय़ांच्या अधिक जवळ जाणारी होती. चिपळूणकरांची भाषा कितीही चमकदार व म्हणून आकर्षक असली, तरी तिच्यातून गंभीर आणि प्रगल्भ विचार व्यक्त होतो असे म्हणायचे धाडस कोणी करणार नाही. टिळक खऱ्या अर्थाने पंडित होते. चिपळूणकरांमध्ये वाक्पटुत्व जास्त होते. अर्थात असे म्हटल्याने चिपळूणकरांच्या कार्याची किंमत कमी होते असे समजायचे कारण नाही. लोकांना त्यांच्या वारशाची जाणीव देऊन कृतिप्रवण बनवणे हे काम त्यांनी चोखपणे बजावले आणि टिळकांसाठी ते पुरेसे होते.
एवढा मुद्दा वगळला तर टिळकांचे गोत्र रानडय़ांशीच अधिक जुळत होते. समकालीन लोकांमधील चर्चेत रानडे व टिळक यांच्या पात्रतेचा व स्पर्धेचा विषय नेहमीच यायचा. टिळक रावसाहेबांशी स्पर्धा करतात असे काहींना वाटायचे, तर टिळक हे रानडय़ांचीच परंपरा पुढे चालवीत आहेत अशी काहींची धारणा होती. या संदर्भात गोविंद नारायण दातार यांच्या वेगळ्या प्रकारच्या लेखनाचा आधार घेता येतो. दातारांनी शेरलॉक होम्सच्या कथांना मराठी रूप दिले. कॅनन डायलच्या या गुप्तहेरकथांमध्ये शेरलॉक होम्स हा डिटेक्टिव्ह मुख्य नायक व डॉ. वॉटसन त्याचा सहकारी अशी रचना आहे. दातारांनी होम्सला माधवराव आणि वॉटसनला बळवंतराव बनवले. टिळक हे अंतरंगाने रानडय़ांच्याच विचारांचे असून रानडय़ांचेच काम पुढे चालवीत आहेत, अशी तत्कालीन सुबुद्ध लोकांची समजूत दातारांनी अशी व्यक्त केली आहे. वरकरणी पाहणाऱ्यांना टिळक, रानडय़ांचे प्रतिस्पर्धी आणि विरोधक वाटायचे आणि अनेक प्रसंगी टिळकांचे रानडय़ांबरोबरचे वर्तन होतेसुद्धा तसेच. नेतृत्व या घटनेमधील अनुस्युत द्वंद्वात्मकता आधी रानडे-टिळक आणि नंतर टिळक-गांधी या जोडय़ांमधून अत्यंत समर्पकपणाने व्यक्त झालेली आहे. थंडगार पडलेल्या या देशरूपी गोळ्याला ऊब देऊन त्याच्यात चलनवलन निर्माण करण्याचे श्रेय रानडय़ांना देणारे टिळकांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. भारतीय समाजाला पाश्चात्त्य पद्धतीचा आधुनिक नागरी समाज बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संस्थांची निर्मिती हे रानडय़ांचे मुख्य कार्य होते. तीच दिशा टिळकांनीच काय, पण चिपळूणकरांनीही पत्करली होती. या अर्थाने रानडे टिळकांचेच काय, चिपळूणकरांचेही गुरू ठरतात.
फुले, रानडे आणि चिपळूणकर यांच्या पश्चात महाराष्ट्राने पुन्हा एकदा नेतृत्व त्रिकोणाचा अनुभव घेतला. हा त्रिकोण होता स्वत: टिळक, गोपाळकृष्ण गोखले आणि छत्रपती शाहू महाराज या नेत्यांचा. वर उल्लेख केलेला द्वंद्वात्मक व्यामिश्रतेचा मुद्दा जमेस धरूनही असे म्हणता येते, की या तीन नेत्यांनी अगोदरच्या अनुक्रमे चिपळूणकर, रानडे आणि फुले यांची जागा घेतली होती. पण, याचा अर्थ असा होता, की दरम्यान मराठी समाज त्याच्यातील गटतट आणि त्याच्या समस्या यांच्यात विशेष फरक पडला नव्हता. मराठी समाजामध्ये एका बाजूला ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी तर दुसऱ्या बाजूला खुद्द ब्राह्मणांमध्येच जहाल आणि नेमस्त अशी फूट अधिकच ठळक झालेली होती. १९०८मध्ये लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा होऊन त्यांची ब्रह्मदेशातील मंडाले येथे रवानगी झाली. तेव्हा त्रिकोणाचा एक कोनच हरवल्यासारखा झाला. टिळक सुटून येईपर्यंत म्हणजे १९१४ च्या मध्यापर्यंत काँग्रेसचे नेतृत्व नामदार गोखले यांनी केले. परंतु १९१५च्या फेब्रुवारी महिन्यात त्यांचे निधन झाल्यामुळे पुन्हा एकदा एक कोन हरवला आणि टिळक व शाहू यांना एकमेकांशी सरळसरळ भिडावे लागले. समन्वयाची भूमिका मांडणारा व ती प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडणारा कोणी वजनदार नेता रानडय़ांनंतर झालाच नाही. उथळ अनुयायांच्या संख्येत मात्र वाढ होत राहिली.
१९२० साली लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि १९२२ साली शाहू छत्रपतींचे. मात्र त्यानंतर त्यांची जागा घेऊ शकेल असा एकही नेता त्यांच्या अनुयायांना लाभला नाही. परिणाम म्हणून तोपर्यंत भारतात अग्रेसर असलेला महाराष्ट्र राजकारणात एकदम मागे फेकला गेला, तो अद्याप आपले पूर्वीचे स्थान परत प्राप्त करू शकला नाही. टिळकांच्या पश्चात गांधीजींचे नेतृत्व स्वीकारायचे की नाही याविषयी मतभेद सुरू झाले. काही लोकांनी ते स्वीकारले व ते गांधींच्या मागे गेले. काहींनी ते स्वीकारले नाही. त्यांनी अखेपर्यंत गांधींना विरोध करून पाहिला. परंतु त्यांना यश आले नाही. इकडे शाहू छत्रपतींच्या ब्राह्मणेतर अनुयायांमध्येही याच स्वरूपाचा वाद झाला. गांधींचे नेतृत्व मान्य करायचे की नाही या विषयावर मतभेद झाले. परंतु १९३० पासून गांधीजींचा जयघोष करीत बहुतेक ब्राह्मणेतर काँग्रेसमध्ये गेले.
१९२०/२२ ते १९३० हा काळ महाराष्ट्राच्या इतिहासातील संभ्रमाचा, चाचपडण्याचा काळ आहे. ती एक निर्नायकी अवस्था आहे.
परंतु हा काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाच्या उभारणीचा काळ आहे. या उभारणीस शाहू छत्रपतींचा मोठा हातभार लागला होता. अस्पृश्य वर्गाने बाबासाहेबांचे नेतृत्व स्वीकारावे यासाठी स्वत: छत्रपती आग्रही होते. छत्रपतींच्या पाठिंब्यामुळे बाबासाहेबांच्या नेतृत्वाचा मार्ग सुकर झाला. त्या काळात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला खूप मान्यता मिळाली होती. ते स्वत: सवर्ण असले, तरी समकालीन अस्पृश्यांचे नेतेच मानले जात. शाहू महाराजांनी, अस्पृश्यांनी परजातीच्या नेतृत्वावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्यातलाच नेता निवडावा यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन िशद्यांचे नेतृत्व संपले व आंबेडकरांचे नेतृत्व पुढे आले.
शाहू छत्रपतींच्या म्हणण्यात तथ्यांश नक्कीच होता. नेता आपल्यापैकीच असेल, तर परावलंबित्व संपेल. हे योग्यच होते. पण या प्रकाराची दुसरी बाजू अशी आहे, की त्यामुळे आंबेडकरांच्या नेतृत्वाचा संकोच झाला. बाबासाहेबांच्या अंगच्या गुणांचा व कर्तृत्वाचा विचार केला असता त्यांनी शाहूंच्या पश्चात एकूणच ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करणे उचित ठरले असते. नाही तरी तोपर्यंत अस्पृशांची चळवळ ही ब्राह्मणेतर चळवळींचाच हिस्सा मानली जात होती. शाहू छत्रपती सद्भावनेने जी कृती करून बसले तिचा परिणाम एका बाजूला आंबेडकरांनी जातीपुरते नेतृत्व करणे व दुसरीकडे शिंद्यांनी राजकारण संन्यास घेणे असा दुहेरी झाला. शिंद्यांनी अस्पृश्यता निवारणाचे काम तसेच चालू ठेवून दुसरीकडे आंबेडकरांनी ब्राह्मणेतरांचे (अस्पृशांसह) नेतृत्व केले असते तर?
जरतरच्या अशा प्रश्नांना इतिहासात उत्तर नसते. पण या राजकारणात आपण शिंद्यांना गमावले याची खंत वाटते.
* लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
* उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’ हे सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2014 1:46 am

Web Title: why we lose maharshi vitthal ramji shinde
Next Stories
1 आम्ही साऱ्या बहिणी जवळीच्या
2 पालिकेतील विषवल्ली..
3 कोठून उगवतात हे ‘शाई’स्तेखान?
Just Now!
X