21 September 2020

News Flash

झरीन दारुवाला

संगीतासारख्या क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा उमटवणे ही खरोखरीच अतिशय अवघड कामगिरी असते. सरोदवादक झरीन दारुवाला यांनी ती लीलया पेलली आणि या क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान पक्के

| December 22, 2014 12:35 pm

संगीतासारख्या क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा उमटवणे ही खरोखरीच अतिशय अवघड कामगिरी असते. सरोदवादक झरीन दारुवाला यांनी ती लीलया पेलली आणि या क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान पक्के केले. पारशी समाजातील हाताच्या बोटावर मोजता येतील अशा नामवंत संगीतकारांमध्ये झरीन दारुवाला यांचे नाव घ्यावे लागते. फिरोज दस्तूर यांच्यापाठोपाठ अतिशय शालीनपणे आपली कला सौंदर्यपूर्ण रीतीने मांडणाऱ्या या कलावंताला मानाचे पान मिळणे आवश्यकच होते. त्या मूळच्या झरीन शर्मा. विवाहोत्तर पारशी धर्म स्वीकारला तरीही आपली संगीतकला त्यांनी सतत तळपत ठेवली. सरोदसारख्या कठीण वाद्यावर हुकमत मिळवण्यासाठीच जिथे बरीच वर्षे जावी लागतात, तेथे झरीनबाईंना वयाच्या तेराव्या वर्षीच आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत यश मिळाले. पुढच्याच वर्षी चित्रपट संगीतात त्यांना शिरकाव करता आला. त्या काळात चित्रपट संगीतात स्त्री कलावंतांना प्रवेश जवळजवळ निषिद्ध होता. याची कारणे दोन. एक सामाजिक आणि दुसरे कलावंतांची वानवा. नंतरच्या काळात झरीनबाईंनी आपल्या कलेने अभिजात संगीताचा आसमंतही भारून टाकला, पण चित्रपट संगीतातील आपले अनोळखी योगदान मात्र थांबवले नाही. आर. डी. बर्मन यांच्या अनेक गीतांमध्ये त्यांचे सरोद अगदी लख्खपणे अनुभवाला येते. या संगीतात होणाऱ्या प्रतिभा संगमात त्यांनी घातलेली अशी मोलाची भर रसिकांपर्यंत नावाने पोहोचली नाही, तर दाद मिळवणारी मात्र नक्कीच ठरली. पं. हरिपद घोष, पं. भीष्मदेव वेदी, पं. लक्ष्मीनारायण जयपूरवाले, पं. व्ही. जी. जोग यांच्यासारख्या गुरूंकडून त्यांनी विद्या आत्मसात केली. त्यामध्ये स्वप्रतिभेची भर घातली. संगीतासारख्या क्षेत्रात आपला प्रत्येक कार्यक्रम ही परीक्षा असते, याचे भान असणाऱ्या दारुवाला यांना संगीत नाटक पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणे ही स्वाभाविक गोष्ट होती. चित्रपट संगीताच्या क्षेत्रात वावरल्यामुळे त्यांच्याकडे सादरीकरणाची एक अनोखी जादू होती. चमत्कृतींपेक्षा आलापीने आणि तालाच्या संगतीने कला खुलवण्याची क्षमता होती. संगीताच्या क्षेत्रात अभावानेच दिसणाऱ्या मोजक्या स्त्री वादक कलावंतांमध्ये झरीनबाईंनी आपले नाव कोरल्यामुळे नव्या पिढीतील अनेक युवतींना प्रेरणा मिळाली. सामाजिक पातळीवर कलावंताला फारसे महत्त्व मिळत नसतानाच्या काळात त्यांनी कलाक्षेत्रात राहून हा सामाजिक लढा दिला. त्यासाठी कधी आक्रस्ताळेपणा केला नाही, की प्रसिद्धीची विकृत वाट पकडली नाही.  कोणत्याही एका गुरूच्या संगीताची छाप त्यांच्या वादनात कधीच दिसत नसे, याचे कारण त्यांच्याकडे असलेली वेगळी सौंदर्य दृष्टी. आपले वेगळेपण आपल्या कलेतूनच सिद्ध व्हायला हवे, या आग्रहामुळेच  त्या उंचीवर पोहोचू शकल्या. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना, त्यांच्या सामाजिक लढय़ाबद्दल त्यांना अभिवादनही करायलाच हवे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 12:35 pm

Web Title: zarin daruwala
Next Stories
1 राल्फ जार्दानो
2 लिबी लेन
3 थिएरी हेन्री
Just Now!
X