हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या। रहें आजाद या जग में, हमें दुनिया से यारी क्या ।। आत्मतृप्ताची स्थिती कबीर सांगत आहेत. परमेश्वराच्या प्रेमात जो आकंठ बुडाला आहे त्याला कशाचा होश असेल? ज्याला दुनियेशी काही देणंघेणं उरलेलं नाही तो जगात राहो की जगापासून मुक्त राहो, त्याला काय फरक पडतो? जो बिछुडम्े हैं पियारे से, भटकते दर-बदर फिरते। हमारा यार है हम में, हमन को इन्तजारी क्या।। १।। जे त्या परमात्म्यापासून दूर आहेत ते खऱ्या आत्मसुखापासून वंचित आहेत. सुखाच्या आशेनं त्यांना दारोदारी  वणवण भटकावे लागत आहे. ज्याचे त्या परमात्म्याशी पूर्ण आंतरिक ऐक्य साधले आहे त्याला वाट पाहाण्याचे शीण कुठले? वाट त्याची पाहावी लागते जो आपल्यापेक्षा वेगळा आहे, आपल्यापासून दूर आहे. जो आपल्यातच आहे, ज्याच्याशी क्षणोक्षणीचा आंतरिक संग सुरू आहे त्याची वाट कशाला पाहावी लागेल? पुढच्या ओळीत कबीर आपल्यासारख्यांच्या जगण्यातील मुख्य चुकीवरच बोट ठेवतात. ते म्हणतात, खलक सब नाम अपने को, बहुत कर सिर पटकता है। हमन गुरु ज्ञान आलिम हैं, हमन को नामदारी क्या।। २।। याचा अर्थ असा की, या दुनियेत जो तो आपलं नाव मोठं व्हावं म्हणून किती धडपड करत असतो पण आम्हाला तर सद्गुरूंनी ज्ञान दिलं आहे, आता मिथ्या प्रसिद्धीशी आमचं काय देणंघेणं? दुनियेत जो तो आपलं नाव मोठं व्हावं म्हणून धडपडत असतो. नश्वर देहाला साठ-सत्तर वर्षांसाठी लाभलेलं नाव! ते टिकावं म्हणून किती आटापिटा चालतो. त्या नावाच्या जपणुकीसाठी, गवगव्यासाठी, प्रतिष्ठेसाठी किती राजकारण आणि मोर्चेबांधणी? तरी काळाच्या प्रवाहात ते नाव पाचोळ्यागत उडून जातंच. कबीर सांगतात, आम्हाला सद्गुरुंनी खरं शाश्वत नाम कुणाचं, त्याचं ज्ञान दिलं आहे! त्या शाश्वताचंच नाम वाढविण्यात आम्ही दंग आहोत, आमच्या नामदारीचं, आमच्या प्रसिद्धीचं भान पूर्णपणे लोपलं आहे. न पल बिछुडम्े पिया हम से, न हम बिछुडम्े पियारे से। हो एसी लव लगी हरदम, हमन को बेकरारी क्या।।३।। आमचा तो प्रियतम, तो परमेश्वर ना कधी आमच्यापासून क्षणभरासाठीही दुरावला ना आम्ही त्याच्यापासून क्षणभरही दुरावलो, दोघे एका लयीत असे मग्न आहोत की बेकरारी, बेचैनी म्हणून काही उरलेलीच नाही.  यापुढे जे या मार्गावर येऊ इच्छितात आणि अशा प्रेमात दंग होऊ इच्छितात त्यांना कबीर या भजनाच्या अखेरच्या ओळीत महत्त्वाचा सल्ला देतात. ते म्हणतात, कबीरा इश्क का माता, दुई को दूर कर दिल से। ये चलना राह नाजुक है, हमन शिर बोझ भारी क्या।।४।। कबीर प्रेमात असा दंग आहे की त्यानं सर्व तऱ्हेचं द्वैत हृदयातून हद्दपारच केलं आहे. या मार्गावरून चालायचं असेल तर लक्षात ठेवा की रस्ता मोठा नाजूक आहे. त्यावरून चालणं फार कठीण. तेव्हा चालताना डोक्यावर ओझं लादून घेऊ नका. आता या भजनात थोडं खोलवर जाऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 279 self gratification position
First published on: 19-12-2012 at 03:50 IST