दीक्षा घेईन, पण आपली काही पथ्यं असली तर ती माझ्याच्यानं पाळली जाणार नाहीत, असं अंबुराव महाराज श्रीउमदीकर महाराजांना म्हणाले खरं.. पण अध्यात्माच्या मार्गात केवळ एकच पथ्य असतं.. श्रीसद्गुरूंच्या आज्ञेचं पालन! अंबुराव महाराज यांच्या जीवनात ते पदोपदी दिसलं.. अंबुराव महाराज यांचे ‘शरणागती’ हे विलक्षण चरित्र हृदयेंद्रनं अनेकदा वाचलं होतं.. त्यातला जगावेगळ्या दीक्षेचा हा प्रसंग त्याच्या मन:चक्षूंसमोर उभा राहिला.. जवळ जवळ अशिक्षित, दरिद्री व खेडवळ अशा अंबुरायांना महाराजांनी वरकरणी जुलमानं आपल्याकडे खेचून घेतलं खरं.. पण हेच अंबुराया नंतर किती सद्गुरूमय झाले! उमदीकर महाराजांचा विचार आणि त्यांचा विचार, उमदीकर महाराजांची इच्छा आणि अंबुरायांची इच्छा यात कधीच अंतर उरलं नाही.. मग हृदयेंद्रला वाटलं की अंबुराव महाराजांनी त्यांच्या बालकवत् निरागस निर्मळ स्वभावाला अनुसरून दीक्षेआधीच सद्गुरूंना सांगितलं की, दीक्षेची पथ्यं माझ्याकडून पाळली जातील, एवढी माझी तयारी नाही. मला दुसरा संसारही करायचा आहे. त्यामुळे दीक्षा नको! आज सद्गुरूपदाचा आणि शिष्यत्वाचाही किती बाजार झाला आहे! दीक्षा घेणाऱ्यांची संख्या वाढती आहे आणि दीक्षा ही आत्मकल्याणासाठीच हवी, हेसुद्धा जो तो सांगतो. प्रत्यक्षात दीक्षेनंतर सामान्य प्रापंचिक इच्छांची यादीच सद्गुरूंकडे वारंवार मांडली जाते! खरं आत्मकल्याण हवंच आहे कुणाला? ज्याला त्याला आत्ताचं जीवन सुखाचं व्हावं, एवढीच इच्छा आहे!

कर्मेद्र – (हृदयेंद्रजवळ येत त्याचा खांदा हलवत..) एवढा कसला विचार करतोयस? मान्य आहे ख्यातिला तुझ्या मनासारखा स्वयंपाक जमलेला नाही..

हृदयेंद्र – (हसत) विचार कुठे करतोय? मनापासून खातोच तर आहे..

लूची म्हणजे आपली पुरी आणि पंचफोरन अर्थात पाच प्रकारच्या मसाल्याच्या प्रकारांची फोडणी देऊन केलेली छोराछोरी ही मिश्र भाजी आणि बऱ्याच मिठाया व मिष्टी दोइ असा बंगाली शाकाहारी बेत हृदयेंद्रसाठी होता. बंगालमधील गावांत शाकाहारी पदार्थ रांधण्यासाठीची स्वयंपाकखोलीही वेगळीच असते. तिथली भांडीही वेगळीच असतात. शहरात तेवढं पाळलं जात नसलं तरी ख्यातिनं ते पाळलं होतं. म्हणून हृदयेंद्र एका कोपऱ्यात बसून इथं खाऊ शकत होता. पण माछेर भाताची प्लेट हातात घेतलेल्या कर्मेद्रनं स्पर्श केल्यानं त्यानं रागानं त्याच्याकडे पाहिलं. कर्मेद्ननं अजीजीनं माफी मागितली तेव्हा योगेंद्रनं विचारलं..

योगेंद्र – मूळ विषयाकडे वळू या का? हृदू तू मगाशी बरीच उदाहरणं सांगितलीस.. त्यांच्याविषयी थोडं सांग ना..

हृदयेंद्र – काय सांगू आणि किती सांगू? सद्गुरुंच्या इच्छेत जीवन ओवलेली शिष्यमंडळी ही! एकदा अचलानंद दादा सांगत होते.. रामदास स्वामींचं चरित्र ते वाचत होते.. कल्याणचं वर्णन वाचताना त्यांच्या मनात आलं, कल्याण स्वामी जसे सदोदित रामदासांबरोबर सावलीसारखे असत, तसेच आपणही तर आहोत! तेव्हा ते चरित्र वाचताना कल्याणच्या जागी ते स्वत:ला पाहात होते.. मग तो प्रसंग आला! गडावर रामदास स्वामी बोलत आहेत आणि सोसाटय़ाचा वारा सुटला..  रामदास स्वामींची छाटी म्हणजे वस्त्र उडालं. ते ओरडले, अरे कल्याणा छाटी.. कल्याणस्वामींनी क्षणाचाही विलंब न लावता कडय़ावरून उडी घेत छाटी पकडली.. दादा म्हणाले, हा प्रसंग वाचताना कल्याणानं छाटीसाठी कडय़ावरनं ज्या क्षणी उडी घेतली त्या क्षणी मी बाजूला सरलो! आपण कल्पनेतही कल्याण होऊ शकत नाही, याची जाणीव झाली!!

कर्मेद्र – पण हा वेडेपणाच आहे.. बाजारातून शेकडो छाटय़ा आणता आल्या असत्या..

हृदयेंद्र – हाच आपल्यात आणि सद्शिष्यांतला फरक आहे! काही मिनिटांत कल्याणस्वामी छाटी घेऊन गड चढून आलेही..

कर्मेद्र – पण आलेच नसते तर? मला ना ही उदाहरणंसुद्धा डेंजरस वाटतात.. असं उडी मारणं एखाद्यालाच जमतं ना? मग सगळ्यांना कशाला ही उदाहरणं सांगता? अध्यात्माचा मार्ग काही इतका धोकादायक नाही..

योगेंद्र – वा म्हणजे कर्मू तूही या मार्गावर आलास तर!

हृदयेंद्र – (हसत) अरे तो इथलाच आहे! आणि बघ सद्गुरूंच्या आज्ञेचं बोट पकडायला कधीतरी भीतीच्या कडय़ावरून तोही नि:शंक निर्भयतेन झेपावेल!!