फराळ

कडवा सासुरवास सोसणाऱ्या जुन्या अमदानीतील सुनांचा जीव एकटीने ते जडशीळ जाते ओढताना पार मेटाकुटीस येऊन जाई.

आता भाजणीच काय पण चकल्या-कडबोळीही बाजारात आयतीच तयार मिळतात ही बाब अलाहिदा. पण, घरामध्ये चकल्यांच्या भाजणीची तयारी सुरू झाली की मागील पिढ्यांना चाहूल लागायची दिवाळीची आणि त्या आनंदोत्सवाचा अविभाज्य घटक असलेल्या फराळाची. भाजणी निगुतीने करण्यासाठी घरातील गृहिणींची होणारी लगबग आणि घालमेल मोठी औरच असे. घरातील जात्यावर भाजणी दळणे हा त्यांतील सर्वांत जिकिरीचा भाग. त्यांतही, कडवा सासुरवास सोसणाऱ्या जुन्या अमदानीतील सुनांचा जीव एकटीने ते जडशीळ जाते ओढताना पार मेटाकुटीस येऊन जाई. दळणाचा धबडगा एकाकी रेटताना शिणलेली अशीच एक सासुरवाशीण तिचा आत्मसखा असणाऱ्या कान्हालाच मदतीसाठी साकडे घालते, असे एक मोठे हृद्य शब्दचित्र येईं वो कान्हाई मी दळीन एकली। एकली दळितां शिणले हात लावीं वहिली अशा करुण-सात्त्विक शब्दांत गुंफतात नाथराय. मात्र, ही गृहिणी साधीसुधी नाही. परमार्थाच्या प्रांतातील ती एक चांगली परिपक्व साधक होय, याची रोकडी जाणीव नाथराय तिने मांडलेल्या दळणाचे अ-लौकिक रंगरूप वैराग्य जातें मांडुनी विवेक खुंटा थापटोनी। अनुहत दळण मांडुनी त्रिगुण वैरणीं घातले अशा आशयगर्भ शब्दकळेद्वारे विशद करत बिंबवतात आपल्या मनावर. खुंटा घट्ट असेल तरच दळण सुविहित पार पडते. जाते फिरताना साहजिकच सैलावणारा खुंटा अधुनमधून ठोकूनठाकून बळकट स्थिर करावा लागे. त्यासाठी दळायला बसतानाच दक्ष गृहिणी हाताशी बत्ता घेऊन ठेवत असत पूर्वी. दळणामध्ये स्थिर खुंट्याचे जे माहात्म्य तोच आणि तसाच महिमा साधनेच्या प्रांतामध्ये नांदतो विवेकाचा. साधन चतुष्ट्यामध्ये विवेकाला अग्रपूजेचा मान बहाल केलेला आहे तो काही केवळ उपचारापुरताच नव्हे. विवेकाचे अधिष्ठान बुलंद असेल तरच विठोबाच्या राज्यातील निरंतर दिवाळीचा अक्षय आनंद उपभोगण्याची पात्रता सिद्ध होते अंगी. त्यांमुळे, साधनापथावरील प्रदीर्घ वाटचालीदरम्यान जरुरीचे असणारे पाथेय पदरी बांधून घेण्याच्या तयारीत असणाऱ्या उपासकाने प्रथम विवेकरूपी खुंट हालवून तो चांगला स्थिर करावा, असा अनुभवजन्य सल्लाच आहे तुकोबांचा. हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट । मग तयाच्या आधारें । करणें अवघें चि बरें हे त्यांचे उद्गार विलक्षण उद्बोधक आणि अर्थगर्भ होत या संदर्भात. विवेकाचा खुंटच बळकट आणि स्थिर नसेल तर वैराग्याच्या जात्याला भरवलेली त्रिगुणांची वैरण वस्त्रगाळ दळलीच जाणार नाही. परमार्थाचेही एक वेळ राहू देत. विवेकाचा खांब कणखर असेल तरच त्याच्या आधारे संसारात पदोपदी अनुभवास येणाऱ्या सुख-दु:ख, मान-अपमान, पाप-पुण्य यांसारख्या द्वंद्वद्वैताच्या लाटा झेलून परतवता येतात. दळण मांडायचे ते परमार्थाची भाजणी दळण्यासाठी की प्रपंचाची, हा फार गौण भाग होय. विवेकरूपी खुंट अचल व ठाम असलाच पाहिजे, हाच तर होय तुकोबांच्या कथनाचा गाभा. विवेकाद्वारे साध्य होणाऱ्या द्वंद्वमुक्तीची परिणतीच भक्तीमध्ये होत असते, असे प्रतिपादन विवेक-सांगाती जयासी जोडला। थारा तो मोडला पातकांचा। विवेके वैराग्य जोडेल निश्चित। भक्ति हे आंकित विवेकेची अशा नि:शंक शब्दांत करत विवेक, वैराग्य आणि भक्ती यांचे आंतरिक नाते स्पष्ट उलगडतात बहेणाबाई. जात्याचा खुंटा ठोकून चांगला बळकट केला की फराळापर्यंतची वाट आपसूकच सुकर बनते ती अशी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali festival happy integral component grind bhajani on a fork akp

ताज्या बातम्या