चोखोबारायांच्या धर्मपत्नी सोयराबाई म्हणजे भागवतधर्मी संतमंडळातील एक लक्षणीय असे व्यक्तिमत्व. चोखोबांची सावली बनून जीवन व्यतीत करण्याचा परिपाठ सोयराबाईंनी निष्ठेने जन्मभर जपला-जोपासला असला पाहिजे हे त्यांच्या, आज मोजक्या संख्येने हाती येणाऱ्या अभंगरचनेवरून विनासायास ध्यानात येते. मात्र, असे असूनही या अ-साधारण विभूतीची तिच्या शब्दसाहित्यामधून डोकवणारी अमिट अशी आत्मखूण काही लपत नाही. सगळे मिळून ६२ एवढेच काय ते अभंग आजघडीला उपलब्ध होतात सोयराबाईंचे.   चोखोबांचे प्रासादिक वाङ्मय साक्षेपाने अक्षरबद्ध करणाऱ्या अनंतभट्टांनीच सोयराबाईंच्या स्वानुभवसिद्ध उद्गारांना शब्दबद्ध करून जपले असण्याची शक्यताच बळकट वाटते. भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तितत्त्वाला लाभलेली चिकित्सक ज्ञानाची बैठक आणि शुष्क कर्मकांडाचे अवडंबर माजवत माणूसधर्माशी फारकत घेणाऱ्या आचारविधींना सडेतोड जाब विचारणारी निर्भयता यांचे लखलखीत दर्शन घडवतात सोयराबाई त्यांच्या एका अभंगामध्ये. निम्न अथवा कनिष्ठ जातवर्णाच्या व्यक्तीचा स्पर्श झाल्याने विटाळ होतो अशी जर धर्मवेत्त्यांची दृढ धारणा असेल तर, नश्वर देहापेक्षा त्यांत वास करणाऱ्या शाश्वत अशा विशुद्ध आत्मतत्त्वाची उपासना करण्याचा उपदेश करणाऱ्या त्याच धर्मवेत्यांच्या सिद्धान्तांचा अर्थ नेमका लावायचा तरी कसा, असा बिनतोड सवाल देहासी विटाळ म्हणती सकळ। आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध अशा अत्यंत मार्मिक शैलीत उपस्थित करतात सोयराबाई. वेदविहित ज्ञानविचाराच्या प्रांतात मत्र्य देहाची मुळात मातबरीच नसेल तर तशा तुच्छ अस्तित्वाशी निगडित शिवाशिव, बाटविटाळ यांसारख्या संकल्पना निरर्थकच नव्हेत का, असा अत्यंत सूक्ष्म परंतु तितकाच टोकदार प्रश्न समकालीन धर्ममार्तंडांपुढे, त्यांना अंतर्मुख बनण्यास भाग पाडणाऱ्या शैलीमध्ये मांडण्यात सोयराबाईंच्या व्यक्तिमत्वाचे अवघे अ-साधारणत्व एकवटलेले आहे. मुदलात, वेदान्ताच्या प्रतिपादनानुसार प्रत्येक सजीवात वास करणारे आत्मतत्त्व तर निरुपाधिक, निष्कलंक आणि परमशुद्ध होय. आता, अशा त्या उपाधिरहित आत्मवस्तूला ‘देह’ नामक उपाधीचाच आद्य विटाळ जडलेला आहे, असे म्हणायचे असेल तर मग जीवमात्रांच्या या सृष्टीत खऱ्या अर्थाने ‘सोवळे’ असे काहीच उरत नाही! बरे, अगदी परमार्थसाधनेसाठीच केवळ देहाचा विनियोग करावयाचा असा निश्चय केला घटकाभर तरी, विटाळातूनच हा मानवी देह आकाराला आलेला आहे, हे वास्तव कसे नाकारणार? केवळ धर्माच्या प्रांतातच नव्हे तर,  पढीक आध्यात्मिकांच्या विचारविश्वातदेखील नांदणाऱ्या अशा अप्रगल्भ धारणांची झाडाझडती देहींचा विटाळ देहींच जन्मला। सोंवळा तो जाहला कवणधर्म। विटाळा वांचोनी उत्पत्तीचें स्थान। कोण देह निर्माण नाहीं जगीं अशा व इतक्या सडेतोड आणि पराकोटीच्या तर्कशुद्धतेने घेतात सोयराबाई. या सगळ्यावर कडी करतात तुकोबा. स्वरूपत:च विशुद्ध उपाधिरहित असा असणारा या विश्वाचा आदिपिता पांडुरंग हाच पंचमहाभूतांचा जनिता असल्याने त्यांच पंचमहाभूतांचा मेळ असणारा देह अशुद्ध, ओवळा असेलच कसा, असा थेट पवित्रा आहे तुकोबारायांचा. विटेवर अवतरलेल्या परतत्त्वाचे गुणगान, तुवां केलें रे अमृता गोड त्या ही तूं परता । पांचां तत्त्वांचा जनिता सकळ सत्तानायक अशा शब्दांत करत, ‘देह’ ही आद्य उपाधी आणि त्या उपाधीचा आत्मवस्तूला झालेला विटाळ या विचारप्रणालीची पुरती वासलातच लावून टाकतात तुकोबाराय!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Godmother soyarabai a notable one of the saints personality akp
First published on: 15-09-2021 at 00:00 IST