‘मनुष्य हा समाजप्रिय प्राणी होय’- हे वाक्य घोकतच आपण मोठे झालेलो असलो, तरी या विधानात अनुस्यूत असलेला औरसचौरस आशय आपल्याला समग्रतेने उमगलेला असतोच असे नाही. व्यष्टी आणि समष्टी यांच्यादरम्यान नांदणाऱ्या बहुविध नात्यांचे सूचन या विधानात दडलेले आहे. व्यक्तिजीवन आणि समाजजीवन परस्परांना प्रभावित करत असतात, हा झाला त्या बहुपदरी अनुबंधाचा एक पैलू. लोकजीवनाचा स्तर उन्नत बनविण्यासाठी आवश्यक असणारी मूल्यचौकट सिद्ध करण्यासाठी काया झिजवणाऱ्या भागवतधर्मी संतमनाला या दुहेरी नात्याचे अचूक भान होते. ज्या जगाचे आणि त्यांतील लोकव्यवहाराचे आपण जैविक घटक आहोत, तो लौकिक व्यवहार निकोप बनवायचा तर समाजमनाची जडणघडण करण्याखेरीज गत्यंतर नाही, हे सूत्र संतांच्या मांदियाळीने केंद्रस्थानी ठेवले ते म्हणूनच. उन्नयनाच्या प्रदीर्घ काळ चालत आलेल्या प्रक्रियेद्वारे ‘समाज’ नावाची गणसंस्था आकारास आलेली असल्याने ती सर्वतोपरी रक्षणीय होय, ही अद्वयदृष्टीद्वारे साकारलेली प्रगल्भ धारणाच- ‘‘जे पुढतपुढती पार्था। हे सकळ लोकसंस्था। रक्षणीय सर्वथा। म्हणऊ नियां।’’ या ज्ञानदेवांच्या शब्दांत प्रगटलेली दिसते. भागवत धर्माने रुजवलेल्या विचारविश्वाचे अंतरंग ‘लोक’ या समूहवाचक संस्थेला वगळून आकळताच येणार नाही कधी. लोकसंस्थेचे रक्षण कशापासून करायचे, हा प्रश्न मग साहजिकच मनामध्ये उमटतो. या प्रश्नाचे उत्तर अतिशय साधे व सरळ आहे. लोकजीवनाचा पोत बिघडविणाऱ्या, लोकव्यवहार नासविणाऱ्या ज्या ज्या अनिष्ट, अनीतीमान प्रवृत्ती आहेत, त्यांची नांगी मोडत राहणे हेच त्यांवरील उत्तर. कधी तरी एकदा षटीसहामासी करण्याचे हे काम नव्हे. ते सतत करत बसावे लागते. हे उत्तरदायित्व स्वीकारतात लोकजीवनातील सत्प्रवृत्त, साधुवृत्तीचे लोक. भागवत धर्म त्यांनाच ‘संत’ असे संबोधतो. लोकजीवनाच्या हित-अहिताचा विवेक जो निरंतर जपतो तो संत, ही ‘संत’ या पदाची व्याख्या- ‘‘संत तेथें विवेका। असणें की जी।’’ अशा आगळ्या शैलीत ज्ञानदेव स्पष्ट करून टाकतात. संतत्वाला प्राप्त झालेल्या विभूतिमत्त्वाने जगाबरोबरच चालले-नांदले पाहिजे, हा या परंपरेने जपलेला जो आग्रह आहे, त्याचे गमक हेच. जीवनातील इष्टानिष्ट विवेक स्वत:च्या आचरणाद्वारे विवेकी साधू जगापुढे प्रगट करत असतात, हेच सत्य- ‘‘तैसे संत जगीं। क्रिया करूनी दाविती अंगीं।’’ अशा शब्दांत तुकोबा बिंबवतात. दोषयुक्त, गैरवाजवी कृत्ये करून समाजमनाची वीण विसकटून टाकणाऱ्या अनिष्ट व अनीतीमान वृत्ति-प्रवृत्तींना लज्जित करण्यासाठीच दक्षपणे सतत कार्यरत राहणे, ही आमच्या लेखी गौरवास्पद बाब होय, किंबहुना तेच मला सर्वाधिक प्रिय असणारे काम होय, असे तुकोबा- ‘‘आह्मां हे कौतुक जगा द्यावी नीत। करावे फजित चुकती ते।’’ अशा भाषेत उच्चरवाने गर्जून सांगतात. योग्य काय व अयोग्य काय याची शिकवण समाजमनाला अविरत देण्यासाठीच विभूतिमत्त्वाला पोहोचलेले विवेकी समाजमनस्क ऐहिक लोकव्यवहारामध्ये जाणीवपूर्वक सहभागी होत समाजशिक्षकाची भूमिका बजावत राहतात, हे भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या संतत्वाचे आगळेपण तुकोबा- ‘‘एकंदर शिका। पाठविला इहलोका।’’ अशा पद्धतीने स्पष्ट करतात. अद्वयदृष्टीच्या बैसकेवर अधिष्ठित संतविचार स्वरूपत: आणि स्वभावत:च ऐहिक आहे तो असा. आधुनिक परिभाषेत त्यालाच ‘सेक्युलर’ असे म्हणतात!

– अभय टिळक

india composite pmi up at 61 7 in may
खासगी क्षेत्रात वाढती सक्रियता! संयुक्त पीएमआय मे महिन्यात ६१.७ गुणांच्या उच्चांकी पातळीवर
Yavatmal, central bank,
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकारी संस्थांमधील अनिष्ठ तफावत ७०० कोटींवर, पीक कर्ज वाटपात दिरंगाई
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – अर्थव्यवस्थाफारुक नाईकवाडे
How much is the benefit of OBCs to the party in Maharashtra today
भाजपचे ओबीसी राजकारणातील ‘माधवं’ सूत्र काय आहे? महाराष्ट्रात ओबीसींचा पक्षाला आजही किती फायदा?
The country security market is estimated to reach dollars 736 billion by 2029 print eco news
देशाची सुरक्षा बाजारपेठ २०२९ पर्यंत ७३६ कोटी डॉलरवर जाण्याचा अंदाज
Mpsc Mantra Economy Question Analysis Non Gazetted Services Combined Pre Exam
Mpsc मंत्र: अर्थव्यवस्था प्रश्न विश्लेषण ;अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
Hindu population shrunk
‘हिंदूंची लोकसंख्या घटली’, पंतप्रधानांच्या समितीचा अहवाल; तर मुस्लीमांची लोकसंख्या…
non marathi mp in mumbai
मुंबईची धुरा अमराठी नेत्यांच्या हाती; पहिल्या निवडणुकीपासूनचे निकाल काय सांगतात?

agtilak@gmail.com