अभय टिळक agtilak@gmail.com

दीपावली हा दीपोत्सव. गोवत्सद्वादशीपासून म्हणजेच वसुबारसपासून त्याचा प्रारंभ होतो असे आपली परंपरा मानते. यमद्वितीयेच्या दिवशी, म्हणजेच, भाऊबीजेला होते या प्रकाशोत्सवाची सांगता. तुमच्या-माझ्या दिवाळीला संदर्भ असतो तो तिथीचा आणि काळवेळेचा. मात्र, संतमंडळाच्या लेखी उगवणारा दर दिवस हा जणू दिवाळीचा महोत्सवच असतो. ‘विठोबाचें राज्य आह्मां नित्य दिवाळी। विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी’ हा त्याच धारणेचा रोकडा दाखला. अंत:करणात विठ्ठलतत्त्वाचे अधिष्ठान अखंड दृढ असेल तर सर्वत्र दिवाळीच्या आनंदोत्सवाचीच अनुभूती येत राहते, हाच या कथनाचा इत्यर्थ. ‘करीं तिमिराचा नाश। दीप होउनि प्रकाश। तोडीं आशापाश। करीं वास हृदयीं’ अशा शब्दांत तुकोबा विठोबारायाची करुणा भाकतात त्यांमागील कार्यकारणभावही हाच. चित्तात सदैव प्रकाशाचे साम्राज्य नांदण्यासाठी दिवाही तसाच हवा. चिरंतन तेवणारा आणि अम्लान तेजाने तळपणारा. त्याची वातही हवी कधीच न काजळणारी. असा दीप कोणी कधी तरी पाहिला असेल का, अशी आशंका डोकवावी कोणाच्याही मनात. तिचे निराकरण करतात नामदेवराय. तो प्रसंगही मोठा हृद्य आणि करुण असा. ज्ञानदेवांच्या समाधीचा. ज्ञानदेवादी चारही भावंडांच्या समाधीप्रसंगी नामदेवराय उपस्थित होते एवढेच नाही तर, त्या करुणगंभीर घटनाक्रमाचे तितकेच चेतोहर आणि कमालीचे दृश्यमय शब्दचित्रही रेखाटलेले आहे त्यांनी. नामदेवरायांच्या गाथेमधील हे प्रकरण केवळ आणि केवळ अ-लौकिक असेच होय. ज्ञानदेवांच्या समाधीप्रसंगाचे नामदेवरायांनी केलेले तपशीलवार शब्दांकन अभंगांच्या दोन पोटविभागांमध्ये विभागलेले सापडते. समाधी घेण्यासाठी ज्या अलंकापुरी क्षेत्राची निवड ज्ञानोबारायांनी केली त्या क्षेत्राचा आणि क्षेत्रपरिसराचा महिमा गाणारे अभंग आहेत त्यांपैकी एका विभागामध्ये. तर, समाधीप्रसंगीच्या अभंगांचा जो दुसरा गुच्छ आहे त्यांत नामदेवराय विदित करतात ज्ञानदेवांच्या प्रत्यक्ष समाधीच्या वेळीचा इत्थंभूत घटनाक्रम. या गटातील एका अभंगामध्ये समाधीस्थळाचे मनोहर वर्णन मांडले आहे नामदेवरायांनी. समाधीची वेळा अवघ्या काही क्षणांवर आलेली आहे. सर्व तयारी निरखण्यासाठी नामदेवराय खुद्द पंढरीनाथासह प्रवर्तित झालेले आहेत, असा आहे तो प्रसंग. समाधीस्थळ उजळून टाकणाऱ्या दीपदानाचे, विलक्षण मनोज्ञ आणि नितांत अर्थगर्भ असे वर्णन ‘लावियेला दीप निरंजन ज्योती। प्रकाशल्या दीप्ती तन्मयाच्या’ अशा उत्कट शब्दशैलीद्वारे प्रगट करतात नामदेवराय. त्याला कोंदण आहे विशुद्ध अद्वयदर्शनाचे. तर, संतविभूतींची दीपावली आणि त्यानिमित्ताने त्यांनी मांडलेला दीपोत्सव अक्षय का, कसा व कशामुळे असतो याचेही रहस्य इथे विदित करतात नामदेव. ज्ञानोबारायांच्या समाधीस्थळापाशी प्रज्वलित केलेला दीप ‘निरंजन’ म्हणजे शुद्ध, अणुमात्रही ‘अंजन’ म्हणजेच डाग अथवा काजळी नसलेला असा आहे. त्याच्या दीपकळिकेमधून प्रसवणारा प्रकाशही ‘तन्मया’चा, म्हणजेच, अ-लौकिक अशा स्वरूपैक्याचा आहे. विशुद्ध ज्ञानाचा दीप अंत:करणात एकदा का तेवला की दृश्यमान असलेले उभे विश्वच परमैक्याच्या, तद्रूपतेच्या प्रकाशात अविरत न्हाऊन निघत असल्याची प्रचीती येते. त्यालाच म्हणावे ‘विठोबाचे राज्य’. त्या राज्यात मग अर्थातच नित्य आनंदोत्सव नांदतो दिवाळीचा.