– अभय टिळक agtilak@gmail.com
ध्यान ही अजिबातच सोपी गोष्ट नव्हे. कारण, मुळात चित्त अथवा मन एकाग्र होणे हेच अतिशय दुर्घट. महात्मा पतंजलींनी अष्टांगयोगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि धारणा या सहा पायऱ्यांच्या नंतर ध्यानाला सातवे स्थान प्रदान करावे यातच सर्व काही आले. परतत्त्वाच्या रूपावर ध्यान केंद्रित करण्याची साधना योगीजनांची खरोखरच कसोटी बघते ती याचमुळे. ‘सांग पंढरिराया काय करूं यासी। कां रूप ध्यानासी न ये तुझे’ अशी खंतवजा हतबलता भक्तराज दस्तुरखुद्द नामदेवरायांनी मुखर करावी, ही बाब या संदर्भात विलक्षण बोलकी ठरते. रूपाचा थेट आणि घनिष्ठ संबंध आहे व असतो तो आकाराशी. रूपाद्वारे सूचन घडते ते घनीभूत अस्तित्वाचे. त्यामुळे, साकाराचे अनुसंधान राखणे व टिकवणे हे तुलनेने सोपे. परंतु, अंमळ अधिक सूक्ष्मपणे पाहू गेले तर, रूपापेक्षाही गुणांवर वृत्ती केंद्रित करणे हे आणखी सुलभ शाबीत होते. या संदर्भात, विनोबाजी उदाहरण देतात दोन मातृभक्त भावांचे. पाठीला पाठ लावून जन्माला आलेले एका घरातील दोन भाऊ एकसारखेच मातृभक्त. मात्र, दोघांची पिंडप्रकृती भिन्न. वृद्धापकाळाने मातेचे देहावसान झाल्यानंतर आईची दररोज मनोभावे सेवा करणारा भाऊ मनाने पारच खचून गेला. आईच्या आठवणींत दिवसचे दिवस तो शोकाने आहाळत राहिला. दुसऱ्या भावाने मात्र मातृस्मरणाचा आगळाच पंथ अंगीकारला. आईने तिच्या जीवनभर जी मूल्ये शिरोधार्य मानली होती त्या मूल्यांचे तंतोतंत पालन-आचरण करण्याचा शिरस्ता जपत त्याने नित्याची जीवनरहाटी सुरू केली. या दुसऱ्या भावाला विनोबाजी नाव देतात आईचा ‘सगुण भक्त’. आई देहरूपाने अस्तित्वात आहे तोवर तिची निगुतीने काळजी घेणे ही या भावाच्या लेखी होती साकाराची सेवा. मात्र, मातेचे देहरूप अस्तित्व पंचत्वात विलीन झाल्यानंतर त्याने आरंभली उपासना निराकार मातृत्वाची. आईच्या ठायी वसणाऱ्या गुणांचे स्मरण अंत:करणात तेवते ठेवणे व त्या संस्कारांबरहुकूम आपला जीवनक्रम चालविणे ही होती परी या दुसऱ्या भावाच्या मातृस्मरणाची. त्याने ध्यान आरंभले ते सगुणाचे. भक्तीच्या प्रांतातही लागू पडते हेच तत्त्व. परमेश्वराच्या साकार मूर्तीची सेवा आणि परमेश्वरत्वाची अनुभूती आणून देणाऱ्या गुणनिधीचे पूजन या दोहोंची अंतिम फलश्रुती एकच. त्यांत श्रेष्ठ-कनिष्ठ भाव जोपासणे अथवा कल्पणे हे नाथांच्या लेखी ठरते मूर्खपणाचे लक्षण. ‘निर्गुणाहूनि सगुण न्यून। म्हणे तो केवळ मूर्ख जाण। सगुण निर्गुण दोनी समान। न्यून पूर्ण असेना’ असा खणखणीत अभिप्रायवजा शेरा आहे नाथांचा या संदर्भात. हा भाग होय ज्याच्या त्याच्या रुचिवैचित्र्याचा. इथे नाथराय दाखला देतात रोजच्या व्यवहारातील. गरमागरम पुरणाच्या पोळीवर घ्यायचे झाले तर तूप असावे लागते पातळ. परंतु, संक्रांतीच्या सणादिवशी पानात आलेल्या गुळाच्या पोळीसाठी मात्र पातळ तूप नाही चालत. ते लागते गोठलेलेच. तुपाची लज्जत ते पातळ आहे की गोठलेले यांवर थोडीच अवलंबून असते? ‘विघुरलें तें तूप होये। थिजलें त्यापरीस गोड आहे। निर्गुणापरिस सगुणीं पाहें। अतिलवलाहें स्वानंदू’ हा नाथांचा या संदर्भातील दृष्टान्त निर्देश करतो नेमका त्याच गाभ्याकडे. उपासना सगुणाची असो वा निर्गुणाची, अंतिमत: आनंद भोगायचा तो ध्यानाची परिणती ज्यांत होते त्या अद्वयानुभूतीचा.



