‘वारी म्हणजे विश्रांती’ अशी आणि इतकी सोपी व्याख्या करतो निष्ठावंत वारकरी ‘वारी’ या संकल्पनेची. या व्याख्येला आधार आहे प्रत्यक्ष तुकोबारायांचा. ‘‘विश्रांतीचा ठाव। पायीं  संतांचिया भाव।’’ हे महाराजांचे वचन हा याचा दाखला. संतांच्या पादुका पालखीमध्ये मिरवत, संतांचे अभंग गात, संतांचे बोट धरून वाटचाल करत संतांचे माहेर असणाऱ्या पंढरीक्षेत्राकडे वाटचाल करणे हा तर आषाढीच्या पायवारीचा गाभा. सर्वंकष विश्रांतीचे निधानच असणारी संतपावले संगतीला असताना श्रमसायासांची जाणीव व्हावी तरी कशी? इथंही मौज आहे एक मोठी. संतांचा हात धरून जी पंढरीनगरी गाठायची ती पंढरी म्हणजे तर केवळ असाधारण अशा विश्रांतीचे स्थान. ‘‘ऐसें विश्रांतीचें स्थान। आणिके ठायीं नाहीं जाण।’’ अशी रोकडी साक्ष आहे दस्तुरखुद्द नाथरायांची. फार फार मार्मिक बोलतात नाथ. प्रपंचाचा गाडा अहोरात्र ओढून थकलेल्या-शिणलेल्या संसारिकांनाच काय ती विश्रांतीची गरज असते असेच काही नाही. मुक्त-मुमुक्षू- वेदाभ्यासी- पुराणवक्ते- वादपटू-शास्त्राभ्यासक यांनाही तितकीच निकड असते प्रगाढ विश्रांतीची. अशी निर्घोर, नि:शंक विश्रांती हमखास लाभण्याचे स्थळ म्हणजे पंढरी, असे प्रतिपादन होय नाथांचे. त्याला कारणही आहे तसेच. ‘‘चहूं वाचांपरतें वेदां जें आरु तें। तें उभें आहे सरतें पंढरीये।’’ हा तर या क्षेत्राचा अलौकिक महिमा. मूर्तिमंत विश्रामच ज्याच्या चरणी विसावलेला आहे ते वेदवाणीलाही अगम्य असे सांवळे परब्रह्म पंढरीत असल्यामुळे- ‘‘तयाचे संगतीं अपार। विश्रांती घर पंढरी। म्हणोनी वारकरी भावें। जाती हावें पंढरीसी।’’ असे निखालस स्पष्टीकरण आहे नाथरायांचे. संतांच्या पादुकांसह विश्रांतीस्थळाकडे वाटचाल करण्याचा आषाढीच्या पालखी सोहळ्याचा आकृतिबंध निश्चित केला तो तुकोबारायांचे तिसरे चिरंजीव सद्गुरू नारायणमहाराज यांनी. ‘‘सकळ वैष्णवां वाटे जीवप्राण। तो हा नारायण देहूकर।’’ असा ज्यांचा महिमा अतीव श्रद्धेने गायला जातो, त्या नारायणमहाराजांनी पालखी सोहळ्याचा हा उपासनाविधी सुरू केला १६८५ साली. ज्येष्ठ वद्य सप्तमीच्या दिवशी नारायणमहाराज देहूहून पंढरीसाठी प्रस्थान ठेवत. पालखीमध्ये विराजमान असत तुकोबारायांच्या पादुका. ती पालखी घेऊन दिंडीसह नारायणमहाराज येत आळंदीस. ज्या पालखीमध्ये तुकोबारायांच्या पादुका विराजमान असत, त्याच पालखीमध्ये ज्ञानोबारायांच्याही पादुका ठेवून तो संयुक्त सोहळा भजन करत दिंडीसह पंढरीक्षेत्राकडे वाटचाल करत असे. दिंड्यांमधून वाटचाल करणारे वारकरी हे मूर्तिमंत प्रतीक होय सामूहिक भक्तीचे. समूहाचे साहचर्य असते शक्तीशी. अभिगमन, उपादान, योग, स्वाध्याय आणि इज्या या पाच उपासनाअंगांची प्रचीती येते वारीमध्ये पाऊल घातल्यानंतर. अभिगमन म्हणजे जवळ जाणे, उपादान म्हणजे परिचय, योग म्हणजे मिलाफ अथवा संयोग, स्वाध्याय म्हणजे अध्ययन आणि इज्या म्हणजे ऐक्य. परतत्त्वाशी ऐक्य पावण्याचे हे पाच टप्पेच जणू. नित्याने केलेल्या वारीमुळे साहचर्याद्वारे भगवंताशी परिचय घडतो. त्यांतून साकारतो परतत्त्वाशी मिलाफ. त्या संयोगाच्या सतताभ्यासाद्वारे अंतिमत: परमवस्तूशी घडून येते प्रगाढ ऐक्य. संतांसह केलेल्या वाटचालीदरम्यान ही सारी उत्क्रांती सुलभपणे घडून येत असल्यामुळेच ‘‘स्वल्प वाट चला जाऊं। वाचे गाऊं विठ्ठल।’’ असे आवाहन करत वारीसाठी पाचारण करतात तुम्हाआम्हाला तुकोबाराय! – अभय टिळक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

agtilak@gmail.com

Web Title: Loyal warkari wari concepts akp
First published on: 01-07-2021 at 00:01 IST