रवीन्द्र जैन यांचा पहिला हिंदी चित्रपट लोकप्रिय होण्याच्या आधी १५ वर्षे त्यांनी या क्षेत्रात उमेदवारी केली. कणव, भूतदया अशा शब्दांना तेथे कवडीचीही किंमत नसते. ‘गुणवत्ता दाखवा आणि जग जिंका’ हा तिथला सरळ नियम. जैन यांनी या नियमानुसारच आपली गुणवत्ता सिद्ध केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय चित्रपटसृष्टी बोलायला लागली, असे म्हणण्याऐवजी पडद्यावर गाऊ लागली, असे म्हणणेच सयुक्तिक ठरणारे आहे. १९३२ मध्ये आलेला पहिला बोलपट ‘आलम आरा’ हा संगीताने भारलेला होता. त्यानंतरचा मराठीतील ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट तर संगीतासाठीच पाहिला गेला. तेव्हापासून आत्तापर्यंत चित्रपटांमधील संगीताने सातत्याने स्वत:ची समांतर वाट तयार केली, ती काळानुरूप रुंदावत नेली आणि त्या काळाच्या प्रत्येक टप्प्यावर तिला सतत सर्जनाने भरलेले घडे रिकामे करणारे संगीतकारही मिळत गेले. रवींद्र जैन यांचे नाव अशा संगीतकारांमध्ये घेण्याशिवाय चित्रपटाच्या इतिहासालाही पर्याय नाही. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील चित्रपटसंगीतात अशा प्रज्ञावंतांची मांदियाळीच कार्यरत होती. नौशाद, एस. डी. बर्मन, रवी, मदनमोहन, शंकर जयकिशन यांच्यासारख्यांनी भारतीय चित्रपटांना जे संगीताचे भरजरी अलंकार चढवले, त्यामुळे ती आणखीनच लकाकू लागली. या दिग्गजांनंतर कोण, असा प्रश्न तेव्हाही कुणाला पडला नाही. कारण त्याच काळात नव्याने पुढे येत असलेल्या आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी यांच्यासारख्या संगीतकारांनी ती उणीव सहजी भरून काढली. या दिग्गजांच्या खांद्यावर बसून आणखी दूरचे पाहण्याची क्षमता रवींद्र जैन यांच्यासारख्या संगीतकाराकडे होती. त्या काळातील नव्या दमाच्या संगीतकारांमध्ये टिकाव धरण्याची खात्री जैन यांना वाटत होती, याचे कारण त्यांचा पहिला हिंदी चित्रपट लोकप्रिय होण्याच्या आधी सुमारे पंधरा वर्षे या क्षेत्रात उमेदवारी केली होती. त्या काळातील या सगळ्या मोठय़ा संगीतकारांच्या रचनांवरून लोकप्रियतेचे एक गणित ते मांडू पाहत होते. कलेच्या क्षेत्रात हुकमी लोकप्रिय होण्याची वाट सहसा सगळ्यांच्या हाती लागत नाही. आर. डी. बर्मन हे त्याचे एक उदाहरण. त्यांच्यासारख्या उच्च कोटीच्या संगीतकारालाही या दुनियेने बराच काळ अंधारात पाठवायला मागे-पुढे पाहिले नव्हते.
‘चोर मचाये शोर’ या रवींद्र जैन यांच्या १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने त्यांना संगीतकार म्हणून एक ओळख दिली. त्यानंतरच्या ‘गीत गाता चल’, ‘चितचोर’, ‘ अखियों के झरोखों से’ यांसारख्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या चित्रपटांमुळे रवींद्र जैन हे नाव सर्वतोमुखी झाले. सुसंस्कृत घरात जन्म मिळाला म्हणून सगळ्यांनाच आपली स्वत:ची वाट सापडते असे घडत नाही. पण अलीगढच्या औष्णिक ऊर्जा केंद्रात अभियंता असलेले जैन यांचे वडील आणि त्यांचे कर्तेसवरते बंधू यांनी संगीत कलेकडे अतिशय आदराने पाहिले. रवींद्र यांना संगीताचे औपचारिक शिक्षण मिळाले आणि साठच्या दशकातच म्हणजे वयाच्या विशीतच ते या रुपेरी दुनियेत नाव कमावण्यासाठी आत्मविश्वासाने उतरले. ‘देर है अंधेर नहीं’ ही उक्ती चित्रपटाच्या दुनियेत किती तरी कलावंतांसाठी खरी ठरली आहे. शंकर-जयकिशन काय किंवा मदनमोहन काय, अशांना या सृष्टीत आपले पाय भक्कमपणे रोवता आले, याचे कारण त्यांच्याकडे असलेले कलेचे खणखणीत नाणे. रवींद्र जैन यांना असा आत्मविश्वास असला, तरी तो प्रत्यक्षात येण्यासाठी काही काळ जावा लागणे स्वाभाविक होते. चित्रपटांमध्ये तेव्हा लोकप्रियतेच्या झुळकांवर तरंगत असलेल्या अनेकांना बाजूला सारण्यासाठी एक धमक लागते. पण तेवढय़ानेच भागतही नाही. अंगच्या कलागुणांची पारख करणारा पारखीही आयुष्यात यावा लागतो. जैन त्याबाबत नशीबवान. दिग्दर्शक आणि निर्माता यांना केवळ आपल्या कलेच्या जोरावर आपलेसे करण्यासाठी रवींद्र जैन यांच्याकडे फक्त त्यांची सर्जनशीलता होती. काही तरी नवे हवे, ही या चित्रसृष्टीची सततची मागणी असते. ती पुरी करता करता भल्यांची दमछाक होत असते. रोज नवे अपेक्षित असणाऱ्या या दुनियेत म्हणूनच कुत्र्याच्या छत्र्या मोठय़ा प्रमाणात उगवतात. एक-दोन चित्रपटांतच संपून जाणाऱ्या कलाकारांची ओळख निर्माण व्हायच्या आतच ती पुसलीही जाते. हे असे सतत दमदार राहणे आणि सर्जनाच्या नवनव्या वाटा धुंडाळणे म्हणूनच सोपे काम नाही. रवींद्र जैन यांना ते करता आले आणि जवळजवळ पंधरा वर्षे चित्रपटांना संगीत देत सतत लोकप्रिय राहण्याचे भाग्य त्यांच्या वाटय़ाला आले.
नव्वदचे दशक रवींद्र जैन यांच्या नावावर जमा होत असतानाच अनेक नवे संगीतकार आपले नाव काढण्यासाठी येत होते. नव्याची आस असलेल्यांना आकर्षित करत होते. भप्पी लाहिरी यांच्यासारखे जैन यांचे समकालीन संगीतकारही तेव्हा आपला जम बसवत होते. पण जैन यांनी या स्पर्धेत आपल्या कलेशी कधी प्रतारणा केली नाही. खपते ते चालवण्याचा हट्ट धरला नाही आणि चांगले तेच देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. संगीतकार म्हणून आणि गीतकार म्हणूनही जैन यांनी आपली कामगिरी चोख बजावली. त्याचाच परिणाम म्हणून संगीताचा अप्रतिम कान असलेल्या राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी त्यांच्याकडे चालत आली. आर. के. फिल्ममध्ये काम करायला मिळण्याची अनेक वर्षे वाट पाहणाऱ्या अनेकांना तेव्हा तो आश्चर्याचा धक्काही होता. केवळ आधीचे चित्रपट लोकप्रिय ठरले, एवढा एकच निकष राज कपूर लावणे शक्यच नव्हते. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक जैन यांची निवड केली. अर्थात या दडपणाच्या आव्हानाने जैन यांच्यामध्ये आणखी उत्साह आला. त्या चित्रपटातील त्यांची गीते सगळ्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. वरवर दिसायला अतिशय सोप्या चाली, पण त्यामध्ये असलेल्या कलात्मक वाटावळणांनी त्या अधिक चकाकून समोर आणण्याची खुबी रवींद्र जैन यांच्याकडे होती. प्रत्येक संगीतकाराला सतत नव्या आवाजाचाही शोध असतो. जैन यांना असा एक आवाज सापडला आणि त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी खुमारी अवतरली. येसूदास यांच्यासारख्या दक्षिणी चित्रपटातील लोकप्रिय गायकाला त्यांनी हिंदी चित्रपटाच्या दुनियेत आणले, त्यामुळे एका नव्या रंगाने संगीताची दुनिया बहरून गेली. राजेश खन्ना यांच्या पडद्यावरील ‘एक्झिट’नंतर सहजपणे समोर आलेल्या अमोल पालेकर यांच्यासारख्या अस्सल मध्यमवर्गीय अभिनेत्याने ज्या काळात या सृष्टीवर अक्षरश: कब्जा केला, त्याच काळात रवींद्र जैन यांच्यासारखे संगीतकारही आपली नवी प्रतिभा समोर आणू पाहत होते. आता कोण, या प्रश्नाने रसिकांच्या मनात चिंता निर्माण होण्याच्या आतच असे बदल आत्मसात करण्याची या अजब दुनियेची अचाट ताकद जैन यांच्याही पाठीशी उभी राहिली. त्याच काळात नव्याने घराघरांत पोहोचू लागलेल्या दूरचित्रवाणी या माध्यमातही जैन यांनी आपली हुकमत सिद्ध केली. रामानंद सागर यांच्यासारख्या समर्थ व्यक्तीला रवींद्र जैन यांनी दिलेली तेवढीच आश्वासक साथ या नव्या माध्यमातही अधिक उपयोगी ठरली. लहानपणापासून जैन यांना भजने गाण्याचा नाद असल्याने, भक्तिसंगीताच्या प्रांतात जैन नेहमीच ‘घरातले’ असायचे. चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी जे संगीत दिले, त्यामध्ये या भक्तीचा मोठा वाटा आहे.
अंधत्वामुळे आपल्याकडे कुणी कणवेने पाहावे, असे रवींद्र जैन यांना कधीच वाटले नाही. चित्रपटाची दुनियाही अशाबाबतीत कमालीची फटकळ राहिलेली आहे. कणव, भूतदया अशा शब्दांना तिथे कवडीचीही किंमत नसते. ‘गुणवत्ता दाखवा आणि जग जिंका’ हा तिथला सरळ नियम. रवींद्र जैन यांनी या नियमानुसारच आपली गुणवत्ता सिद्ध केली. रसिकांना आपलेसे केले आणि त्यांच्या गळ्यात आपली सुंदर गाणी रुंजी घालत राहतील, अशी व्यवस्था केली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत धडपडत वर जाऊ इच्छिणाऱ्या अनेक गुणवंतांचा आधार निखळून पडला आहे. त्यांना दृष्टी नव्हती. त्या अर्थाने डोळ्यांतले दीप कायमचेच मंदावले होते. पण दृष्टीचा अभाव ‘जब दीप जले आना..’सारखे चिरंतन थोर गाणे देण्याच्या आड आला नाही. अशी अनेक नितांतसुंदर गाणी त्यांनी दिली आणि संगीताचा ‘संकेत मीलन का’ ते कधी भुलले नाहीत. लोकसत्ता परिवारातर्फे त्यांना आदरांजली.

Web Title: Article on ravindra jain
First published on: 10-10-2015 at 00:34 IST