शिकून, अर्थार्जन करून आणि विविध क्षेत्रांत ठसा उमटवून स्त्रियांनी व्यक्तित्व सिद्ध केले तरीही गरोदरपणाचा एवढा बडिवार का?
मूल होणार, हे एखादीने सांगितल्यावर तिची ‘काळजी’ करण्याचे काही कारण नाही, हे अखेर आलिया भट्टने ठणकावून सांगितले..
एरवी एखाद्या नटीच्या गरोदरपणाची उठाठेव करायचे तसे ‘लोकसत्ता’ला काहीच कारण नाही. पण आजच्या काळातील चालीनुसार एखादी बातमी समाजमाध्यमांमधून येते आणि त्यातही ती एखाद्या स्त्रीशी संबंधित असते तेव्हा त्यानंतर त्या बातमीचे जे काही होते, ती म्हणजे आजच्या सामाजिक मानसिकतेची लिटमस टेस्टच असते. या मानसिकतेची आम्लता दिवसेंदिवस आणि उदाहरणागणिक वाढतच चालली आहे, ही त्यातली काळजी करण्याजोगी बाब. एकविसाव्या शतकाची, तंत्राधुनिक होण्याची भाषा करताना स्त्रियांच्या बाबतीत मात्र आपण दिवसेंदिवस कसे मागास होत चाललो आहोत, याची ही बातमी म्हणजे अगदी अलीकडच्या काळातील साक्षच म्हणायला हवी आणि म्हणून तिची आणि तिच्यासंदर्भातील काही मुद्दय़ांची चर्चा करणे गरजेचे ठरते.
तर दोनच महिन्यांपूर्वी विवाह केलेल्या आलिया भट्टने आपले बाळ येऊ घातले असल्याची बातमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जाहीर केली. समाजमाध्यमपूर्व काळात अशा बातम्या मनोरंजन क्षेत्राची बातमीदारी करणाऱ्या पत्रकारांमार्फत हळूहळू पसरत आणि मुख्य म्हणजे माध्यमांच्या मुख्य प्रवाहात त्यांना फारसे स्थान नसे. पण आता समाजमाध्यमांमुळे सर्वच सेलिब्रेटी मंडळींना आपल्या चाहत्यांशी इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक इत्यादींच्या माध्यमातून थेट आणि सचित्र संवाद साधता येतो. माध्यमांकडून समाजाकडे जाणारा माहितीचा प्रवाह आता अनेकदा उलटाही वाहताना दिसतो. इथे आलिया भट्टने आपली गोड बातमी आपल्या इन्स्टा खात्यावरून आपल्या चाहत्यांना सांगितल्यावर प्रथेप्रमाणे तिचे अभिनंदन वगैरे झालेच, पण ज्यांना कशातही खोटच काढायची असते अशा मंडळींनी या मुद्दय़ाच्या पुढे जाऊन तिला ट्रोल करायला सुरुवात केली. ‘लग्नाला दोनच महिने झालेले असताना इतक्या लवकर गरोदरपण?’, ‘आता यापुढे तू सिनेमात काम कसे करणार?’, ‘आलिया, तू सध्या लंडनमध्ये आहेस. आता तुझा नवरा तुला तिथे घ्यायला येईल.’, ‘दीपिका आणि कतरिनाने कशी बरे अजून गुड न्यूज दिलेली नाही?’ असे या जल्पकांचे प्रश्न होते. हे अति झाल्यावर त्याच व्यासपीठावरून आलियाने या जल्पकांना अगदी सडेतोड उत्तर दिले. ‘काही लोकांच्या डोक्यात आपण अजूनही पुरुषप्रधान जगातच वावरतो असेच असावे, असे दिसते. काहीही लवकर होत नाहीये की कशालाही उशीर झालेला नाहीये. कुणीही मला घ्यायला वगैरे येणार नाहीये, कारण मी एक माणूस आहे, स्त्री आहे. कुणी मला घ्यायला यायला मी काही पार्सल नाही. गरोदर झाले म्हणून मला तातडीने काम थांबवून विश्रांती घ्यायची काहीही गरज नाही. आपण आता २०२२ मध्ये जगतो आहोत. त्यामुळे आपण आता जुनाट बुरसटलेल्या मानसिकतेमधून बाहेर यायला हवे आहे..’
आपल्याला मूल होणार आहे हे गरोदरपणाच्या अगदी सुरुवातीलाच जाहीरपणे सांगणे आणि त्याबद्दल ट्रोलिंग करणाऱ्यांना तितक्याच थेटपणे सुनावणे हे आलिया भट्टचे वागणे खरोखरच २०२२ मधल्या मुलीसारखेच, प्रातिनिधिक आणि म्हणून दखल घेण्याजोगे आहे. ते केवळ एका अभिनेत्रीचे म्हणणे म्हणून दखलपात्र नाही, तर आपल्याला म्हणायचे आहे ते म्हणण्याचा आणि करायचे आहे ते करण्याचा अवकाश आजच्या तरुणींकडे कसा आहे याचे ते एक उदाहरण आहे. ग्लॅमरच्या जगात ते घडते तेव्हा ते अधिक प्रकर्षांने पुढे येते इतकेच. इतरही अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या आणि आपले शिक्षण, करिअर, लग्न, जोडीदार, मातृत्व या सगळय़ाबाबतची स्वजाणीव अत्यंत धारदार असणाऱ्या किती तरी मुली आपल्या आसपास वावरत असतात. फार नाही, पण अगदी चाळीसेक वर्षांपूर्वीपर्यंत असे चित्र अजिबातच नव्हते. तेव्हा विशी-बाविशीत मुलीचे लग्न झाले आणि वर्षभरात त्या जोडप्याला मूल झाले नाही तर ‘पाळणा कधी हलणार’ हे आसपासच्या बायाबापडय़ा आणि नातेवाईक आधी आडून आडून आणि नंतर थेट विचारून त्या मुलीला भंडावून सोडत. मुळात ‘वेळच्या वेळी’ म्हणजे विशी-बाविशीतच लग्न होण्यात आणि ते झाल्यावर वर्षभरात मूल होण्यात तिच्या सगळय़ा आयुष्याची इतिकर्तव्यता साठवलेली असे. तसे झाले नाही तर त्याचीही जबाबदारी जणू तिच्यावरच असे. लग्न करायचे ते मूल होण्यासाठी आणि मूल होणे, मातृत्व म्हणजेच स्त्रीत्व हे इतके बिंबवलेले होते, की त्या मापदंडांच्या पलीकडचा विचार केला जाणेही शक्य नव्हते. इरावती कर्वे यांच्यासारख्या थोर विदुषीलादेखील बाईपणाच्या या लादलेल्या संकल्पनेतून बाहेर पडता आले नाही- त्यांनीही मातृत्व हीच ‘परिपूर्ती’ मानली, तर इतरांचे काय? अर्थात साठ-सत्तर वर्षांपूर्वी चूल-मूल ही मानसिकता भेदण्याचे नशीब काही मोजक्या जणींनाच लाभे, बाकी बहुतेकींना ‘वेळच्या वेळी’ लग्नाच्या बोहल्यावर चढावेच लागे. त्यात जात्याच हुशार, बुद्धिमान मुलींची कुचंबणा झाली तरी कुणाला त्याचे काही पडलेले नव्हते. तथाकथित परंपरेची पाईक होण्याची, चूल- मूल सांभाळण्याची जबाबदारी बाईचीच, ही काळय़ा दगडावरची रेघच होती. घराची आर्थिक गरज म्हणून घराबाहेर पडून नोकरी करणे हीसुद्धा त्या स्त्रीला ‘दिलेली’ जणू मुभाच अशा पद्धतीनेच तिला वागवले जाई.
पण शिकणाऱ्या, अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांच्या पिढय़ा बदलल्या तशी ही परिस्थिती बदलत गेली आहे. अगदी चार-पाच वर्षांपूर्वी इंग्रजीमधील एका प्रथितयश टीव्ही पत्रकाराने टेनिसपटू सानिया मिर्झाने एक मोठी टुर्नामेंट जिंकल्यावर तिला ‘तू आई कधी होणार? आयुष्यात स्थिरस्थावर कधी होणार?’ असा प्रश्न विचारला होता. टेनिसच्या बॉलच्या वेगानेच सानिया मिर्झाचे प्रतिप्रश्न आले होते की, हा असा प्रश्न तू एखाद्या पुरुष सहकाऱ्याला विचारला असतास का? मी करियरमध्ये नवनवी शिखरे गाठते आहे, म्हणजे मी स्थिरस्थावर नाहीये का? की मूल जन्माला घातल्यावरच स्त्री स्थिरस्थावर होते? सानियाचे हे प्रतिप्रश्न ही तिची बिनतोड उत्तरे होती. आजची आलियादेखील वेगळय़ा पद्धतीने हेच सांगते आहे. तिला हवे आहे तेव्हा आणि तिला हवे आहे म्हणून तिने गरोदरपण स्वीकारले आहे. याचा अर्थ ती तिचे काम थांबवणार म्हणून किंवा ती सध्या एकटी आहे म्हणून किंवा कुठल्याही अन्य कारणासाठी बाकीच्या कोणीच तिची तोंडदेखली काळजी घेण्याची गरज नाही. गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यामधली एक सामान्य, नैसर्गिक घटना आहे. तिच्याकडे तितक्याच नैसर्गिकपणे पाहा आणि मुख्य म्हणजे आपण काही तरी देऊ पाहात आहोत या मानसिकतेमधून बाहेर या, हेच तर आलियासारख्या अनेकींचे सांगणे.
आता एखाद्याला असा प्रश्न सहजच पडू शकतो की या सगळय़ामध्ये चर्चा करण्यासारखे आहेच काय? तर ते हे की मुली दिवसेंदिवस अतिशय मोकळय़ा, थेट, होत आहेत. हवे ते म्हणत आणि हवे ते करत आहेत. आणि दुसरीकडे सामाजिक वातावरण मात्र दिवसेंदिवस संकुचित होत चालले आहे. राज्यव्यवस्था आणि धर्मव्यवस्था यांच्यामधली सीमारेषा विरळ असते तेव्हा त्याचा पहिला घाला असतो तो, स्त्रीच्या स्वातंत्र्यावर. ‘आपल्या संस्कृतीने तर महिलांवर खूप मोठी जबाबदारी देऊन ठेवलेली आहे’ हे पदोपदी ऐकवले जाण्याचा काळ सध्या आभाळासारखाच दाटून आला आहे. स्त्रीला आता मनमुक्त विहार करायचा आहे, पण समाजातील काही लोकांना ती त्याच पारंपरिक भूमिकेत राहायला हवी आहे. समाजाच्या मानसिकतेतील आम्लतेची ‘लिटमस टेस्ट’ आहे ती हीच.