अमेरिकेत प्रतिस्पर्धी पक्षाला सत्ता मिळाल्यास कसे वाटोळे होईल हा ट्रम्प यांचा सूर पाहता, तेथील अध्यक्षीय निवडणूक ‘ते’ विरुद्ध ‘आपण’ अशीच लढली जाईल..

गौरवर्णीयांच्या हातून अमेरिका निसटेल, हा ट्रम्प यांच्या नकारात्मक प्रचाराचा गाभा. याउलट जो बायडेन आणि डेमॉक्रॅटिक पक्षाकडे सकारात्मक मुद्दे असले, तरी भावनिक आवाहन तूर्तास नाही..

माध्यमांतील विशेषत: टीव्हीवरील हिंसाचार आणि निर्बुद्ध रिअ‍ॅलिटी शोजच्या अतिरिक्त ‘सेवना’ने व्यक्ती ‘मीनवर्ल्ड सिंड्रोम’ या मनोकायिक आजाराने बाधित होतात असा सिद्धांत विख्यात माध्यमतज्ज्ञ, समाजभाष्यकार डॉ. जॉर्ज गर्ब्नर यांनी पन्नास वर्षांपूर्वी मांडला; त्या वेळी समाजमाध्यमांचा जन्म व्हायचा होता. आज डॉ. गर्ब्नर हयात असते तर त्यांना या सिद्धांताच्या प्रत्यक्षातील विक्राळ रूपाची प्रचीती आली असती. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’चे वाचकप्रिय राजकीय विश्लेषक डेव्हिड ब्रूक्स यांनी रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प आणि कुटुंबीयांच्या वर्तनावर भाष्य करताना या सिद्धांताची आठवण करून दिली. या आजाराने बाधित व्यक्तीस आसपासचे जग आहे त्यापेक्षा कितीतरी पट अधिक धोकादायक असल्याचा भास होतो आणि अशी व्यक्ती मग या संभाव्य धोक्यापासून जगाचा कसा बचाव करता येईल या उपायांचीच चर्चा करीत राहते. ब्रूक्स यांच्या मते समस्त ट्रम्प कुटुंबीयांनाच या आजाराची बाधा झाली असून त्यामुळे ते फक्त अमेरिकेस असलेल्या कथित धोक्यांविषयीच बोलताना दिसतात.

अवघ्या १० आठवडय़ांवर येऊन ठेपलेल्या अध्यक्षीय निवडणुकांचे बिगूल गेल्या दोन आठवडय़ांत अमेरिकेत वाजले. डेमॉक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांची उमेदवार निश्चितीची अधिवेशने या काळात पार पडली. डेमॉक्रॅटिक पक्षाने जोसेफ रॉबिनेट ऊर्फ जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना अनुक्रमे अध्यक्षपदाचे आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मुक्रर केले तर रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प-पेन्स या जोडीवरच आपली भिस्त ठेवली. या दोन्ही प्रमुख पक्षांची अधिवेशने पार पडल्याने या निवडणुकांचे रणशिंग अधिकृतपणे फुंकले गेले. या टप्प्यावर जगाची आगामी दिशा निश्चित करणाऱ्या या निवडणुकीचा आणि त्यातील प्रमुख दोन पक्षांच्या अधिवेशनाचा तौलनिक आढावा घेणे आवश्यक ठरते.

डेमॉक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन आधी झाले. त्यात खुद्द बायडेन यांनी अध्यक्ष ट्रम्प यांचा उल्लेख एकदाही केला नाही. त्यांचा भर होता तो आपला पक्ष सत्तेवर आल्यास अमेरिकेसाठी काय करू इच्छितो हे सांगण्यावर. अमेरिकेच्या हरवलेल्या मूल्यांची पुन्हा समाजजीवनात प्रतिष्ठापना करणे आणि जागतिक स्तरावर अमेरिकेचे जे पूर्वी स्थान होते ते पुन्हा मिळवून देणे, हे बायडेन आणि हॅरिस यांच्या भाषणाचे सार. त्यात मग या दोघांनी आणि बिल क्लिंटन, बराक ओबामा यांनी अनेक तपशील भरले. त्यांचाही भर या मुद्दय़ांच्या अनुषंगानेच होता. प्रखर लोकशाहीनिष्ठा, तितकीच प्रखर सहिष्णुता आणि मतनिरपेक्ष धर्माचार ही त्यांची त्रिसूत्री. यांच्या आधारे आपल्या विस्कटलेल्या समाजजीवनाची फेरबांधणी कशी करता येईल यावर त्या अधिवेशनात भर होता. माजी अध्यक्षपत्नी मिशेल ओबामा यांनी तेवढी आपल्या भाषणात ट्रम्प याचे नाव घेऊन टीका केली. या आधुनिक मूल्यांच्या रक्षणासाठी ट्रम्प किती अयोग्य आहेत, हे त्यांचे म्हणणे. ट्रम्प यांचा आचरट आणि असभ्य इतिहास लक्षात घेतल्यास खुद्द तेदेखील या टीकेवर आक्षेप घेणार नाहीत. मात्र बायडेन वा हॅरिस यांनी ट्रम्प यांना लक्ष्य करणे टाळले आणि आपल्या पक्षाचा सकारात्मक कार्यक्रम काय ते सांगण्यावर भर दिला.

याच्या बरोबर उलट चित्र ट्रम्प आणि कुटुंबीयांनी गजबजलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात होते. रिपब्लिकन पक्षाने या अधिवेशनात कोणताही नवा कार्यक्रम दिला नाही. आपला ‘अमेरिका फर्स्ट’ हा कार्यक्रमच पुढे चालू ठेवला जाईल हे त्यांनी स्पष्ट केले. ते ठीक. पण त्या पक्षाचा सारा भर होता तो बायडेन आणि डेमॉक्रॅट्स सत्तेवर आल्यास अमेरिकेत कसा हाहाकार उडेल हे सांगण्यावर. बायडेन यांच्यामुळे देशाची कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल, आर्थिक स्थैर्य रसातळास जाईल कारण चीनला ते महत्त्व देतील, ‘काळ्या’ अफ्रिकन- अमेरिकनांविषयी या पक्षास सहानुभूती असल्याने ‘गोऱ्या’ अमेरिकनांच्या तुलनेत त्यांना अधिकाधिक महत्त्व मिळेल आणि अशा तऱ्हेने देशात अनागोंदी माजेल हे ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांगणे. ते अधिक जोरकसपणे मांडता यावे यासाठी त्यांनी वाटेल तसा सत्यापलाप केला. ट्रम्प हे ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या चळवळीचे खंदे टीकाकार आहेत. आफ्रिकी कृष्णवर्णीयांविषयी त्यांना तिटकारा आहे आणि तो दिसूनही येतो. अमेरिका ही प्राधान्याने गौरवर्णीयांची आणि या गौरवर्णीयांनाच महत्त्व मिळायला हवे हे ते प्रच्छन्नपणे मानतात. या गौरवर्णीयांचा पाठिंबा हा त्यांचा राजकीय आधार आहे. म्हणून सहिष्णुतेची भाषा आणि राजकारण करणाऱ्या डेमॉक्रॅट्सविषयी ते वाटेल ते बोलत असतात. ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ हे जगातील अनेक देशांत अनेक पक्ष आणि नेत्यांनी अनुसरलेले तत्त्व हे त्यांच्या प्रचाराचे मर्म. यामुळे सत्याचा लवलेशही नसलेल्या त्यांच्या अधिवेशनाने निवडणूक हंगामाच्या प्रारंभीच प्रचारप्रवाहात गटारगंगा मिसळून टाकली. प्रत्यक्षात नसलेले धोके अतिरंजित करून सांगणे आणि मतदारांच्या मनात सामुदायिक भीती निर्माण करून त्याचा राजकीय लाभ उठवणे हा ट्रम्प यांच्या प्रचाराचा आधार असेल हे यावरून दिसून येते. त्यांच्याबाबत ‘मीनवर्ल्ड सिंड्रोम’चा दाखला दिला गेला तो या संदर्भात.

याचा अर्थ असा की ट्रम्प यांना पराभूत करावयाचे असेल तर बायडेन यांना या असत्याधारित प्रचारावर मात करू शकेल असा मुद्दा उपस्थित करून सामान्यांच्या मनावर बिंबवावा लागेल. सामान्य मतदार आणि विचारशक्ती यांचे नाते अमेरिकेतही किती व्यस्त आहे हे गेल्या चार वर्षांत जगाने पाहिले. त्यामुळे बायडेन यांच्यासमोर भावनिक पण सकारात्मक मुद्दा हाती घेण्याचे आव्हान असेल. तूर्त काही प्रमाणात का असेना बायडेन यांना अधिक जनाधार असल्याचे मतदार चाचण्यांतून दिसते. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनापर्यंत बायडेन यांची आघाडी दहा बिंदूंनी अधिक होती. पण या अधिवेशनानंतर ती सात बिंदूंपर्यंत उतरली. याचा अर्थ रिपब्लिकन पक्षाच्या प्रचार राळेने बायडेन यांच्या आघाडीची धूप झाली. अंतिम निकालाच्या दृष्टीने निर्णायक असलेल्या सहा महत्त्वाच्या राज्यांत बायडेन यांची आघाडी अधिक घसरली. नॉर्थ कॅरोलायना, पेनसिल्वेनिया, मिशिगन, अ‍ॅरिझोना, विस्कॉन्सिन, फ्लोरिडा आदी राज्यांत बायडेन अजूनही आघाडीवर आहेत. पण त्यांची आघाडी कमी झाली आहे. म्हणजेच ट्रम्प यांचे प्रचारतंत्र यशस्वी ठरू शकते. त्यांच्या या गौरवर्णीयकेंद्री प्रचारात गेल्या निवडणुकीत २०१६ साली हिलरी क्लिंटन यांची आघाडी वाहून गेली होती हा ताजा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती होणारच नाही असे नाही. ‘गौरवर्णीयांची मते हिलरी यांनी गृहीत धरली ती चूक झाली,’ अशी प्रतिक्रिया त्यावर बिल क्लिंटन यांनी व्यक्त केली होती. खरे तर हिलरी यांनी कृष्णवर्णीय मतांच्या भरवशावर गौरवर्णीयांकडे इतके दुर्लक्ष करू नये असे क्लिंटन यांचे मत होते आणि त्यांनी ते निवडणुकीआधीही व्यक्त केले होते. पण तरीही हिलरी यांच्याकडून ती चूक झाली.

जो बायडेन ही चूक किती दुरुस्त करू शकतात हे आगामी काळात दिसेलच. पण ही निवडणूकही ‘ते’ विरुद्ध ‘आपण’ अशीच लढली जाईल, हे निश्चित. ‘त्यां’च्याबाबत यथायोग्य प्रमाणात भीती निर्माण केल्यास ‘आपले’ आपोआप आपल्या मागे येतात हे अमेरिकेच्या निवडणुकीने यशस्वीपणे दाखवून दिले आहे. त्या यशस्वी प्रारूपाचे अनुकरण नंतर जगभर झाले. त्यामुळे या निवडणुकीतही ट्रम्प यांचा भर भयनिर्मितीच्या हातखंडा प्रयोगावर असेल हे निश्चित. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनाने ही दिशा स्पष्ट केली आहे.