लोभसतेचा गौरव!

पन्नाससाठ वर्षांपूर्वीपर्यंत या सर्व सणांना हे सांस्कृतिक कोंदण असायचे. म्हणून मग दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की एरवी ‘मातीत खेळू नको’ असे आदेश ऐकत कथित आरोग्यदायी जगणाऱ्या मध्यमवर्गीय घरातली पोरे किल्ल्यांचा इमला रचू लागत.

दिवाळी या सणाला रंग, स्वर, गंध यांसह एक लोभस रूप आहे! ती लोभसता साजरी करणाऱ्या संपादकीय-मालिकेतील हे पहिले…

एरवी ज्यांचा आनंद घ्यायला मिळत नाही, त्याचा आनंद घेणे म्हणजे सण हे जर खरे असेल तर बारमाही आनंदासाठी जे समोर उपलब्ध आहे त्याच्याच आधारे दिवाळी साजरी कशी करणार असा प्रश्न हल्ली पडतो!

सण, उत्सव यांचा अर्थ काय? या साध्या प्रश्नाचे उत्तर तत्त्वज्ञ, संस्कृतीचे भाष्यकार, तिचे रक्षक गोल गोल फिरून फिरून जडजंबाळ भाषेत देतील. त्यातल्या धार्मिक खाचाखोचा धारदारपणे बाहेर येतील. त्यांस टोक काढले जाईल. पण आइन्स्टाइन म्हणायचा त्याप्रमाणे एखाद्यास एखादा मुद्दा साध्या भाषेत सांगता न आल्यास त्याला तो समजलेला नाही, असे खुशाल समजा! तेव्हा या मूळच्या प्रश्नाचे सोपे उत्तर असे की, दैनंदिन जगण्यात जे करायला मिळत नाही, ते करण्याची संधी म्हणजे सण आणि उत्सव! हा साधासोपा सरळ अर्थ सर्वच संस्कृतीतील सणवारांच्या मुळाशी असणार. तो लक्षात घेतला की आपल्याही चैत्र पाडवा ते फाल्गुन शिमगा अशा सर्व सणांची आनंदसंगती लागते.

ज्या वेळी विजेचा शोध लागला नव्हता, इंधने विकसित झाली नव्हती, अंधारात जगणाऱ्यांच्या जगण्यास खऱ्याखोट्या सावल्यांचे कायमस्वरूपी ग्रहण लागलेले होते त्या वेळेस वर्षातल्या चार रात्री तरी प्रकाशाने उजळून निघाव्यात ही इच्छा दीपावलीच्या मुळाशी असणार. बारा महिने चोवीस तास उद्योगपूर्व जगास शांतता अनुभवावी लागत होती. श्रवणेंद्रियांवर साठलेले हे शांततेचे शेवाळे दूर व्हावे या विचाराने या दीपावलीस फटाक्यांची जोड मिळालेली असणार. कृषक संस्कृतीत भाकरी-भाजी खाऊन आंबलेल्या जिवांस काही चटपटीत खाण्याची मुभा हवी या इच्छेत फराळाची व्युत्पत्ती असावी. वर्षभरात घाण्याच्या कामाला जुंपलेल्या बैलांसाठी पोळा तरी असतो. पण पालनपोषणात तितकीच महत्त्वाची आणि सात्त्विक भूमिका असलेल्या गोमातेचे काय? सोमवारीची वसुबारस तिच्या कौतुकाची.

पन्नाससाठ वर्षांपूर्वीपर्यंत या सर्व सणांना हे सांस्कृतिक कोंदण असायचे. म्हणून मग दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की एरवी ‘मातीत खेळू नको’ असे आदेश ऐकत कथित आरोग्यदायी जगणाऱ्या मध्यमवर्गीय घरातली पोरे किल्ल्यांचा इमला रचू लागत. मुलींच्या बोटांतून रांगोळी घरंगळे. अंगणात लावायचे कंदील घरोघरी बनवले जात आणि कणीक किंवा भात हे पदार्थ उदरभरणाप्रमाणे कागदही जोडण्यास मदत करतात हे लक्षात येई. बांबूच्या काठ्यांना कणकेची खळ लागलेले कागद चिकटवण्याच्या प्रयत्नातून एक वास तयार होई. दिवाळी जवळ आल्याचा सुगावा त्यातून मिळे. त्या काळात तृतीयपर्णी चांदण्याचा सुळसुळाट झाला नव्हता. निवांत झिरमळ्या जोजावणाऱ्या कंदिलाच्या प्रकाशातच दीपावली उजळायची. पहाटे त्या कंदिलाच्या बरोबर खाली जमिनीवर प्रकाशाचा चौकोनी तुकडा सैलावायचा आणि त्याच्या हलत्या झिरमळ्या त्यावर अंधाराच्या रेषा ओढायच्या. त्या तुकड्याशेजारच्या पणत्यांतून ओझरणाऱ्या प्रकाशाची प्रभावळ या सगळ्यास एक स्थिरता द्यायची. चुरचुरते डोळे चोळत अर्ध झोप-अर्ध जाग अशा अवस्थेत हे दृश्य साठवून घ्यावे तर आंघोळीची हाक यायची. त्यावेळी कळायचे नाही की जगण्याशी दोन हात करण्याच्या अनुभवांनी मागे सोडलेल्या खुणांमुळे आजीचा हात अधिक खरखरीत आहे की तिच्या हातीचे उटणे अधिक खरबरीत आहे! एरवी बारा महिने डोक्यास लागणाऱ्या ओशट ‘खोबरेल तेला’साठी हे चार दिवस सुट्टीचे. या दिवसात कमनीय आकाराच्या बाटल्यांमध्ये  ‘टाटा ऑइल’च्या लाल सुंगधी तेलात हे उटणे मिसळून येई. बऱ्याच घरातल्या साध्या ‘मोरी’ची बाथरूम व्हायची होती तो हा काळ ! या मोरी नामक न्हाणीघरात शरीरावरचा हा ऐवज ‘अभ्यंग स्नान’ नावाने मग धुतला जाई. या पुण्यस्नानाचा अधिकार बारा महिने साथ देणाऱ्या लाल लाइफबॉय किंवा हिरवा ‘हमाम’ यांना नव्हता. ते हे चार दिवस स्वत:स वाळवून घेत. कारण दिवाळी आणि गोलमटोल, वजनदार ‘मोती’ साबण यांचे अतूट नाते होते.

हे काळ-काम-कारण यांचे अतूट नाते ही खरे तर त्या काळाचीच ओळख. ती इतकी पक्की होती की शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याचा आणि घरोघरी कलिंगडे ओल्या कापडात गुंडाळून गार करण्याचा काळ कमालीचा एक होता. हे समीकरण काळावर इतके कोरलेले होते की उन्हाळी सुट्ट्यांखेरीज आंबा दिसला तरी त्याकडे दुर्लक्ष झाले असते. नवे कपडे लेण्याचे किंवा चकली/ चिवडे/ शंकरपाळ्या हे उठवळ पदार्थ खाण्याचे हंगाम दोनच. एक हक्काचा दिवाळीचा. आणि दुसरा अनिश्चित असा- घरात कोणाचे लग्नकार्य वगैरे काही ठरले तरचा. यात कौतुकाचा मोठा वाटा मात्र दिवाळीचा. कारण त्यात आनंदाची हमी होती. त्यावेळी या आनंदात जिव्हा वैविध्य असे. चातुर्मासात कांदा- लसूणही न खाणाऱ्यांच्या घरात या निमित्ताने शेजारच्यांच्या बारमाही अभक्ष्यभक्षी घरातून येणाऱ्या कांदा- लसणाच्या चिवड्याकडे अनेकांचे डोळे लागलेले असायचे आणि अत्यंत शिष्ट, कायम नाक वर करून आपल्याच तोऱ्यात राहणाऱ्या करंजीच्या मनात पलीकडच्या चांद्रसेनीयांच्या घरातून आलेले नाजुक ‘कानोले’ दुस्वास जागवायचे. या पदार्थांत केविलवाणे असायचे ते शंकरपाळे. उत्तरेमधला सक्करपारी हा पदार्थ शंकरपाळे असा अपभ्रंश होत आपल्याकडे अवतरला खरा, पण त्याचा समावेश कायम ‘केले केले… नाही नाही’ अशा पदार्थांत! दिवाळीत व्हायलाच हवा असा काही हा पदार्थ नव्हता. असे मानाचे स्थान असायचे कडबोळ्यास. अलीकडे बाजारपेठेच्या रेट्यामुळे ती बिचारी आपला बाक घालवून बसलेली असली आणि ‘चकणा’ नावाने अब्रह्मण्यम कृत्यांत साथ देत असली तरी त्या काळी कडबोळे या शब्दाचाही उच्चार भारदस्तपणे केला जात असे आणि ‘बटर’ न झालेल्या पांढऱ्याशुभ्र लोण्याची साथ घेतल्याखेरीज ते कधीही समोर येत नसे. असा दुसरा पदार्थ म्हणजे अनरसा नामक बहुतेकदा फसणारा प्रयोग. त्याच्या फसवण्याच्या सवयीमुळे तो एकतर सर्रास बनायचा नाही आणि बनला तरी जावई, वाण वगैरे संस्कारी गोष्टींशी त्याची सांगड घातली गेल्यामुळे सरसकट वाटलाही जायचा नाही. या सर्व आनंदाचा उद्गार व्हायचा तो फटाके नामक स्फोटकांतून. लाल-हिरव्या लहानशा सरळ मिरच्यांप्रमाणे दिसणारे लवंगी, सरळसोट ताठ कण्याचे ‘लक्ष्मी बार’, बिनडोक वाटावेत असे चौकोनी बॉम्ब आणि युद्धातल्या सुरुंगाचे स्मरण करून देणारे ओल्या मेंदीच्या रंगातील सुतळी बॉम्ब हे आर्थिक मगदुराप्रमाणे आणि ते फोडणाऱ्या वयाप्रमाणे घराघरांत येत वा येत नसत. फुलबाज्या, टिकल्या ही परकर-पोलके किंवा झबल्यांतल्यांची मक्तेदारी. बाण, कायम भांबावलेली, दिशाहीन चिडी, मातीच्या मडक्यातले भुईनळे हेही तसे कमीच. त्यातल्या त्यात श्रीमंती घरांत त्यांना स्थान. उन्हाळी सुट्ट्यांत घरासमोरच्या अंगणातल्या वाळवणाप्रमाणे या उर्वरित फटाक्यांनाही ऊन दिलेले असायचे. त्यांच्या फुटण्यात सौर ऊर्जेचा वाटा त्यावेळी तरी असायचा.

पण आता बारा महिने फटाके मिळतात, कधीही चकल्या खाल्ल्या जातात आणि काही जण तर ऐन पावसात मॉलमधून कलिंगडे विकत घेतात. यास बाजारपेठेचा रेटा म्हणायचा की संस्कृतीची स्थानभ्रष्टता म्हणायची, याची चर्चा करण्यात अर्थ नाही. कारण आहे हे असे आहे. ते बदलण्याची ताकद कोणाकडेही नाही. तेव्हा परिस्थितीशरणतेस पर्याय नाही. ईशान्य भारतातील, पाठीस हिमालय असलेल्या एका रम्य शहरात शिरताना समोर मुंबईतील ‘ब्रॅण्डेड मॉल’ पाहिल्यानंतर जे वाटते ते आता हिवाळ्यात आंबे पाहून जाणवते. हे सत्य स्वीकारले की मग सण आणि संस्कृतीच्या वरील व्याख्येचे काय, हा प्रश्न पडतो. एरवी ज्यांचा आनंद घ्यायला मिळत नाही, त्याचा आनंद घेणे म्हणजे सण हे जर खरे असेल तर बारमाही आनंदासाठी जे समोर बारमाही उपलब्ध आहे त्याच्याच आधारे दिवाळी साजरी कशी करणार हा प्रश्न. अन्य बाबत त्याचे उत्तर असेल ते असो. पण संपादकीयांपुरते तरी आम्ही याचे उत्तर शोधले आहे. एरवी ज्या विषयांवर लिहिणे शक्य होत नाही, त्या विषयांवर दीपावली-सप्ताहात लिहिणे, हे ते उत्तर. ही सणकालीन संपादकीये दीपावलीशी संबंधित विविध विषयांवर असतील. कारण या सणास रंग, स्वर, गंध यासह एक रूप आहे आणि ते लोभस आहे. त्या लोभसतेचा हा गौरव!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Editorial page diwali festival color tone smell philosopher commentator of culture akp

ताज्या बातम्या