scorecardresearch

Premium

शाळासोबत…

आई-बाबांना घरातूनच काम आणि घरातल्या सगळ्या मुलांची घरातूनच शाळा.

(संग्रहीत)
(संग्रहीत)

शहरांमधल्या शाळा सुरू होणार- होणार म्हणत पुन्हा ‘घरात’ बसताहेत! शिक्षकांवरला आणि मुलांवरलाही बोजा कमी झालेला नाही, पण काही तरी हरवलंय…

शाळा म्हणजे फक्त चार भिंती आणि बाकं नाहीत. तिथं जगण्याचंही शिक्षण मिळतं आणि साहचर्याचाही अपूर्व अनुभव मिळतो…

potholes internal road Navi Mumbai Ganpati Visarjan procession pothole
गणपती विसर्जनात खड्ड्यांचे विघ्न; महापालिकेचा खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा फोल
Young girl beaten Kalyan
कल्याणमध्ये विसर्जनस्थळी तरुणीला बेदम मारहाण
palghar health news
आदिवासी पाड्यातील नव्वदीच्या आजोबांना मिळाले जीवदान!
Pune Kasba Peth Ganpati Mandal Make Live Decoration With Human Artist Know Amazing History Of Manache Ganpati
बाप्पाच्या आगमनाला पुणेकरांचा सजीव देखावा! कसबा पेठेतील ‘या’ मंडळाची भन्नाट कल्पना कशी सुरु झाली?

जूनच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी येणारी पावसाची सर आता चुकायला लागली आहे. पाऊस येईल येईल, असे सगळे जण म्हणत असतात. पण पाऊस काही पडता पडत नाही. पाऊस नाही, म्हणून याच वेळी सुरू होणारी शाळाही सुरू होत नाही. गेले वर्षभर शाळा नावाच्या इमारतीतल्या प्रत्येक भिंतीशी, बाकाशी, धडपडणाऱ्या जिन्यांशी असलेली दोस्ती संपत चालल्याचा भास होत असतानाच, अचानक येणाऱ्या पावसासारखी शाळा सुरू होणार असल्याची, सुखद गारवा निर्माण करणारी बातमी येते आणि पुन्हा एकदा आनंदाला उधाण येतं. मन शाळेत जाण्यासाठी झुरायला लागतं आणि त्या स्वप्नांनी रात्रीची झोपही सुखाची वाटायला लागते. गेलं वर्षभर अशी सुखाची लहर अंगभर पसरलेलीच नाही. वार्षिक परीक्षेचा निकाल लागून कोणाला किती मार्क पडले आणि कोण पहिलं आलं, या गोष्टी तर गेल्या काही वर्षांत फजूल ठरल्या आहेत. त्याआधी, हा करोना नामक विषाणू आला नव्हता, तोपर्यंत सगळं कसं ख्यालीखुशालीचं होतं. उन्हाळ्याची सुटी कधी एकदा संपते आणि कधी एकदा शाळा सुरू होते, असं वाटण्याचा हा काळ गेले वर्षभर फक्त आशा लावणारा होता. शाळा अमुक तारखेपासून सुरू होणार, याइतकी सुखद वार्ता कुणी ऐकली नव्हती. सुरू होण्याची ही बातमीही चार वेळा छापून आली. प्रत्येक वेळी सगळ्या बाळगोपाळांचा तोच गलका आणि काहीच दिवसांत तोच आणि तसाच हिरमोड.

उन्हाळा संपत आला, की वह्या-पुस्तकांची, दप्तरांची आणि शालेय साहित्याची बाजारपेठ फुलायला लागते. दरवर्षी नव्याने येणारी फॅशन आणि मुलामुलींच्या बदलत्या आवडीनिवडी यांची सांगड घालत ही खरेदी करताना पालकांची आनंददायी दमछाक होत असते. कुणाला वहीच्या कव्हरवर अमुकच चित्र हवं असतं, तर वह्या-पुस्तकांना कव्हरं घालून ती अधिक टिकाऊ  बनवण्याचा पालकांचा खटाटोप असतो. शाळेच्या दप्तरात अत्यावश्यक असणारी ‘शस्त्रयुक्त वस्तूंनी’ भरलेली कंपास पेटी नावाची वस्तूही आता रंगीबेरंगी झाली आहे. खरेदीची ही लगबग सुरू होणार अशी चिन्हे दिसू लागली आणि १७ तारखेपासून नक्की शाळा सुरू होणार, असं शेवटचं भाकीत वाचलं खरं. पण त्यावर विश्वासच बसत नव्हता. कसा बसेल? आतापर्यंत असं अनेकदा घडलंय आणि प्रत्येक वेळीच हिरमोड झालाय. आता शाळा नक्की सुरू होणार आणि ‘घरात बसून शाळा’ नामक कल्पित गोष्टीला एकदाचा रामराम ठोकावा लागणार, असं वाटेपर्यंत पुन्हा एकदा शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला. गेले काही महिने किती छळ सहन केलाय या सगळ्या मुलामुलींनी, त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनीसुद्धा. रोज सकाळी झोपेतून उठून त्या मोबाइलसमोर बसायचं. शाळेच्या वर्गातच बसल्यासारखं वाटवून घ्यायचं. शिक्षक काय सांगताहेत, याकडे लक्ष द्यायचं म्हटलं, तरी मागच्या वर्षीच्या शाळेतल्या गमती आणि मित्रमैत्रिणींच्या आठवणीनं अभ्यासातलं लक्ष पार उडून जायचं. नाही म्हणायला आठवी ते बारावीच्या शाळा राज्यातल्या ग्रामीण भागांत जुलैपासूनच सुरू झाल्या. पण शहरांमध्ये कोणत्याच इयत्तेची शाळा सुरू होण्याची चिन्हं दिसत नव्हती. आता निदान त्या १७ ऑगस्टपासून सुरू होतील असं वाटे-वाटेपर्यंत त्या आनंदावरही विरजण पडलं.

घरातल्या प्रत्येक खोलीत किंवा एकाच खोलीत घरातले सगळे त्या पडद्यासमोर बसलेले. कुणाच्याही पडद्यासमोर घरातल्या इतर कुणालाही दिसण्यास सक्त मनाई. आई-बाबांना घरातूनच काम आणि घरातल्या सगळ्या मुलांची घरातूनच शाळा. काही शाळांनी तर घरातही शाळेचा गणवेश घालण्याची सक्ती केलेली असल्याने सकाळीच गोंधळाला सुरुवात. घरोघरी सध्या हेच चित्र. गेले कित्येक महिने घराच्या बाहेर पडायलाही घरातून विरोध असल्याने किती वेळ मोबाइलच्या त्या छोट्या किंवा भिंतीजवळच्या मोठ्या संगणकीय पडद्याकडे बघत बसायचं, असा प्रश्न. बाहेर खेळण्यांची दुकानंही बंद. खेळून खेळून कंटाळा आलेल्या खेळण्यांबरोबर तरी किती खेळायचं? सगळ्या तज्ज्ञांनी शाळा सुरू करायलाच हव्यात, असं सांगूनही त्यांचं कुणीच कसं ऐकत नाही? प्रत्येक वेळी शाळा सुरू करायची घोषणा झाली, की शिक्षकांना आरटीपीसीआरची चाचणी सक्तीची. (तीही पदरमोड करून!) शाळा स्वच्छ करून ठेवली आणि वर्ग झाडून पुसून ठेवले की मगच शाळा सुरू होणार ‘नसल्याची’ सरकारी घोषणा नेहमीची होऊन बसली आहे. शाळा कधी सुरू करायच्या आणि त्या बंदच कशा ठेवायच्या याबद्दलच्या घोषणाही आता पाठ झाल्या आहेत सगळ्यांच्या. सरकारी निर्णयात दहा वर्षांखालील मुलांना संसर्गाचा धोका अत्यल्प आणि त्यावरील मुलांना धोका कमी असं स्वच्छ नमूद के लं होतं. मग त्याचं झालं तरी काय? केंद्रीय पातळीवरील नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षा आणि गेल्या वर्षी न झालेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा याच आठवड्यात व्यवस्थित पारही पडल्या. त्या मुलांच्या पालकांनी कोणतेही आढेवेढे न घेता त्यांच्या मुलांना पाठवलंच की! पण इथे तिसऱ्या लाटेची भीती दाखवत घरातच बसून राहायचं. शाळा सुरू होत्या, तेव्हा ‘घरात फार वेळ मोबाइल बघत बसू नकोस’ असा लकडा लागायचा. आता ‘बाहेर गेलास तर याद राख’ची धमकी.

ही आंतरजालावरची शाळा सुरू झाली, तेव्हा शिक्षकांनाही कळत नव्हतं, कसं शिकवायचं ते. त्यांच्यासाठीही हा अनुभव नवाच. समोर मुलं नाहीत आणि आपण सांगतोय ते त्यांना कळतंय की नाही, हे त्यांच्या डोळ्यात बघून कळायची सोय नाही. त्या कॅमेऱ्यातून डोळे वटारण्याचीही सोय नाही. मुलांच्या वह्या तपासायच्या, वर्षभर कोणत्या ना कोणत्या चाचण्या घ्यायच्या, तिमाही, सहामाही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासायच्या, असलं काहीच काम नसलं, तरी रोज कॅमेऱ्यासमोर बसून ‘तास’ तर घ्यावेच लागतात. शाळा भरत नसली तरी माध्यान्ह भोजन योजनेतील धान्यवाटपासाठी त्यांना शाळेत जावंच लागतं. एवढंच काय, स्नेहसंमेलनदेखील ‘ऑनलाइन’ करावं लागतं. फार तर सहल नामक प्रकरणातून शिक्षकांची सुटका मात्र झाली. सुटका झाली, तरी इतर अनेक सवय आणि अनुभव नसलेल्या गोष्टी मात्र मागे लागल्या. घरात बसून मुलांना फार त्रास देऊ  नका, अशी सरकारीच सूचना होती. त्यामुळे सगळं सुशेगात सुरू राहिलं. शिक्षकांना वाटत होतं आपण शिकवतोय आणि विद्यार्थ्यांनाही वाटत होतं की आपण शिकतोय. गेल्या वर्षभरात नातेवाईक, ओळखीचे करोनामुळे दगावले. सगळं वातावरण कसं कुंद झालं. मुलांना हा ताण सहन करणं किती अवघड जातंय, याची कल्पना घरात बसून निर्णय घेणाऱ्या सरकारी बाबूंना कशी असेल? शाळा म्हणजे फक्त चार भिंती आणि बाकं नाहीत. तिथं जगण्याचंही शिक्षण मिळतं आणि साहचर्याचाही अपूर्व अनुभव मिळतो. राग, लोभ, त्रागा, आनंद, मैत्रभाव, त्यातील ताणतणाव असं सगळं समजावून देणारी ती एक जिवंत वास्तू असते.

सतत नवं आत्मसात करण्याची जबरदस्त आकांक्षा असलेली, आयुष्याच्या ऐन उमेदीतली ही वर्षं पुन्हा मिळण्याची शक्यता नाही. आयुष्यभर सोबत करणारं हे असलं करपलेलं बाल्य या सगळ्या मुलांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करणारं आहे. हे लवकरात लवकर संपायला हवं, असं पुन:पुन्हा सांगूनही त्याकडे केवळ दुर्लक्षच होणार असेल, तर येणाऱ्या काळात हीच मुलं मोठ्या संकटांना सामोरी जातील, तेव्हा कुणाच्याच हाती काही नसेल. चूक समजल्यावर ती लगेच दुरुस्त करावी लागते. ती दुरुस्तीचीही संधी गमावणं आता परवडणारं नाही. ते कुणाच्याच भल्याचं नाही!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Editorial page schools in cities teachers reduce the burden on children annual examination results akp

First published on: 14-08-2021 at 00:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×