काय आहे यापेक्षा काय काय नाही याची यादी प्रचंड असलेल्या देशाचे जे काही बरे चालले आहे ते कोणामुळेकोणाच्या तरी आंतरिक ऊर्जेमुळे, प्रेरणेमुळे वा चिवट आशावादामुळे कोणाचे तरी भले होत असेल तर ते ठीकच. परंतु या भलेपणाच्या प्रक्रियेस व्यवस्थेचा आधार उभा करणे आणि व्यवस्थेसाठी नियमांधारित जगण्याची सवय असणे गरजेचे असते.

बदलाच्या रणदुंदुभी फुंकत, जनतेच्या मनात आशेची नवीकोरी पहाट उगवत सत्तेवर आलेले मागच्यांच्याच वाटेने जाताना पाहताना.. एखाद्या सकारात्मक संवेदनेसाठी नव्हे तर कोणा तरी अधम खेळासाठी सर्व शक्ती एकत्र येताना.. भौतिकदृष्टय़ा एकविसाव्या शतकात स्थिरावल्यानंतरही देशातल्या पन्नास टक्के नागरिकांचे मूल्यमापन केवळ लैंगिकतेतून करणारे आसपास असताना.. शिक्षणावर भर देऊ असे आश्वासन निवडणुकीपूर्वी देणारे सत्तेवर आल्यावर एक पैचीही अधिक तरतूद करीत नसताना.. घराणेशाहीविरोधात आवाज उठवणाऱ्यांची घराणेशाही रुजत असताना.. बनावट परवान्यांआधारे केवळ दुचाकीच नव्हे तर विमाने चालवणारे तयार होत असताना.. काही शे रुपयांच्या कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याच्या मागे हात धुऊन लागणाऱ्या बँका हजारो कोटी बुडवणाऱ्यांस मात्र सुखेनैव परागंदा होऊ देताना.. सामाजिक संस्थांची दुकानदारी होत असताना आणि तीवर नियंत्रण आणण्याच्या नादात सत्कर्मे करणाऱ्यांनाही सुळावर लटकावले जात असताना.. सरकारी हेलिकॉप्टर खरेदीतील भ्रष्टाचार भले कमी झाला असेल, पण सामान्यांना द्यावे लागते त्या चिरीमिरीत झपाटय़ाने वाढ होत असताना.. आणि या सगळ्यास विरोध करावा तर दुसरा पर्याय काय या प्रश्नाचे भूत समोर उभे ठाकत असताना अशा वातावरणात जर प्रजासत्ताक दिन आला तर सामान्याने काय करावे? तो साजरा करावा.

Israel, Iran , missile attack
विश्लेषण : इराण-इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार? परिस्थिती चिघळण्यास अमेरिकेची चूक कशी कारण ठरली?
Anti-Maoist operations in India influence of Naxalism
छत्तीसगडमध्ये १८ नक्षलींचा खात्मा; देशात कुठे आहे नक्षलवादाचा प्रभाव?
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?

याचे कारण आसपास काजळी वाढवणारे इतके काही घडत असताना ते काळेपण घेऊन जगावयाचे म्हटले तर या वातावरणात शुभ्र काही जाणवणारदेखील नाही. परंतु तसे होणे हादेखील या काळेपणावर अन्यायच म्हणावा लागेल. कारण कितीही घनदाट असा हा काळेपणा असला तरी त्यावरही ठसठशीतपणे उठून दिसेल अशी शुभ्रताही असतेच असते. काजळीच्या काळेपणाचा भंग करणाऱ्या या शुभ्रतेतच वर्तमानास तगवण्याची आणि भविष्यास आकार देण्याची क्षमता असते. या भारतवर्षांने या शुभ्रतेची आस वारंवार अनुभवलेली आहे. किंबहुना ती आहे म्हणूनच इतक्या साऱ्या काजळीनंतरही या देशावर काळेपणा साठलेला नाही. कितीही काहीही झाले तरी या देशातील जनता ‘आम्ही जिवंत राहू, आम्ही जिवंत राहू, आम्हीच ते उद्याचे आकाशरंग पाहू..’ असे मोठय़ा आशेने म्हणत असते. नव्हे यावर या जनतेची श्रद्धा असते. हा चिवट आशावाद यांच्यात येतो कोठून असा प्रश्न यावर पडणे साहजिकच. मर्कटांना माणसे करणारा, अक्षरांना मंत्र करणारा आणि स्वरांना संगीतात बांधणारा त्यांचा आशावाद हा लोभस खराच. यामागे बहुधा दुसरा काही पर्याय नसणे, हे कारण नसेलच असे म्हणता येणार नाही. आलिया भोगासी सादर व्हावेच लागणार असेल तर निदान ते सकारात्मक मनोवृत्तीने झाल्यास मनाला होणाऱ्या यातना तरी कमी होतील, असाही विचार ही सामान्य जनता नकळतपणे करीत असावी. काहीही असेल. पण तरीही अशांकडून भले काही या समाजात होत असते. ही काजळ प्रक्रिया इतकी वर्षे सुरू आहे.. तरीही. या वातावरणात कोणी पती-पत्नी आपली भौतिक सुखे, शहरी आयुष्य आनंदाने नदीत दिवे सोडावे तसे सोडून देतात आणि मेळघाटातल्या अभागींच्या सेवेस स्वत:ला जुंपून घेतात. अमेरिकादी विकसित देशातील गलेलठ्ठ वेतनाच्या चाकरीचा राजमार्ग सोडून कोणी एक शिक्षक आयआयटीत उद्याच्या उद्योजकांना घडवण्यात आनंद मानतो. स्वत:कडे काहीही नसताना असेच काहीही नसणाऱ्या पारध्यांसाठी कोणास काही करावेसे वाटते तर कोणी वेश्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची काळजी वाहतो. कोणी वेडे पावसाचे पडणारे पाणी जमिनीच्या पोटात अधिकाधिक कसे जाईल यासाठी प्रयत्न करतात तर कोणी डबके झालेली नदी पुन्हा कशी वाहू लागेल यासाठी उपाय योजतात. मतदानाचा अधिकार नसलेल्या आणि म्हणून दुर्लक्षित प्राणी-पक्ष्यांची काळजी कोणी घेतात तर काहींना झाडांच्या हिरवाईची स्वप्नपेरणी जगण्याचे ध्येय देते. असे किती सांगावे?

काय आहे यापेक्षा काय काय नाही याची यादी प्रचंड असलेल्या देशाचे जे काही बरे चालले आहे ते या आणि अशा कर्त्यांसवरत्यांमुळे. या अशा प्रकाशांमागच्या ऊर्जाधारकांना ना सत्ता हवी असते ना अधिकार. ते खरे प्रजासत्ताकवादी. प्रामाणिक. कोणाच्या ना कोणाच्या भल्यासाठी काही ना काही करणारे. करू पाहणारे. सर्वकार्येषु सर्वदा अशी इच्छा बाळगणारे. अशांमुळे समाज मोठा होत असतो, हे तर खरेच.

पण अशांमुळे मोठा होणारा समाज त्या बदल्यात काय करतो हा खरा प्रश्न आहे. तो महत्त्वाचा अशासाठी की कोणाच्या तरी आंतरिक ऊर्जेमुळे, प्रेरणेमुळे वा चिवट आशावादामुळे कोणाचे तरी भले होत असेल तर ते ठीकच. परंतु या भलेपणाच्या प्रक्रियेस व्यवस्थेचा आधार उभा करणे गरजेचे असते. हा असा व्यवस्थेचा आधार उभा करावयाचा तो प्रामुख्याने दोन कारणांसाठी. एक म्हणजे हे असे कोणाचे भले होणे हे अनाम योगायोगावर अवलंबून असता नये. ज्या समाजात भले होण्यासाठी योगायोगाची वा नशीब आदींची गरज लागते तो समाज प्रगती नव्हे अधोगती दर्शवीत असतो. भले होणे वा करणे ही बाब प्रयत्नसाध्य असायला हवी. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांस भलेपणाची हमी हवी. ती तशी असणे हे विकसित समाजाचे लक्षण. अशा समाजांत वैयक्तिक उन्नतीचे मार्ग सर्वाना समानपणे उपलब्ध असतात आणि वरिष्ठांत काहीही, कसलीही ओळखपाळख नसली तरी वा लागेबांधे नसले तरी नागरिकांस आपला उत्कर्ष साधता येतो. वा न्याय मिळू शकतो. हे असे होऊ शकते याचे कारण असा समाज हा उत्तम व्यवस्थांनी बांधलेला असतो. या समाजांत उत्तम व्यवस्था असतात याचे कारण नियमांचे पालन करावयाचे असते ही संस्कृती त्या समाजात रुजलेली असते. ही संस्कृती त्या समाजात रुजते याचे कारण त्याआधी कायदा हा सर्वाना समान आहे आणि असतो हे साधे तत्त्व अशा समाजाने आचरणात आणलेले असते. तेव्हा आपला समाज असा असायला हवा असे आपल्याला वाटत असेल तर असे नियमाधारित जगणे आपण जगू लागलो आहोत का हा प्रश्न आपणास आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पडावयास हवा.

त्यामागील दुसरे कारण म्हणजे अशा समाजाचे भवितव्य मग व्यक्तिकेंद्रित न राहता ते व्यवस्थाकेंद्रित होते. आधुनिक मानवी संस्कृतीच्या प्रसारात या व्यवस्थेचे महत्त्व विशेष. ती एकदा सुदृढ झाली की व्यक्तीचे वैयक्तिक गुणदोष, त्याच्या आवडीनिवडीचे आरोह-अवरोह आदींचा परिणाम समाजाच्या प्रगतीवर होत नाही. असे होणे फार महत्त्वाचे. आपल्यासाठी तर फारच. कारण व्यक्ती ते समष्टी असा प्रवास हवा असेच तर आपले धर्मतत्त्वज्ञान सांगत असते. तेव्हा अशी शिकवणूक असताना व्यक्तीपेक्षा महत्त्व हे व्यवस्थेला द्यायला हवे, याचे भान आपणास येणार कधी? प्रजासत्ताक दिनाची सुट्टी शनिवार-रविवारला जोडून जरी आली नसली तरी प्रजासत्ताकाच्या या प्रश्नचिंतनासाठी आपण आपला थोडा विचारावकाश द्यायला हवा.