फॅशन क्षेत्र पाश्चात्त्यांचे असले तरी आपण आपले भारतीयत्व न लपवता या क्षेत्रात स्पर्धा करायची, असे ठरवणाऱ्या पहिल्या पिढीतला वेंडेल रॉड्रिक्स अकालीच गेला..

प्रत्येकजण करतो आणि तरीही नाक मुरडतो अशी बाब म्हणजे फॅशन. खरे तर ज्या संस्कृतीने शृंगार रसास इतके गौरविले आहे त्या संस्कृतीचे पाईक आज फॅशन असा शब्द जरी कानावर पडला की ‘आम्ही नाही बा त्यातले’ अशी भावना व्यक्त करतात. ही खास आपली दांभिकता. खरे तर सेवक म्हणवून घेणाऱ्यांपासून ते मालकी मिरवणाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण जमेल तितकी फॅशन करीतच असतो. याचे महत्त्व इतके की देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतलेल्या काही महिलांनी स्वातंत्र्योत्तर काळात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सहज तक्रार केली ती भारतातील सौंदर्यप्रसाधनांच्या कमतरतेची. जगण्यातील सर्व सौंदर्यावर दिलो जानसे प्रेम करणाऱ्या आणि ते अजिबात न लपवणाऱ्या पं. नेहरू यांनाही हा मुद्दा पटला आणि त्यांनी जेआरडी टाटा यांना याबाबत ‘काही करण्याची’ विनंती केली. नेहरूंइतक्याच सौंदर्यासक्त जेआरडींनी तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यातून १९५१ साली स्वतंत्र भारतातील पहिला फॅशन ब्रॅण्ड जन्माला आला. तेव्हा देश असो वा त्या देशातील व्यक्ती. ‘स्व’ची शारीर जाणीव व्हायला लागली की अगदी बालवयातही आपली पहिली कृती असते ती आरशासमोर उभे राहण्याची. फॅशन या कलेचे गारूड आयुष्यास व्यापून टाकण्याची ती सुरुवात. तीच फॅशन कला ज्याच्या आयुष्याचा ध्यास बनली आणि ज्याने पाश्चात्त्यदेहाकार-केंद्री फॅशन उद्योगास स्वदेशी बनवले तो वेंडेल रॉड्रिक्स अकाली निवर्तला. त्याच्या निधनाने भारतीय फॅशनविश्वाने काय गमावले याची उजळणी यानिमित्ताने व्हायला हवी.

याचे कारण शृंगार जरी आपला होता, आणि आहे, तरीही त्याचे आधुनिक शास्त्र रचले ते पाश्चात्त्यांनी. त्या संस्कृतींत उगा देहभावना आणि सौंदर्यासक्ती लपवण्याचा दांभिकपणा नाही. त्यामुळे तेथे बहुसंख्यांस देहाने इहलोक निरोपाच्या क्षणीही सुंदर दिसावेसे वाटते. तेव्हा अशा संस्कृतींत फॅशन उद्योग म्हणून न फोफावता तरच नवल. वेंडेल याचे मोठेपण असे की या फॅशन दुनियेची मक्का (वाटल्यास काशी म्हणा) असलेल्या पॅरिस आणि या उद्योगांचे केंद्र असलेल्या न्यूयॉर्क येथे शिकून त्याने या कलेस भारतीय बाज दिला. चित्रपटाच्या क्षेत्रात एक अशी पिढी उदयास आलेली आहे की जी स्वत:ला आहे तशीच समोर आणते. दीपांकर बॅनर्जी, झोया अख्तर, अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज अशी अनेक नावे सांगता येतील. त्यांची सुरुवात भले अदूर गोपालकृष्णन वा मीरा नायर अशांकडून झाली असेल. पण हा मार्ग आता अधिक प्रशस्त झालेला आहे. त्याप्रमाणे फॅशन उद्योगांतील अशा तरुणांचेही सांगता येईल. पाश्चात्त्यांना आवडावे म्हणून हे आपले भारतीयत्व लपवत नाहीत. वेंडेल या पिढीचा प्रतिनिधी. मनीष मल्होत्रा, तरुण ताहिलियानी, रोहित बाल, रितु कुमार, सब्यसाची मुखर्जी अशी अन्य अनेक नावे. या मंडळींनी भारतीय मातीतील रंगरूपरेषा आणि भारतीय साहित्य यांचा वापर करून जागतिक बाजारात गौरवलेली अत्युत्तम उत्पादने आणली. राजस्थानातील वेलबुट्टी, काश्मिरातील रंगश्रीमंती, दक्षिणेकडच्या मंदिरीशुभ्रतेचे पावित्र्य या मंडळींनी वस्त्रप्रावरणांत उतरवले. ही कामगिरी अभिमान बाळगावा अशीच. फॅशन या क्षेत्रास एका व्यवसायाचा दर्जा आणि आदर या सर्वामुळे मिळाला. त्या अर्थाने हे उद्योगपतीच. पण आपल्याकडे त्यांच्याकडे कमीपणाने पाहिले जाते. जागतिक पातळीवर लुई व्हुताँ, अर्मानी वा व्हर्साची यांना जो मान आणि आदब मिळते ती आपण आपल्या फॅशन डिझायनर्सना नाकारतो.

हे सर्व महानुभाव आणि वेंडेल यांच्यातील फरक म्हणजे त्याने फॅशन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणली. मुंबईतील चाळीत जन्म झाल्यामुळे आणि या जन्मभूमीची मुळे गोव्याच्या मातीत रुजलेली असल्यामुळे असेल वेंडेलने सर्वसामान्यांचाही विचार करून वस्त्रप्रावरणे रचली. अन्य अनेक फॅशन डिझायनर्सप्रमाणे त्यालाही सुरुवातीस स्त्री देहदर्शन घडवणाऱ्या कपडय़ांचे आकर्षण होते. बिकिनी वगैरे त्यामुळे आलेच. पण अनेक कलाकारांस परंपरेची मळलेली वाट तुडवतानाच आपला रस्ता सापडतो. वेंडेलचे तसे झाले. त्यामुळे तारुण्यात छानछौकी भासणारे त्याचे कपडेही वय वाढल्यानंतर पोक्त भासू लागले. तरुणपणी रंगरंगोटी आणि वेलबुट्टीने सजणारी त्याची वस्त्रप्रावरणे उत्तरायुष्यात शुद्धशांत श्वेत (पांढऱ्या नव्हे. पांढरा या शब्दातच काही अभद्रता दडलेली आहे) छटांनी उजळू लागली. वेंडेलचा आणखी एक वेगळेपणा म्हणजे त्याच्या कपडय़ांना त्याने भारतीय देहाकार दिला. तोपर्यंत तयार पाश्चात्त्य कपडे ‘लहान’, ‘मध्यम’, ‘मोठे’ आणि ‘अंतिम मोठे’ अशा आकारांत येत. यात एक प्रकारचा कमीपणा आहे. त्याचा विचार करून वेंडेलने कपडय़ांना, विशेषत: महिलांसाठीच्या, भारतीय मादकता दिली. ‘फॅशनमध्ये लोकशाही हवी. केवळ धनिकांचाच विचार करून वस्त्रप्रावरणे बनवली जाऊ नयेत,’ असे तो म्हणत असे. त्याप्रमाणे त्याची कृतीही होती.

वेंडेल गोव्याचा. आणि त्यात फॅशन कलाक्षेत्रातला. एरवी जगाच्या पाठीवर साधे आयुष्य जगणाऱ्याच्या आयुष्यातून गोव्याच्या मातीचे अस्तित्व जात नाही. त्यात तो कलाकार असेल तर पाहायलाच नको. कधी एकदा त्या मातीस आपले पाय लागतात असे गोंयकारांना होत असते. वेंडेलने आपले हे गोवाप्रेम कधीही लपवले नाही. वास्तविक फॅशनच्या उद्योग दुनियेत असेल त्याने न्यूयॉर्क, मिलान, पॅरिस, लंडन किंवा गेलाबाजार मुंबईत तरी तळ ठोकायला हवा. या सर्व जगात यश मिळवूनही वेंडेल मात्र गोव्यालाच परतला. तेथे राहून तो आपला व्यवसाय सांभाळत असे. गोव्याच्या मातीस त्याची देणगी म्हणजे कुणबी साडी. कोकणपट्टीतील समाजजीवनात कुणबी समाजाचा मोठा वाटा आहे. या समाजातील स्त्रिया ज्या पद्धतीच्या चौकटीच्या साडय़ा नेसतात त्यावर आधारित साडय़ा वेंडेलने आपला ब्रॅण्ड बनवून बाजारात आणल्या. मिशेल ओबामा यांच्यापासून ते कांचीवरम साडय़ांबाबत चोखंदळ असणाऱ्या जयललिता आणि नेटकेपणाने साडी नेसणाऱ्या सोनिया गांधी यांच्यापर्यंत अनेकांनी या कुणबी साडय़ा वागवल्या आणि लोकप्रिय केल्या. चांगल्या फॅशन डिझायनर्सना आपली वस्त्रे सहज वागवू शकतील अशा मॉडेल्सही आवश्यक असतात. मेहेर जेसिया, कॅरोल ग्राशियस वगैरे अनेक नव्या मॉडेल्सना वेंडेलने मनापासून प्रोत्साहन दिले आणि त्यांचेही नाव व्हावे यासाठी प्रयत्न केले. दीपिका पडुकोण किंवा अनुष्का शर्मा यांच्या उमेदीच्या काळात त्यांना साजेसे कपडे उत्साहाने बेतून देणाराही वेंडेलच. नाव आणि प्रसिद्धी मिळालेल्यांसाठी काही करू इच्छिणारे या व्यवसायात अनेक. म्हणून चाचपडणाऱ्या नवशिक्यांना आधार देणारा वेंडेल महत्त्वाचा. मुंबईत लॅक्मे फॅशन शो सुरू व्हायला हवा यासाठी झटणाऱ्यांत तो एक. यंदाचा फॅशन शो नुकताच सुरू होत असताना त्याच्या निधनाचे वृत्त यावे हा योगायोग विचित्र.

वेंडेल समिलगी होता. ही बाब त्याने कधीही लपवली नाही. पण उगाच त्याने ती मिरवलीही नाही. आपल्या समिलगी जोडीदाराशी त्याने पॅरिसमध्ये रीतसर विवाह केला होता आणि नंतर हे दोघे सुखाने नांदत होते. फॅशन डिझायनर आणि पर्यावरण, फॅशन डिझायनर आणि लेखन वगैरे काही संबंध असू शकतो हे वेंडेलच्या या क्षेत्रातील मुशाफिरीने कळते. तो अनेकांगांनी जगला. या सर्वच क्षेत्रांत त्याची कलासक्तता दिसत होती.

आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कला मानल्या आणि मोजल्या जातात. जाहिरात ही त्यानंतरची ६५ वी कला. ती आता रुजली. तिच्यानंतर क्रम लागायला हवा तो फॅशन या कलेचा. वेंडेल या ६६ व्या कलेतील सच्चा जादूगार. फॅशन या कलेची महती मोकळेपणाने मान्य करणे हीच अशांना आदरांजली.